विशेष वृत्त क्रमांक 78
हिंद दी चादर शहीदी समागम कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा : प्रधान सचिव श्रीकर परदेशी
सर्व जिल्हाधिकाऱ्यांचा घेतला आढावा
हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी 350 व्या शहीदी समागम कार्यक्रमाची आढावा बैठक
नांदेड, दि. 21 जानेवारी:- नांदेड येथे 24 व 25 जानेवारी रोजी ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागमाचा कार्यक्रम होत आहे. जागतिक स्तरावरील हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. सर्व भाविकांची व्यवस्था चोख होईल याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष द्यावे अशा सूचना मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम कार्यक्रमाच्या तयारीचा मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्स) सविस्तर आढावा घेतला. या बैठकीत छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, शहीदी समागम राज्यस्तरीय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक, गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंग, अपर जिल्हाधिकारी रत्नदीप गायकवाड, समितीचे शासकीय समन्वयक डॉ.जगदीश सकवान, संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.
श्री. परदेशी यांनी छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी कार्यक्रमाच्या तयारीबाबत विचारणा केली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योग्य नियोजन करावे, अशा सूचना केल्या.
जिल्हाधिकारी श्री. कर्डिले यांनी सांगितले की, मोदी मैदानावरील कार्यक्रम ठिकाणच्या परिसरात ५२ एकर मैदानावर भाविकांसाठी आवश्यक त्या सुविधा उभारण्यात येत आहेत. प्रशासनाने यासाठी सूक्ष्म नियोजन केले असून तयारी अंतिम टप्प्यात आहे. भाविकांच्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था, मैदानालगत दोन टेन्ट सिटी, त्यामध्ये सुमारे १४ हजार भाविकांची निवास क्षमता, हॉटेल्स, शहरातील मंगल कार्यालये व शाळांमध्येही निवास व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व सुविधांसाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचेही ते म्हणाले.
गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंग यांनीही कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत माहिती दिली. श्री. नाईक यांनी हा कार्यक्रम नऊ समाजातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासन, समाज मिळून प्रयत्न करत आहे. या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा या दृष्टीने जनजागृती व्हावी. यासह शालेय स्तरापासून महाविद्यालयापर्यंत आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धा यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या अधिकाधिक असावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
****
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment