विशेष लेख दिनांक 21 जानेवारी 2026
‘स्क्रोलिंग’ थांबलं, इतिहास जागा झाला !
गाणं, डॉक्युमेंटरी
आणि डिजिटल युगातील संस्कार क्रांती
सध्याच्या 'फास्ट फूड',
'इन्स्टा रिल्स'च्या
युगात एखादा ट्रेंड किती काळ टिकतो ? फार तर २४ तास! पण, याच डिजिटल जगात ४०० वर्षे जुन्या इतिहासाने आजच्या 'जनरेशन झी'ला (Gen Z) चक्क थांबायला
भाग पाडले. निमित्त, सुप्रसिद्ध सुफी
गायक डॉ. सतींदर सरताज यांच्या आवाजातील 'हिंद की चादर' या कलाकृतीचे.
नांदेडच्या पवित्र मातीत श्री गुरु तेग
बहादुर साहिब जी यांचा ३५० व्या भव्य शहीदी समागम वर्षानिमित्त कार्यक्रम होत आहे.
महाराष्ट्र शासन आणि श्री गुरू तेग बहादूरजी यांच्या ३५० व्या शहीदी शताब्दी समितीच्या सहकार्याने
र्निवैर निर्मित 'हिंद की
चादर' डॉक्युमेंटरी
(माहितीपट), अन्
सरताज यांचे गीत आता केवळ व्हायरल कंटेंट उरला नसून, ती एक 'संस्कारांची
डिजिटल चळवळ' बनली
आहे.
सुरांचा जादूगर
: कोण आहेत सतींदर सरताज ?
या चळवळीचा चेहरा आणि आवाज आहेत, डॉ. सतींदर
सरताज. मूळचे पंजाबचे. सरताज केवळ गायक नाहीत, तर सुफी संगीतातील 'डॉक्टरेट'
(Ph.D) आहेत. त्यांच्या गळ्यातून जेव्हा “सीस लेकर
उसी ओर चल दिए...” हे शब्द उमटतात, तेव्हा त्यात केवळ संगीत नसते, तर १७ व्या
शतकातील वेदना आणि त्यागाचा हुंकार असतो. त्यांच्या याच भारदस्त आवाजामुळे तरुणाई
पॉप गाणी सोडून इतिहासाकडे वळली आहे.
व्हायरल 'सत्य': अल्गोरिदमलाही
फुटल्या भावना!
आकडेवारीवर नजर टाकली तर थक्क व्हायला होते.
२५ ऑक्टोबर २०२५ ला प्रदर्शित झालेल्या 'हिंद की चादर' या गाण्याने युट्युबवर अल्पावधीतच २.७६ कोटी (2.76 Crore+) व्ह्यूजचा टप्पा
ओलांडला आहे. तर १.८३ लाखांहून अधिक लाईक्स असे सिद्ध करतात, की हे गीत
लोकांनी फक्त ऐकले नाही,
तर अनुभवले आहे.
केवळ
युट्युबच नाही, तर
इन्स्टाग्रामवरही (Instagram)
या गाण्याची लाट आली आहे. विशेषतः "सीस लेकर उसी ओर चल दिए" या
ओळींवर तरुणाईने बनवलेले हजारो 'रिल्स' (Reels) सध्या सोशल
मीडियावर इमोशनल ट्रेंड बनले आहेत.
दुसरीकडे, निर्वैर प्रॉडक्शन (Nirvair Productions) निर्मित १६ मिनिटांच्या डॉक्युमेंटरीला
मिळालेले ४६ लाख (46
Lakhs+) व्ह्यूज हे सांगण्यासाठी पुरेसे आहेत की, चांगल्या
कंटेंटला 'अल्गोरिदम'ची गरज नसते, त्याला 'भावनांचा' आधार असतो.
पुस्तकातील धडा 'मोठ्या पडद्यावर'
शाळांमध्ये इतिहास शिकवला जातो, पण तो पडद्यावर 'दाखवला' तर ?
महाराष्ट्र शासनाने नेमका हाच धागा पकडला आहे. शाळा, महाविद्यालयांमध्ये
एक आगळावेगळा राबवत श्री गुरु तेग बहादुर साहिब जी (गुरूजी) यांच्या जीवन,शिक्षण आणि
सर्वोच्च बलिदानावर आधारित माहितीपट दाखवण्यात येत आहे. या माहितीपटात VFX आणि ॲनिमेशनचा
वापर करून जुन्या काळातील 'सेपिया' आणि 'गोल्डन' टोन उभा केला
आहे.
राज्यातील शाळांमधून गुरुजींचा इतिहास
विद्यार्थी मोठ्या पडद्यावर पाहत आहेत. या इतिहासातून ते प्रेरणा घेत आहेत. इतिहास
समजून घेत आहेत. जेव्हा विद्यार्थी पडद्यावर पाहतात, की गुरुजींच्या
पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी भाई लखी शाह बंजारा चक्क स्वतःचे घर जाळून
टाकतात, तेव्हा
वर्गातली शांतता खूप काही सांगून जाते. जे संस्कार शंभर व्याख्यानांतून करणे अवघड
आहे, ते या
माहितीपटातून होण्यास मदत होते.
महानायकांना
सलाम
हा माहितीपट, गीत इतिहास जिवंत करते. अशा महानायकांना सलाम करते. हा
सर्व इतिहास पुस्तकातून आता थेट लोकांच्या काळजात कोरल्या जात आहे.
भाई मख्खन शाह लबाना : ज्यांनी समुद्राच्या
तुफानातून वाचल्यावर 'खऱ्या
गुरूंचा' शोध
लावला.
भाई लखी शाह बंजारा: दिल्लीच्या चांदनी चौकात
मुघलांच्या नाकावर टिच्चून ज्यांनी "घरदार जळाले तरी चालेल, पण गुरुजींची
शान राहिली पाहिजे,"
हा बाणा जपला
भाई
जैता जी : गुरुजींचे पवित्र शीर (मस्तक) सांभाळून, अतिशय कठीण प्रवासाने आनंदपूर साहिबला आणले व गुरू
तेगबहादुर जी यांचे पुत्र गुरू गोविंदसिंह जी यांच्याकडे सुपूर्द केले.
नांदेड :
विश्वासाचे केंद्र
या साऱ्याचा केंद्रबिंदू आहे—नांदेड.
गोदावरीच्या काठावर वसलेले शहर. हे केवळ
शहर नसून एक मोठे पवित्र तीर्थस्थान आहे. हे पवित्र स्थळ शीख धर्मातील पाच तख्तांपैकी
एक आहे. येथे हजूर साहिब गुरूद्वारा, ज्याला तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब म्हणून ओळखले
जाते. दहावे गुरू गुरू गोविंद सिंह यांचे अंतिम विश्रांतीस्थान आहे. श्री गुरू
गोविंद सिंहांचे वास्तव्य या भूमीस लाभले. त्याचबरोबर गुरू गोविंद सिंहांनी
त्यांच्यानंतर पवित्र ग्रंथालाच शाश्वत गुरू म्हणून घोषित केले. शीख धर्माचे
अकरावे आणि अंतिम गुरू पवित्र गुरू ग्रंथ साहिब याच ठिकाणी आहेत. त्यामुळे या
पवित्र भूमीत होत असलेल्या श्री गुरू तेग बहादूर साहिब जी ३५० शहीदी आणि श्री
गोविंद साहिब जी ३५० व्या गुरतागद्दी
शताब्दी निमित्ताने आयोजित कार्यक्रमाकडे संपूर्ण जग पाहत आहे.
शाळेतील मुलांच्या प्रभात फेऱ्या असोत किंवा
राज्यातील सिनेमागृहात चित्रपटाच्या सुरूवातीला दाखवले जाणारे गुरूजींच्या जीवनावर
आधारित गीत, माहितीपट
असो; प्रत्येक
ठिकाणाहून गुरूजींचे जीवन,
शिकवण आणि त्यांचे सर्वोच्च बलिदान हा संदेश दिला जात आहे. सरताज यांनी
गायलेले गीत, गुरूजींवर
आधारित माहितीपट ३५० वर्षांपूर्वीच्या
प्रेरक इतिहासाचा आजच्या भाषेतला 'दस्तावेज' (Document) आहे.
औरंगजेबाच्या तलवारीपेक्षा गुरुजींचा शांततेचा आणि त्यागाचा मार्ग किती शक्तिशाली
होता, हे
समजून घेण्यासाठी एकदा तरी ही कलाकृती सर्वांनी पाहायलाच हवी !
गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या शहीदीला
३५० वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने भारतभर मोठ्या प्रमाणात कार्यक्रम
होताहेत. परंतु नांदेड येथे होत असलेल्या या कार्यक्रमास विशेष असे महत्त्व आहे.
या होत असलेल्या भव्य दिव्य अशा या श्री गुरू तेग बहादूर साहिब जी शहीदी आणि श्री
गोविंद साहिबजी 350 व्या
गुरतागद्दी शताब्दी कार्यक्रमास उपस्थित राहून, प्रत्येकाने इतिहासाचे साक्षीदार देखील व्हायलाच हवे.
🔗
पाहायला हवंच :
• गीत (Song) :
https://www.youtube.com/watch?v=Sj3Lwp07KxU
•
माहितीपट (Documentary)
https://www.youtube.com/watch?v=w_kI87w6NzA&t=1s
-डॉ. श्याम टरके,
सहायक संचालक (माहिती), विभागीय माहिती कार्यालय, लातूर
No comments:
Post a Comment