वृत्त क्रमांक 77
शहीदी समागम कार्यक्रमासाठी आरोग्य विभाग युद्धपातळीवर सज्ज
आरोग्य विभागामार्फत मोफत कर्करोग व एंडोस्कोपी तपासणी
नांदेड, दि. 21 जानेवारी :- नांदेड येथे श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त २४ व २५ जानेवारी रोजी मोदी मैदानावर आयोजित कार्यक्रमासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी आरोग्य विभागाने युद्धपातळीवर तयारी पूर्ण केली आहे. याठिकाणी भाविकांना आरोग्याशी संबंधीत विविध सेवा उपलब्ध करुन दिल्या आहेत. या आरोग्य सेवांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय एम. पेरके यांनी केले आहे.
मुख्य कार्यक्रम २५ जानेवारी रोजी असला, तरी भाविकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लक्षात घेता २२ ते २६ जानेवारी या कालावधीत व्यापक स्वरूपात आरोग्य सेवा व्यवस्थापन राबविण्यात येत आहे. यामध्ये सर्व शासकीय आरोग्य यंत्रणांसह नांदेड व परभणी जिल्ह्यातील महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेशी संलग्न खाजगी रुग्णालयांचा सक्रिय सहभाग राहणार आहे.
मुख्य कार्यक्रमस्थळी २ बाह्यरुग्ण विभाग (OPD) तसेच ५ खाटांचे तात्पुरते रुग्णालय उभारण्यात येणार असून, येथे तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत असंसर्गजन्य रोग, कर्करोग, दंतरोग, महिलांचे आजार यांची मोफत तपासणी, वैद्यकीय सल्ला व औषधोपचार सेवा दिली जाणार आहे.
आपत्कालीन सेवेसाठी कार्यक्रमस्थळी १० शासकीय रुग्णवाहिका तसेच टोल फ्री क्रमांक १०८ अंतर्गत १५ रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय पोटाच्या आजारांसाठी एंडोस्कोपी तपासणी तसेच कर्करोग तपासणी तज्ञ डॉक्टरांमार्फत मोफत करण्यात येणार आहे.
कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील सर्व आरोग्य यंत्रणांना स्वतंत्र कामकाजाचे वाटप करण्यात आले असून, भाविक व नागरिकांना दर्जेदार, तात्काळ आणि सुरक्षित आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयामार्फत नेत्र तपासणी शिबिरे आयोजित करून गरजूंना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात येणार आहे, तपासणीअंती वृद्ध नागरिकांना काठीचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच विविध योजनांशी संलग्न खाजगी रुग्णालयांमार्फत नांदेड शहरातील प्रमुख मार्ग, वाहनतळ तसेच भाविकांसाठी उभारण्यात आलेल्या निवासस्थानी आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यापक जनजागृतीसाठी जिल्हा, तालुका व ग्रामीण स्तरावर अरुणोदय सिकल सेल तपासणी शिबिरे, रक्तक्षय तपासणी, असंसर्गजन्य रोग तपासणी, वृद्ध व बालकांची आरोग्य तपासणी, आर.के.एस.के. कार्यक्रम तसेच आभा कार्ड निर्मिती यासाठी विशेष आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.
याशिवाय डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, विष्णुपुरी, शासकीय आयुर्वेद
महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय,
नांदेड येथे विशेष राखीव खाटांचे नियोजन करण्यात आले आहे. श्री गुरु तेग
बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या
शहीदी समागम कार्यक्रमासाठी नांदेडमध्ये येणाऱ्या भाविकांना सर्वतोपरी आरोग्य
सुविधा देण्यासाठी आरोग्य विभाग पूर्णतः सज्ज असून, नागरिकांनी या मोफत सेवांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन
जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
00000
No comments:
Post a Comment