वृत्त क्रमांक 30
“हिंद दी चादर” कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व समित्यांनी समन्वय ठेवावा : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला सर्व समित्यांचा सविस्तर आढावा
नांदेड, दि. ९ जानेवारी : श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमानिमित्त “हिंद दी चादर” हा भव्य व ऐतिहासिक कार्यक्रम २४ व २५ जानेवारी रोजी नांदेड येथे होत आहे. या कार्यक्रमास देश-विदेशातून सुमारे १० लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता असून, येणाऱ्या भाविकांच्या सोयी-सुविधांसाठी सर्व समित्यांनी दिलेली जबाबदारी वेळेत पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले.
आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे या कार्यक्रमासाठी गठीत करण्यात आलेल्या २५ समित्यांचा सविस्तर आढावा जिल्हाधिकारी यांनी घेतला. यावेळी प्रत्येक समितीने आतापर्यंत केलेल्या कामाचा सविस्तर आढावा घेऊन पुढील नियोजनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या आढावा बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, महानगरपालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, अपर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदीप गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, उपजिल्हाधिकारी अजय शिंदे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, मुख्यमंत्री सहायता निधी राज्य समन्वयक डॉ. रितेश पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
नांदेड येथे तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा असल्यामुळे येथील समागमाचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे नमूद करत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले की, या कार्यक्रमासाठी विविध ९ समाजांचे महंत व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे हा कार्यक्रम गुरुघर समजून येणाऱ्या प्रत्येक भाविकांचा यथोचित सन्मान होईल, यासाठी सर्वांनी जबाबदारीने व समन्वयाने कार्य करावे. या भव्य ऐतिहासिक कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सामाजिक संस्था, उद्योजक, होमगार्ड, नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात योगदान द्यावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जागरण व्यवस्थापन समिती, मैदान व्यवस्थापन समिती, मंडप व्यवस्थापन समिती, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थापन समिती, सुरक्षा व्यवस्थापन समिती, स्वयंसेवक व्यवस्थापन समिती, अतिथी स्वागत समिती, लंगर/भोजन व्यवस्थापन समिती, स्वच्छता व्यवस्थापन समिती, वैद्यकीय सेवा समिती, विद्युत व ध्वनी व्यवस्थापन समिती, प्रसिद्धी व मीडिया समिती, कार्यक्रम सादरीकरण समिती, ध्वज व सजावट समिती, आर्थिक व्यवस्थापन समिती, शासकीय परवानगी समिती, जुताघर व्यवस्थापन समिती, जलपुरवठा समिती, महिला सेवा समिती, ज्येष्ठ नागरिक समिती, जिल्हा समन्वय समिती, स्वरूपा व्यवस्थापन समिती, सुरक्षा व तपासणी समिती, निवास व्यवस्थापन समिती, प्रदर्शनी समिती तसेच राखीव समिती यांनी केलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला. तसेच समिती प्रमुखांना येणाऱ्या अडचणी, आवश्यक मनुष्यबळ व साहित्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
00000
कृपया सोबत - वृत्त चित्रफित लिंक
https://drive.google.com/file/
No comments:
Post a Comment