वृत्त क्रमांक 24
“हिंद की चादर” कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्वांचे योगदान आवश्यक - जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
नांदेड, दि. 9 जानेवारी : नांदेड येथे दिनांक 24 व 25 जानेवारी 2026 रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत “हिंद की चादर” या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्वांचा सक्रिय सहभाग व योगदान आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.
या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज जिल्ह्यातील विविध संघटना, उद्योजक, होमगार्ड समदेशक तसेच विविध स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून कार्यक्रमास सहकार्य व योगदान देण्याचे आवाहन केले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, तहसीलदार संजय वारकड, विविध संघटनांचे प्रतिनिधी, जिल्ह्यातील उद्योजक, होमगार्ड समदेशक आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. कर्डिले यांनी सर्वांनी सकारात्मक भूमिकेतून कार्यक्रमात सहभागी होत सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन केले. त्यांच्या या आवाहनाला सर्व संघटनांच्या प्रतिनिधींनी सकारात्मक प्रतिसाद देत संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने दोन आढावा बैठका घेण्यात आल्या. पहिली आढावा बैठक सकाळी ११ वाजता संपन्न झाली. या बैठकीस स्कूल बस चालक संघटना, होमगार्ड समदेशक, उद्योजक तसेच विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. त्यानंतर हॉटेल असोसिएशन, व्यापारी संघटना व विविध स्वयंसेवी संस्था (NGO) यांच्या सहभागाने दुसरी आढावा बैठक घेण्यात आली.
दोन्ही बैठकीत “हिंद की चादर” कार्यक्रमाच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी करावयाच्या कामांचे नियोजन, प्रचार-प्रसिद्धी, समन्वय तसेच प्रभावी अंमलबजावणीबाबत उपस्थितांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. कार्यक्रम व्यापक स्तरावर पोहोचावा यासाठी सर्व संबंधितांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
00000
No comments:
Post a Comment