Friday, July 28, 2023

अंगणवाडी कर्मचारी भरतीसाठी उमेदवारांनी कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये - जिल्हा कार्यक्रम अधिकारी आर.पी.काळम

वृत्त क्र. 459

 अंगणवाडी कर्मचारी भरतीसाठी उमेदवारांनी

कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये

-         जिल्हा कार्यक्रम अधिकारी आर.पी.काळम

नांदेड (जिमाका) दि. 28 :-  एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत नांदेड जिल्ह्यात मिनी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस या पदांची पदभरती प्रक्रिया चालू आहे. ही प्रक्रिया उमेदवारांच्या पात्रतेच्या निकषाप्रमाणे गुणवत्तेवर पारदर्शक करण्यात येत आहे.  इच्छूक उमेदवारांनी कोणत्याही भूलथापांना अथवा कसल्याही प्रकारच्या प्रलोभनास बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी आर.पी. काळम यांनी केले आहे.

 

या प्रकरणी कुणीही व्यक्ती अथवा शासकीय अधिकारी वा कर्मचारी रक्कमेची मागणी करीत असल्यास त्यास विरोध करुन याची माहिती जिल्हा परिषदेस द्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले. मिनी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस या दोन्हीही पदांसाठी महिला व बाल विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार भरती करण्यात येत आहे. या शासन निर्णयानुसार उमेदवारांची शैक्षणिक अर्हता इयत्ता 12 वी उत्तीर्ण असावी. उमेदवार त्याच गावातील रहिवासी असणे बंधनकारक आहे. तसेच विधवा व अनाथ उमेदवारांना अतिरिक्त गुण देण्याचे निर्देश आहेत. याशिवाय पदवी, पदव्युत्तर पदवी, डीएड, बीएड तसेच एमएससीआयटी व अंगणवाडीच्‍या कामकाजाच्‍या अनुभवासाठी देखील अतिरिक्त गुण देण्‍यांचे निर्देश आहेत. याशिवाय जात प्रवर्गासाठी देखील अतिरिक्त गुणदान द्यावयाचे आहे.

 

ही भरती ही गुणवत्तेच्या आधारे व उमेदवारांनी सादर केलेल्या सर्व कागदपत्रानुसार गुणदान करण्यात येणार आहे. सर्वांत जास्‍त गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवाराची निवड करण्यात येईल. यासाठी प्राथमिक गुणवत्ता यादी जिल्ह्यातील सर्व प्रकल्प कार्यालयात 31 जुलै 2023 रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे. त्यानंतर यादीवरील आक्षेप मागवून त्याचा निपटारा करण्यात येईल. गुणवत्तेच्या आधारे नियुक्तीस सर्व पात्र ठरलेल्या उमेदवारांना 15ऑगस्ट 2023 पर्यंत नियुक्ती आदेश देण्यात येणार आहेत, असे जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...