Monday, March 30, 2020


कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ;
कामगार स्थलांतरीत होणार नाहीत यादृष्टिने
आस्थापना प्रमुखांनी उपाययोजना कराव्यात
-         जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर
नांदेड, दि. 30 :- कामगार स्थलांतरीत होणार नाहीत यादृष्टिने विविध आस्थापना प्रमुखांनी उपाययोजना कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. विपीन इटनकर यांनी यांनी आदेशाद्वारे दिले आहेत.
लॉकडाऊन आदेशामुळे  बंद उद्योग व्यवसायातील, साखर कारखाने, कृषी उत्पन्न बाजार समितीतील  प्रभावीत झालेले कामगार, परराज्यातील विस्थापीत कामगार  यांचे स्थलांतरामुळे लॉकडाऊन सोशल डिस्टन्स उपाययोजनेच्या  मानकाचे  उल्लंघन  होऊ नये यासाठी जिल्हा उपनिबंधक (सह.संस्था), महा. औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी, जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव, सहायक कामगार आयुक्त, राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प, सार्वजनिक बांधकाम विभाग, पंतप्रधान ग्रामसडक, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे सर्व कार्यकारी अभियंता या विभागांच्या अधिनस्त सर्व आस्थापना प्रमुखांमार्फत कामगारांच्या बाबतीत पुढीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले आहेत. 
नमूद ठिकाणी असलेले कामगार हे  स्थलांतरीत होणार नाहीत यादृष्टिने  आस्थापना  प्रमुखांनी रस्ते, इमारत, इतर बांधकामासाठी  कंत्राटदाराकडील कामगार सुरक्षा रक्षक नेमावे. यातून कामगार स्थलांतरीत होवून  इतर ठिकाणी आढळल्यास त्याची  जबाबदारी आस्थापना प्रमुखांवर राहील. कर्मचारी, कामगारांसाठी संबंधीत साखर कारखाना, आस्थापना प्रमुख, संबंधित कंत्राटदार यांनी त्यांच्यासाठी आवश्यक  असलेली  सुविधा देण्यासाठी  निवारागृह, भोजनाची व्यवस्था करावी. अशा परिस्थितीत सोशल डिस्टन्स उपाययोजनेची अंमलबजावणी करावी. तसेच त्यांची वैद्यकीय तपासणी, औषोधोपचाराची  काळजी घ्यावी.
या कामात  दिरंगाई  केल्याचे निदर्शनास आल्यास त्यांचे विरुद्ध महाराष्ट्र कोव्हीड- 19 उपायोजना नियम 2020 मधील तरतुद व भारतीय दंड संहिताचे कलम 188 नुसार कारवाईची तरतूद आहे, याची नोंद घ्यावी. कामगाराची नियमित माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील समन्वय अधिकारी तहसीलदार  (सामान्य)  प्रसाद कुलकर्णी dygennanded@gmail.com या ई-मेलवर कळ‍वावी. अन्य तक्रारी, अडचणी, अधिक माहितीसाठी महा. औद्यो. विकास महामंडळ प्रादेशिक अधिकारी श्री भिंगारे मो.  9975597711  कामगार आयुक्त सय्यद मोहसीन सहायक  मो. 7276216066  यांच्याशी संपर्क साधवा.
अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून कामात दिरंगाई, निष्काळजीपणा केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 च्या कलम 51 व इतर अनुषंगिक कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असेही निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. विपीन इटनकर यांनी आदेशात नमूद केले आहे.
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...