Friday, September 21, 2018



आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या
          23 सप्टेंबर रोजी नांदेड जिल्ह्यात शुभारंभ
नांदेड, दि. 21 :- देशभरात प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तथा आयुष्यमान भारत या योजनेचा शुभारंभ रविवार 23 सप्टेंबर 2018 रोजी मा. प्रधानमंत्री भारत सरकार यांच्या हस्ते झारखंड राज्यातील रांची येथे होणार आहे. तद्वतच देशात प्रत्येक जिल्ह्यामध्येही या योजेनेचा शुभारंभ केंद्रीय मंत्री किंवा पालकमंत्री यांच्या शुभ हस्ते होत आहे. नांदेड जिल्ह्यात 23 सप्टेंबर रोजी नियोजनभवन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे दु. 12 ते 2.30 या कालावधीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  
            या आयुष्यमान भारत योजनेत पात्र लाभार्थी ग्रामीण भागातील अनुसूचित जाती-जमातीचे दारिद्र रेषेखालील कुटुंब, भूमिहीन कुटुंब, दिव्यांग सदस्य असलेले कुटुंब, अतिकष्टाचे काम करणारे कुटुंब, एकाखोलीचे कच्चे घर असलेले कुटुंब, महिला कुटुंब प्रमुख असलेले, 16 ते 59 वयोगटातील प्रौढ व्यक्ती नाही, असे कुटुंब याचा या योजनेत सहभाग आहे. तर शहरीभागातील कचरा वेचणारे कुटुंब, भिकारी, घरकाम करणारे, रस्त्यावर विक्री करणारे, बांधकाम, रंगकाम, प्लंबर, गवंडी, वेल्डर, गटई कामगार, फेरीवाले, झाडू मारणारे / सफाई कामगार, हस्तकला कारागीर, शिंपी, वाहतूक कर्मचारी, चालक, वाहक व सायकल रिक्षा ओढणारे, दुकानात काम करणारे शिपाई, अटेंडट, हॉटेल वेटर, मेकॅनिक / वीजतंत्री, असेम्ब्ली , दुरुस्ती करणारे, धोबी आणि चौकीदार या वर्गीकरणातील कुटुंब या योजनेत पात्र आहेत.
            या कुटुंबाना प्रति वर्षी प्रति कुटुंब आरोग्यासाठी रु. 5 लक्ष विमा संरक्षण राहणार आहे. या योजनेंतर्गत त्या कुटुंबाना ठराविक आजारासाठी संपूर्ण देशभरातील कोणत्याही मान्यता प्राप्त रुग्णालयात उपचार घेता येतील. यासाठी लाभार्थी कुटुंबाना ई-कार्ड देण्यात येणार आहेत.
यासाठी जी रुग्णालये संलग्न करण्यात येतील त्या रुग्णालयातील आरोग्य मित्र हे ई-कार्ड देतील. सन 2011 एस.ई.सी.सी. च्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात या योजनेखाली 2 लाख 77 हजार 999 कुटुंब हे पात्र आहेत. सद्यस्थितीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी व उपजिल्हा रूग्णालय मुखेड हे दोन रुग्णालय संलग्नित करण्यात येणार आहेत.
या योजनेंतर्गत 1 हजार 122 आजारांचा समावेश करण्यात आलेला आहे. तसेच तूर्त राज्यात सध्या महात्मा ज्योतिबा फुले जन-आरोग्य योजना ह कार्यान्वित आहे. आयुष्यमान भारत योजनेसोबतच ह योजना चालू राहणार आहे. आयुष्यमान भारत योजनेत किरकोळ व मोठे आजार यांच्या उपचारांचा समावेश आहे. हे या योजनेचे वैशिष्ट्य होय. तेंव्हा या योजनेचा लाभ लाभार्थ्यांना घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी  अरुण डोंगरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. पी. कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विद्या झिने व या कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक डॉ. विलास सर्जे यांनी केले आहे.
0000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 409   वादळी वारे वाहण्याची ,   विजेच्या कडकडाटासह , ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता   नांदेड दि.  6  मे :-   प्रादेशिक ...