Friday, September 21, 2018

लेख - "एल सी डी सी" नवीन कुष्ठरुग्ण शोध मोहिम 2018


"एल सी डी सी" नवीन कुष्ठरुग्ण शोध मोहिम 2018

          कुष्ठरोग हा अति प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेला रोग आहे या रोगाची माहिती अनेक पाठ्यपुस्तकातून आपणास मिळते. फार पूर्वी या रोगास महारोग म्हणत होते व हाच शब्द पुढे असाच प्रचलित झाला आहे. या रोगाची विद्रुपता पाहूनच या रुग्णाला समाजाने महारोगी असे नाव दिले व ते नाव आजही प्रचलित आहे. कुष्ठरोग झालेल्या रुग्णास फार वर्षापूर्वी वाळीत टाकले जायचं त्याला हीन दर्जाची वागणूक दिली जायची. यामुळे रुग्णास उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध रहात नव्हते. यामुळे नाईलाजाने तो कुष्ठरुग्ण दारोदारी भिक मागत असे. या रुग्णांकडे सर्वप्रथम कोणी पहिले असेल तर ते ख्रिशनमिशनर्यांनी. भारतात यांनीच या रुग्णांसाठी मोठी-मोठी दवाखाने उभारली व यांची सेवा ते करू लागले.
       भारतात डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन, विनोबा भावे व महात्मा गांधीजी यांनी या रुग्णांची सेवा केली व अलीकडील काळात बाबा आमटे यांना आपण कधीही विसरणार नाही कारण त्यांनी कुष्ठरुग्णांसाठी खूप कार्य केले आहे.
       सन 1873 मध्ये या कुष्ठजंतूचा शोध डॉ. आरमार हन्सन या नॉर्वे देशाच्या शात्रज्ञाने लावला व याला मायाकोबाक्टेरीम लेप्री हे नाव दिले. कुष्ठरोग हा रोग याच जिवाणूमुळे होतो. हा जीवाणू फक्त माणसाच्या शरीरातच राहतो व हा रोग मानवापासून मानवास होतो. हा अल्पसासंर्गीक असून आजमितीला यावर प्रतिबंधात्मक लस तयार झाली आहे पण ती अद्याप प्रयोग अवस्थेत आहे. मात्र याचा नायनाट करता येईल अशी खात्री जागतिक आरोग्य संघटनेला आली आहे. अगदी लवकरात लवकर रोगाचे निदान करून औषधोपचाराखाली आणल्यास कुष्ठरोग पुर्णपणे बरा  होतो. या रोगाचे जंतु मानवी शरीरात प्रवेश करतात तेव्हा त्याचा पेशीजालाशी संघर्ष होतो. यात जंतु व पेशीजाल याचा नाश होतो या प्रकाराला असांसेर्गिक रोग असे म्हणतात. दुसऱ्या प्रकारात मात्र जंतूची वाढ ही अमर्याद असते. यात रुग्णाची रोगप्रतिकारशक्ती कमी असते म्हणून रोगाची वाढ लवकर होते. प्राथमिक अवस्थेत पेशीजाल फारसे होत नाही. मात्र विकोपाला गेल्यावर ढोबळ चिन्हे मात्र दिसू लागतात. सततच्या घनिष्ठ संपर्काने एकमेकांपासून दुसऱ्यास होतो. यात सुरुवातीची लक्षणे व नंतरची लक्षणे ही प्रगत असलेली असतात व हीच लक्षणे समाजासमोर येतात. यासाठी या रोगाची भीती व तिरस्कार अनेक शतके घट्ट गैरसमजुती समाजात निर्माण करत आहे.
       शरीराच्या कोणत्याही भागावर त्वचेच्या रंगापेक्षा वेगळ्या रंगाचा लालसर चट्टा व डाग  समोर येतो.  कोडाप्रमाणे याचे डाग पांढरे नसतात, त्वचेवरील डाग समजण्यास वेळ लागतो. मात्र महत्वाची गोष्ट म्हणजे या जागची  त्वचा स्पर्शहीन होते, उष्णता व वेदना पूर्णपणे नाहीशा  होतात तसेच हे जंतू खोलवर कार्य करतात. त्यामुळे घाम येणाऱ्या ग्रंथी आणि चेतासंस्था यापूर्ण ताकदीनिशी काम करत नाहीत. भारतात बरीच रुग्ण हे असांसर्गिक असतात व काही प्रमाणात रुग्ण हे सांसर्गिक असतात व हेच रुग्ण अंगावर चट्टे, चेहऱ्यावर व कानाच्या पाळीवर गाठी येणे, भुवयाचे केस जाने, हाता-पायाची बोट वाकडी होणे क्षती पडणे, जखमा चिघळणे, कधी-कधी डोळे, कान, नाक व घश्यामध्ये गाठी दिसू लागतात तसेच चेहऱ्यावरील गाठी मुळे चेहरा सिहासारखा दिसू लागतो. कधी कधी नाकाच्या आकारात बदल होतो, अशी लक्षणे रुग्णाच्या शरीरावर दिसू लागतात.
       सन 1947 साली या रोगावर DAPSON नावाचे औषध निर्माण झाले या औषधाचा वापर सर्व जुन्या व नवीन कुष्ठरुग्णांना करण्यात येऊ लागला. या औषधाचा प्रभावामुळे सन 1955 साली महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमाची सुरुवात केली. याकाळात सर्व नवीन व जुन्या विकृती कुष्ठरुग्णांना  या औषधाखाली आणले यानंतर नवीन औषधाचा शोध चालू होता व याला सन 1981-1982 साली शंभर टक्के यश प्राप्त झाले. या औषधाचे नाव MDT हे होय. कुष्ठरोगवर हे रामबाण औषध आहे व ही औषधी आजही चालू आहे. या औषधामुळे रोगाची तीव्रता कमी झाली आहे. म्हणजेच पूर्वी M.D.T. येण्यापुर्वी दर दहा हजार लोकसंख्यामध्ये 100 ते 118 रुग्ण सापडत असे पण M.D.T. मुळे आज मितीला हे प्रमाण 1 किंवा एकापेक्षा कमी झाले आहे. म्हणजेच  आपण या रोगाचे दूरीकरण केले आहे. या यशाचे भागीदार जनता जनार्धनच आहे.
कुष्ठरोगाची लक्षणे
       फिक्कट किंवा लालसर उभारी आलेला बधीरचट्टा, जंतू परीक्षणात जंतू सापडणे, चटयावरील केस हळूहळू नाहिसे होतात, त्वचा तेलकट व चकाकणारी असते, रुग्णाच्या नसा जंतूमुळे रोगग्रस्त होतात त्या मुळे त्या जाड व दुखऱ्या होतात. वरील लक्षणे आपल्या शरीरावर आढल्यास लवकरात लवकर नजीकच्या सरकारी दवाखाण्यात दाखून घ्यावे.
       L.C.D.C.  बाबत (घरोघर सर्वे मधून नवीन  कुष्ठरुग्ण शोधून काढणे ). कालावधी - दिनांक 24 सप्टेंबर ते 9 ऑक्टोंबर 2018. उद्देश - लवकरात लवकर निवीन कुष्ठरुग्ण शोधून काढणे, विनाविक्कृती रुग्ण शोधणे व त्याला M.D.T. औषधाखाली आणणे. नवीन सांसर्गिक रुग्ण सापडल्यामुळे संसर्गाची साखळी खंडीत होऊन रोगाचा प्रसार कमी करणे, कुष्ठरोगाचे दूरीकरण साध्य करणे. कुष्ठरोगाचे प्रमाण कमी असलेल्या जिल्ह्यामधील कुष्ठरोगाचे प्रमाणाची खात्री करणे.
पध्दती
     संपूर्ण जिल्हास्तरावर अभियानाची सुरुवात, सर्व आरोग्य कर्मचारी यांचे प्रशिक्षण, आरोग्य शिक्षण कार्यक्रमाची सुरुवात यात वर्तमानपत्रात लेख म्हणी लिहणे, रेडीओ संदेश, हस्तपत्रिका वाटप करणे, शाळेत माहिती देणे, प्रभातफेरी काढणे, दवंडी देणे, ग्रामसभेमध्ये माहिती देणे, मंदिर मज्जित वरील स्पीकर्स वर माहिती देणे इत्यादी ठिकाणी प्रसिद्धी देणे. प्रत्यक्ष सर्वे 24 सप्टेंबर ते 9 ऑक्टोंबर 2018 पर्यंत आहे.
घरोघर सर्वक्षण
       हे अभियान पोलिओ कार्यक्रम जसा राबवला तसा राबविण्यात येणार आहे. अभियान संपूर्ण राज्यातील 35 जिल्ह्यात राबविले जाणार आहे. सर्वे हा आशा व पुरुष कर्मचारी किवा स्वयंसेवक असणार आहेत. हे कर्मचारी दररोज शहरी भागात 20 घरांना व ग्रामीण भागात 25 घरांना  भेटी देतील. घरातील सर्व सभासदांना  ते तपासातील यात पुरुष पुरुषाला तपासेल व स्त्री ही स्त्री सभासदास तपासेल. सर्वे हा सकाळी 7 वा. सुरु होणार आहे. अनुपस्थित सभासदांना दुपारी किंवा दुसऱ्या दिवशी तपासून घेणार आहेत. किंवा सर्वेक्षण कालावधीमध्ये तपासणी करणार आहेत.
       जे संशयीत असतील अशा सर्व रुग्णांना नजीकच्या सरकारी, निमसरकारी दवाखान्यात औषधोपचार मोफत मिळणार आहे. या मोहिमेनंतर सर्वात महत्वाची मोहीम घरोघरी  राबवली जाणार आहे. तीचा कालावधी 23 सप्टेंबर 2018 रोजी संपूर्ण राज्यात एकाच दिवशी राबवली जाणार आहे. या मोहिमेत ज्या घरात नवीन कुस्ठरुग्ण निघाला असेल अशा घरातील सर्व सहवासीताना रिफाम्पीसिन नावाची गोळी (औषध) दिली जाणार आहे. तसेच त्या रुग्णाच्या घराशेजारील यात समोरील किंवा बाजूचे घरातील सर्व सदस्यांना, एखादा नोकरदार तो खाजगी किंवा सरकारी जो रुग्णाच्या सहवासात आठवड्यातील 20 तास त्यासोबत राहत असेल किंवा एखादा शाळेत नवीन कुष्ठरुग्ण निघाला असेल अशा मुला शेजारील मुलगा, मित्र, जो रुग्णाच्या सहवासात आठवड्यातील 20 तास त्यासोबत रहात असेल अशा सहवासीताना रिफाम्पीसिन नावाची त्याच्या वजनानुसार दिली जाणार आहे. जेणे करून कुष्ठरोगाचे  निर्मुलन लवकरात लवकर  होईल. या औषधामुळे जे कुष्ठरुग्ण आज पर्यन्त एम डी टी खाली आले नाहीत, असे रुग्ण  समाजात रोगाचा प्रसार करत आहेत. अशांना ही गोळी कुष्ठरोग जंतूचा प्रसार न होण्यास मदत करते. यासाठी सर्व समाज घटकांनी या मोहिमेस प्रतिसाद द्यावा. रिफांपसीन गोळी (औषध) कोणास देऊ नये. यात गर्भवती स्त्री, दोन वर्षाखालील बालकास, ज्यांना उच्च रक्तदाब आहे, ज्यांना किडणीचा आजार किंवा त्रास आहे, पोटाची उजवी बाजू दुखत असेल तर, रुध्यरोगाचा आजार असेल तर  यांना देऊ नये.    
       आपल्या घरी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना घरातील सर्व सभासदांची तपासणी करुन घेण्यास आपण सर्वांनी सहकार्य करावे. जेणे करुन आपण कुष्ठरोगाचे लवकरातलवकर निर्मुलन करु व भारत कुष्ठरोग मुक्त करु.   
                                                                                       सुनिल पाटील
                                                                                          अवेद्यकीय  सहायक
                                                                                सहायक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग
                                                                                           कार्यालय नांदेड
0000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 409   वादळी वारे वाहण्याची ,   विजेच्या कडकडाटासह , ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता   नांदेड दि.  6  मे :-   प्रादेशिक ...