Thursday, December 14, 2017

श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेत फळे,
भाजीपाला, मसाला पिकाचे प्रदर्शन व स्पर्धा
नांदेड, दि. 14 :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेत शनिवार 16 डिसेंबर ते बुधवार 20 डिसेंबर 2017 या कालावधीत जिल्हा परिषदेच्या कृषि विभागाच्यावतीने जिल्हास्तरीय फळे, मसाला पिके व भाजीपाला प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी सहभाग वाढविण्यासाठी संबंधीत पंचायत समितीच्या कृषि अधिकाऱ्यांकडे शुक्रवार 15 डिसेंबर 2017 पर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन कृषि विकास अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांनी केले आहे.
शेतकऱ्यांनी या प्रदर्शन व स्पर्धेत मोठ्या प्रमाणावर भाग घेण्यासाठी स्वत:च्या शेतातील फळे, मसाला पिके व भाजीपाल्याचे नमुने माळेगाव यात्रेत कृषि विभागाच्या स्टॉलवर शनिवार 16 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत घेवूत यावेत. या प्रदर्शनात जिल्ह्यातील फळे, मसाला पिके व भाजीपाला पिकाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनी स्वत:च्या शेतातील फळे, भाजीपाला पिकाचे उत्कृष्ट नमुने आणून ठेवावेत. प्रदर्शनात ठेवलेल्या फळे, मसाला पिके व भाजीपाल्यांच्या नमुन्यास प्रत्येक वाणातून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढण्यात येणार आहे. विजेत्या शेतकऱ्यांना प्रथम बक्षीस रुपये 4 हजार रुपये, द्वितीय बक्षीस 3 हजार रुपये, तृतिय बक्षीस 2 हजार रुपये असे रोख बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
स्पर्धेसाठी निकष पुढीलप्रमाणे आहेत. शेतकऱ्यांना फळे, भाजीपाला स्पर्धेत फळे, भाजीपाला, मसाला, पिके यापैकी एकाच नमुन्यासाठी बक्षीस मिळेल. त्यामुळे त्यांनी त्यांच्या शेतात लागवड केलेला चांगल्या प्रतीचा एकच नमुना आवश्यक त्या कागदपत्रासोबत आणावा. फळे, भाजीपाला, मसाला पिकाच्या नमुन्यांसोबत शेतकऱ्याचा अर्ज अनिवार्य आहे. सात/बारावर सदर पिकाची नोंद असावी. सात/बारावर नोंद नसल्यास संबंधीत तालुक्यातील कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक, ग्रामसेवक व तलाठी यापैकी कोणत्याही अधिकारी, कर्मचारी यांचे प्रमाणपत्र स्वाक्षरी व शिक्यासह असावे. शेतकरी नांदेड जिल्ह्याचा रहिवासी असावा. प्रत्येक नमुना देतेवेळी बोरे, गाजर, पेरु, आवळा, चिंच, टोमॅटो, वांगी, वाटाणा, पानकोबी, कांदा, मिरची, मुळा, फुलकोबी, काकडी, भेंडी, कारले, दोडका, शिमला मिरची, पालक, शेवगा, हळद, अदरक इत्यादी नमुन्याचे वजन हे किमान एक किलो असावे. पपई नमुने किमान तीन नग, काशीफळ व भोपळा नमुना किमान एक नग असावा. सिताफळ, रामफळ, मोसंबी, संत्रा, पेरु, लिंबु, डाळींब इत्यादी नमुना असल्यास किमान 5 नग असावेत. प्रत्येक वाणात किमान 5 स्पर्धक असणे बंधनकारक आहे. तेवढे स्पर्धक नसल्यास त्या पिकासाठी स्पर्धा रद्द करण्यात येणार आहे. बक्षीसाची रक्कम डीडीद्वारे संबंधीत पंचायत समितीमार्फत देण्यात येईल. बक्षीस वितरणापुर्वी संबंधीत पंचायत समितीचे कृषि अधिकारी यांचेमार्फत लागवड असलेल्या प्लॉटची तपासणी करण्यात येईल व त्यानंतरच बक्षीस वितरण होईल.

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   405   नांदेड जिल्ह्यात ड्रोन उडविण्यास प्रतिबंध नांदेड दि. 3     - नांदेड जिल्ह्यात   4   ते   7   मे 2024   या कालावधीत ड्रो...