Tuesday, December 27, 2022

 आधार नोंदणी करून दहा वर्षे झालेल्या

नागरिकांनी केवायसी अपडेट करून घेणे आवश्यक

- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 

नांदेड (जिमाका) दि. 27 :- ज्या नागरिकांनी आधार नोंदणी करून दहा वर्षे पूर्ण केले आहेत, त्यांनी आपले आधार केवायसी अपडेट करून घ्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय आधार समितीचे अध्यक्ष अभिजीत राऊत यांनी केले.

 

या आधार नोंदणीबाबत माहिती व तंत्रज्ञान विभागाचे उपसंचालक यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे निर्देश दिले आहेत. जिल्ह्यातील नागरिकांनी आधारबाबत काही समस्याचे निराकरण करण्यासाठी टोल फ्री क्रमांक 1947 व ईमेल आयडी help@uidai.in  यावर संपर्क करावा. आधार सेवेसाठी शुल्क ही पुढीलप्रमाणे आहे. नवीन आधार नोंदणी व अनिवार्य बायोमॅट्रिक अपडेट डेमोग्राफिक अपडेटसह किंवा त्याशिवाय ही मोफत आहे. डेमोग्राफिक अपेडट नाव, पत्ता, जन्म दिनांक, लिंग, मोबाईल क्रमांक, ई-मेलसाठी 50 रुपये तर बायोमॅट्रिक अपडेट डेमोग्राफिक अपडेटसह किंवा त्याशिवाय शंभर रुपये शुल्क आहे. एकाचवेळी किंवा त्यापेक्षा जास्त माहिती बायोमॅट्रिक / डेमोग्राफिक अपडेट करणे ही एकच विनंती मानली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

00000 

 कोरोनाच्या आव्हानाला पेलण्यासाठी

नांदेड जिल्हा प्रशासनाची जय्यत तयारी

 

जिल्ह्यातील कोविड समर्पित 12 रुग्णालयांमध्ये घेतली रंगीत तालीम

गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे अधिक सुरक्षित  

 

नांदेड (जिमाका) दि. 27 :- जगभर कोरोनाच्या नव्या लाटेसंदर्भात अधिक काळजी केली जात असून शासनाच्या निर्देशाप्रमाणे नांदेड जिल्ह्यात त्यादृष्टिने जिल्हा प्रशासनातर्फे युद्धपातळीवर तयारी केली आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी नुकताच जिल्हातील आरोग्य सेवा-सुविधांचा आढावा घेऊन ज्यांचे लसीकरण राहिलेले आहे त्यांच्या लसीकरणाला प्राधान्य देऊन त्यावर भर देण्याचे निर्देश दिले आहेत.

 

शासनाच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यातील आरोग्य विभागाने सर्व साधन व सेवा-सुविधांची रंगीत तालीम घेऊन पूर्व तयारी केली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात वैद्यकियदृष्ट्या मुबलक प्रमाणात सेवा-सुविधा उपलब्ध आहेत. मागील कोविडच्या लाटेत सर्वाधिक 35 मे. टन पर्यंत ऑक्सिजनची मागणी गेली होती. त्यावेळेसच्या मागणीच्या तीनपट पेक्षा अधिक आता जिल्ह्यातील ऑक्सिजन क्षमता झाली आहे. सद्यस्थितीत 178.99 मे. टन ऑक्सिजन सुविधा आहे. यात आणखी 45.82 मे. टन ऑक्सिजन क्षमता वाढविली जात आहे. जिल्ह्यात समर्पित कोविड रुग्णालयामध्ये सुमारे 1190 खाटा अर्थात बेडस् सुविधा आहे.

 

मागील कोविड लाटेत कोविड रुग्णांच्या उपचारासाठी बेडसची संख्या 4 हजारापर्यंत वाढविण्यात आली होती. जिल्ह्यात सर्व शासकीय रुग्णालयामध्ये सुमारे 250 व्हेंटीलेटरची सुविधा आहे. हे सर्व यंत्रणा आज रंगीत तालमीमध्ये तपासून घेण्यात आली. भविष्यात गरज जर भासलीच तर त्यात कोणतीच त्रुटी असता कामा नये यावर जिल्हा प्रशासनाने भर दिला आहे. टेस्टींग किटस् मुबलक प्रमाणात आहेत. मुखेड येथे उपजिल्हा रुग्णालयात आरटीपीसीआर केंद्र साकारले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राकडे 68 रुग्णवाहिका तर शासकीय रुग्णालयाकडे इतर 36 रुग्णवाहिका असा एकुण 107 रुग्णवाहिका प्रत्येक ठिकाणी तयार आहेत. याचबरोबर इतर 25 रुग्णवाहिका जिल्ह्यात तत्पर आहेत.

 

जिल्हा प्रशासनाने कोविडच्यादृष्टिने पूर्व तयारी केलेली आहे. शासनाच्या निर्देशाप्रमाणे यात वेळोवेळी आढावा घेतला जात आहे. नागरिकांनी घाबरून न जाता लसीकरण, मास्क यासाठी अधिक सतर्क राहून काळजी घेतली पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

00000      




Monday, December 26, 2022


 


 

 


 वृत्त

 साहिबजादा यांच्या बलिदानाला स्मरण करून

लाखो विद्यार्थ्यांनी घेतली धैर्याची शिकवणूक

- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत 

·  नांदेडमध्ये आयोजित रॅलीला विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व सहभाग

·  साहिबजादा बाबा जोरावर सिंघजी व बाबा फतेह सिंघजी यांच्या वीर बलिदानापासून घेतली प्रेरणा 

नांदेड (जिमाका) दि. 26 :- साहिबजादा बाबा जोरावर सिंघजी व बाबा फतेहसिंघजी यांच्या शौर्य व बलिदानाची गाथा पोहचविण्यासाठी आयोजित केलेल्या रॅलीला आज विद्यार्थ्यांनी उदंड प्रतिसाद दिला. नांदेड शहरातील सुमारे 65 शाळातून 5 हजार विद्यार्थ्यांनी साहिबजादे यांच्या धैर्य, साहस, बलिदान यांचे कृतज्ञता पूर्वक स्मरण करुन एकात्मतेवर घोषणा देवून परिसर निनादून टाकला. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ. पी. सी. पसरीचा, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवून रवाना केले. यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी सविता बिरगे, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार व गुरुद्वारा बोर्डाचे पदाधिकारी उपस्थित होते.   

सकाळी 8.30 वाजेपासून सुरु झालेल्या रॅलीत विविध शाळांनी साहिबजादा यांच्या बलिदानाचे स्मरण करुन देणाऱ्या देखाव्यासह, महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाची सहिष्णुता दर्शविणारी दिंडी, पंजाब आणि महाराष्ट्रातील अध्यामिक नाते दृढ करणाऱ्या संत नामदेव महाराजाच्या वेशभुषेसह विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठया उत्साहात सहभागी झाले. विद्यार्थ्यांच्या या विविध सादरीकरणासह या रॅलीचे आकर्षण जबलपूर येथून आलेल्या बँडचे पथकही ठरले. अनेक देशभक्तीपर गीते त्यांनी सादर करुन नांदेडकराची मने जिंकली.    

साहिबजादा यांच्या बलिदानाला स्मरण करून

लाखो विद्यार्थ्यांनी घेतली धैर्याची शिकवणूक

-         जिल्हाधिकारी अभिजीत राऊत 

साहिबजादा बाबा जोरावर सिंघजी व बाबा फतेहसिंघजी  यांनी दिलेल्या बलिदानापासून प्रेरणा घेता यावी, त्यांच्या धैर्याचा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा, त्यांच्या बलिदानाप्रती कृतज्ञतेचा भाव अधिक वृद्धिंगत व्हावा आणि सहिष्णुता व एकतेचा विचार सर्वांपर्यंत पोहचावा या उद्देशाने हा उत्सव आपण घेतला. महाराष्ट्र शासन व गुरुद्वाराबोर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने शिख धर्मिय व पंजाबशी असलेले नाते या दोन दिवसांच्या उत्सवातून अधिक दृढ झाल्याची भावना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी व्यक्त केली. शालेय स्तरावर निबंध स्पर्धा, वक्तृत्त्व स्पर्धा यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सुमारे 3 हजार 729 शाळांपर्यत आपण ही शौर्याची गाथा या उत्सवाच्या निमित्ताने पोहोचवीली आहे. याच बरोबर जिल्ह्यातील सुमारे 3 लाख विद्यार्थ्यांनी साहिबजादा बाबा जोरावर सिंघजी व बाबा फतेह सिंघजी यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करीत प्रेरणा घेतल्याचे त्यांनी सांगितले. 

जिल्हा प्रशासनाच्या कुशल नियोजनातून

या उत्सवाला आले लोकाभिमूख स्वरुप

-         डॉ. पी.सी. पसरीचा

या कार्यक्रमासाठी मागील दोन महिन्यापासून आम्ही शासनासमवेत एकत्र काम करीत आहोत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यासाठी पुढाकार घेवून हा वीर बाल दिवस साजरा करण्याची घोषणा केली. नांदेडचा पंजाब व शिख धर्माशी असलेला स्नेह लक्षात घेवून नांदेड येथे हा वीर बाल दिवस चांगला साजरा व्हावा यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने अचूक नियोजन केले. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी शालेय शिक्षण विभाग, महानगरपालिका व इतर विभागांचा योग्य समन्वय ठेवून नियोजन केल्यामुळे हा दिवस व नांदेड उत्सव अधिक लोकाभिमूख झाल्याच्या भावना गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ. पी. सी. पसरीचा यांनी व्यक्त केल्या.

 विविध स्पर्धाचे हे ठरले विजेते  

 वक्तृत्त्व स्पर्धा

प्रथम पारितोषिक रोख रुपये 51 हजार विजेती कु. श्रुती सावे, केंब्रिज विद्यालय नांदेड

द्वितीय पारितोषिक रोख रुपये 31 हजार. विजेती कु.चरणजित कौर गिल, दशमेश स्कूल नांदेड

तृतीय पारितोषिक रोख रुपये 21 हजार. कु. अक्षरा बरबडे, लिटल फ्लावर स्कूल, बिलोली

उत्तेजनार्थ पारितोषिक रुपये 7 हजार. विजेते पवन चंद्रकांत संगमकर, साने गुरुजी विद्यालय, बिलोली

उत्तेजनार्थ पारितोषिक रुपये 7 हजार. विजेते अपूर्वा अनिल सोनकाबंळे, विवेकवर्धीनी हायस्कुल,नांदेड

 उत्कृष्ट देखावा स्पर्धा  

प्रथम पारितोषिक रोख रुपये 7 हजार. विजेते संचखंड स्कुल, वीर बाल दिवस देखावा

द्वितीय पारितोषिक रोख रुपये 5 हजार. विजेते खालसा हायस्कूल, पंच प्यारे देखावा

तृतीय पारितोषिक रोख रुपये 3 हजार. विजेते जिजामाता माध्यमिक विद्यालय, बाल विवाह देखावा

उत्तेजनार्थ पारितोषिक रोख रुपये 2 हजार. विजेते शिवाजी हायस्कुल पावडेवाडी, दिंडी देखावा

उत्तेजनार्थ पारितोषिक रोख रुपये 2 हजार. विजेते महात्मा फुले हायस्कूल, एनसीसी स्काऊट गाइड देखावा

00000






Sunday, December 25, 2022

 विश्वशांतीचे केंद्र म्हणून नांदेडला विकसित करण्यावर देऊ भर - पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा

▪️ जिल्ह्यातील 15 क दर्जाच्या पर्यटन क्षेत्रावर प्राथमिक सुविधा
▪️होट्टल महोत्सवासाठी भरीव तरतूद
▪️लोकाभिमुखतेसाठी जिल्ह्यात पर्यटन समिती
▪️वीर बाल दिवस व नांदेड महोत्सवाचे उद्घाटन संपन्न
नांदेड (जिमाका) दि. 25 :- अध्यात्म, तीर्थक्षेत्र आणि पर्यटन याचा सुरेख संगम नांदेड जिल्ह्यात आहे. संपूर्ण विश्वाला आवश्यक असलेल्या शांतीचे प्रतिक म्हणून नांदेडच्या पवित्र भूमीकडे पाहिले जाते. तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वाराच्या माध्यमातून जो शांती व एकात्मतेचा संदेश दिला जातो तो अत्यंत मोलाचा आहे. येथील हे शक्तीस्थळ भक्तीसह विश्वशांतीचे केंद्र म्हणून विकसीत करण्यावर आपण सर्व मिळून भर देऊ, असे प्रतिपादन राज्याचे पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.
महाराष्ट्र शासन, पर्यटन विभाग, तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरूद्वारा यांच्या संयुक्त विद्यमाने वीर बाल दिवस व नांदेड महोत्सवाचे उद्घाटन आज गुरुग्रंथ साहिब भवन, यात्री निवास परिसर नांदेड येथे त्यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. या समारंभास पंजाबचे विधानसभेचे सभापती स. कुलतार सिंघ संधवान, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार राजेश पवार, आमदार मोहनराव हंबर्डे, खासदार स. विक्रमजित सिंघ साहनी, उपसभापती जयकिसन सिंघ, आमदार कुलवंत सिंघ, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, माजी पोलीस महासंचालक डॉ. परविंदरसिंघ पसरीचा, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी एस. जी. माळवदे, दै. तरुण भारत वृत्तपत्राचे संपादक किरण शेलार, प्रविण साले, लड्डू सिंग महाजन आदींची उपस्थिती होती.
अखंड हिंदुस्थान हीच आपली ओळख आहे. आपल्या इतिहासात जर डोकावून पाहिले तर आपल्या अखंडत्वाला वेळोवेळी तोडण्याचा इतिहास आपल्या लक्षात येईल. इथे राहणाऱ्या सर्व धर्मांनी एकात्मता ठेऊन राष्ट्रहिताला प्राधान्य दिले. आपली एकात्मता यातूनच देशाची अखंडता टिकून राहिली आहे. ही अखंडता टिकवून ठेवण्यासाठी शीख धर्माने याचबरोबर साहिबजादा बाबा जोरावर सिंघजी व साहिबजादा फतेहसिंघजी यांचे बलिदान देश कधी विसरणार नाही, असे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. देशाच्या अखंडतेसाठी ज्यांनी बलिदान दिले आहे तो इतिहास नव्या पिढी पर्यंत पोहचावा या उद्देश ठेवून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वीरबाल दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे महाराष्ट्रातील एक बुलंद संदेश नांदेड येथून देण्यास प्रारंभ करतांना आम्हाला आनंद असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री गुरूगोविंदसिंघजी यांची ही पावन भूमी आहे. श्री गुरूगोविंदसिंघजी यांनी सदैव एकात्मतेवर भर दिला. त्यांनी संहिष्णुतेवर भर दिला. त्यांनी दिलेल्या या गुरूसंदेशाला विचारात घेऊन नांदेड हे विश्वशांतीचे केंद्र म्हणून विकसीत करण्यामध्ये पर्यटन विभागाने अधिक द्यावा, अशी मागणी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली.
यावेळी सेवानिवृत्त व्हाइस चान्सलर पंजाबी युनिर्व्हसिटी पटीयालाचे डॉ. स. जसपाल सिंघजी, पंजाब कला परिषदेचे अध्यक्ष स. सुरजीत सिंघजी पातर, पंजाबी साहित्य अकॅडमीचे सेवानिवृत्त अध्यक्ष राजन खन्ना यांनी साहिबजादा बाबा जोरावर सिंघजी व साहिबजादा फतेसिंघजी यांच्या साहसाबद्दल माहिती दिली. श्री गुरूगोविंदसिंघजी यांनी धर्माचा अर्थ सत्य असल्याचे सांगितले आहे. सत्याचे पालन यातच संपूर्ण जगाच्या कल्याणाचा मार्ग असून भारताचा राष्ट्रवाद हा संताचा असल्याचे प्रतिपादन राजन खन्ना यांनी केले.
ज्या इतिहासावर आपण उभे आहोत तो इतिहास नव्या पिढी पर्यंत पोहचवणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. श्री गुरूगोविंदसिंघजी धर्मानुसार चालले म्हणून आपली अखंडता टिकून राहिल्याचे प्रतिपादन पंजाब विधानसभेचे सभापती कुलतारसिंघ संधवान यांनी केले. साहिबजादा बाबा जोरावर सिंघजी व साहिबजादा फतेसिंघजी हे येणाऱ्या पिढीचे आयकॉन असल्याचे तरुण भारत वृत्तपत्राचे संपादक किरण शेलार यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करून जिल्हा प्रशासनाच्यावतीने आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे बाल वीर दिवसानिमित्त दोन दिवस संपन्न होणाऱ्या कार्यक्रमाची रुपरेषा सांगुन प्रास्ताविक माजी पोलीस महासंचालक डॉ. परविंदरसिंघ पसरीचा यांनी केले.
*जिल्ह्यातील पर्यटनस्थळ व कौशल्य विकास विभागाबाबत पर्यटनमंत्री लोढा यांनी घेतली आढावा बैठक*
नांदेड जिल्ह्यातील पर्यटनस्थळे व तीर्थक्षेत्र यांचे महत्व लक्षात घेता यावर येत्या काळात अधिक भर दिला जाईल. रोजगार व स्वयंरोजागाराच्या संधी त्या-त्या पर्यटन तीर्थक्षेत्राच्या भागात मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकतात यादृष्टिने आमचे नियोजन सुरू आहे. पर्यटनक्षेत्राच्या विकास कामात लोकसहभागही तेवढाच महत्वाचा असतो. पर्यटनक्षेत्राच्या संदर्भात असणाऱ्या ज्या सेवासुविधा लागतात त्यात कार्य करणारे हॉटेल, गाईडस्, पर्यटनाशी काम करणाऱ्या सेवाभावी संस्था यांचा सहभाग तेवढाच आवश्यक असतो. हे लक्षात घेता जिल्हा पातळीवर पर्यटनाच्या विकासासंदर्भात अशासकीय सदस्यांची एक समिती नियुक्त करण्याचे निर्देश पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीस जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, संतोषी देवकुळे, उपविभागीय अधिकारी विकास माने, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) रेखा काळम, कौशल्य विकास विभागाच्या सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार उपस्थित होते.
जिल्ह्यातील एकुण पर्यटनक्षेत्रापैकी प्राथमिक स्तरावर क दर्जाच्या 15 पर्यटनक्षेत्रावर प्राथमिक पायाभूत सुविधा विकसीत केल्या जातील, असे पर्यटन मंत्री लोढा यांनी जाहीर केले. होट्टल महोत्सवासाठी भरीव तरतूद करून या ठिकाणी जनसुविधेच्या हिताला प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. हा महोत्सव एप्रिल ऐवजी फेब्रुवारी महिन्यात घ्यावा या सूचनेचा त्यांनी स्विकार करून पर्यटन विभागाला निर्देश दिले. याचबरोबर जिल्ह्यातील विविध तीर्थक्षेत्र व पर्यटन क्षेत्र यांना जोडणारे एक सर्किट निर्माण करून विकासावर भर देऊ असेही त्यांनी सांगितले. शंभर किमी परिसरातील जेवढी पर्यटनस्थळे येतील, तीर्थक्षेत्र येतील त्याचा यात समावेश असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
*राज्यात पाच लाख बेरोजगारांना देऊ रोजगार*
ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराच्या व स्वयंरोजगाराच्या संधी ग्रामीण पातळीवरच उपलब्ध व्हाव्यात यादृष्टिने आम्ही भर देत आहोत. खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना आयटीआय केंद्राच्या मार्फत वेगळे कोर्सेस तयार करीत आहोत. यात प्रामुख्याने सौरऊर्जा, कृषिक्षेत्र याबाबींचा विचार आम्ही केला आहे. राज्यात सुमारे पाच लाख युवकांना रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करून दिला जाईल, असे कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.
*वीर बालकांच्या शहिदांची आठवण करतांना पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी गाऊन व्यक्त केल्या भावना*
साहिबजादा बाबा जोरावर सिंघजी व साहिबजादा बाबा फतेह सिंघजी यांच्या वीर बलिदानाचे स्मरण करतांना पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांना आपल्या भावना व्यक्त करतांना “कही पर्वत झुके भी है” हे गीत गाऊन दाखविले. त्या गिताचे बोल पुढील प्रमाणे आहेत.
कही पर्वत झुके भी है,
कही दरिया रूके भी है,
नहीं रूकती रवानी है,
नहीं झुकती जवानी है।।
गुरू गोबिंद के बच्चे,
उमर मे थे अगर कच्चे,
मगर थे सिंह के बच्चे,
धर्म ईमान के सच्चे,
गरज कर बोल उठे थे यूँ,
सिंह मुख खोल उठे थे यूँ,
नही हम रूके नही सकते,
नही हम झूके नही सकते,
कही पर्वत झुकें भी है,
कही दरिया रूके भी है,
नहीं रूकती रवानी है,
नहीं झुकती जवानी है।।
हमे निज देश प्यारा है,
हमे निज धर्म प्यारा है,
पिता दशमेश प्यारा है,
श्री गुरू ग्रंथ प्यारा है,
जोरावर जोर से बोला,
फतेहसिंह शोर से बोला,
रखो ईटें भरो गारा,
चुनो दिवार हत्यारों,
कही पर्वत झुकें भी है,
कही दरिया रूके भी है,
नहीं रूकती रवानी है,
नहीं झुकती जवानी है।।
निकलती स्वास बोलेगी,
हमारी लाश बोलेगी,
यही दिवार बोलेगी,
हजारों बार बोलेगी,
हमारे देश की जय हो,
पिता दशमेश की जय हो,
हमारे धर्म की जय हो,
श्री गुरू ग्रंथ की जय हो,
कही पर्वत झुकें भी है,
कही दरिया रूके भी है,
नहीं रूकती रवानी है,
नहीं झुकती जवानी है।।
कही पर्वत झुके भी है,
कही दरिया रूके भी है,
नहीं रूकती रवानी है,
नहीं झुकती जवानी है।।
00000

 





























केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...