Thursday, October 26, 2023

 वृत्त 

 

सारथी व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास

महामंडळाच्या योजनांसाठी होणार विशेष कॅम्प

 

लाभार्थ्यांना योजनांची माहिती देण्यासह अर्जांचाही होणार स्वीकार

बँकांच्या प्रतिनिधीसह संबंधित योजनांच्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी

 

नांदेड (जिमाका) दि. 26 :- महाराष्ट्र शासनामार्फत सारथी व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून विविध योजना युवकांपर्यंत पोहोचविल्या जात आहेत. मराठा समाजाच्या सर्वांगीन विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत त्यांनी महत्वपूर्ण निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसार सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी मराठा समाजातील युवकांना योजनांचा अधिकाधिक लाभ घेता यावा यादृष्टीने प्रत्येक जिल्ह्यासाठी कार्यक्रमाची रूपरेषा निश्चित करून दिली आहे.

 

या रुपरेषेनुसार जिल्हा पातळीवर कॅम्प अर्थात शिबिराचे आयोजन केले जाणार आहे. यात सारथी व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची सर्व माहिती नागरिकांना देणे, लाभार्थ्याचे अर्ज स्वीकारणे, योजनेबाबत सविस्तर माहिती पोहोचविणे, संवाद साधने यावर भर दिला जाईल.

 

सारथी संस्थेमार्फत घेण्यात येणारे कार्यक्रम

सारथी संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी चर्चासत्र आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या चर्चासत्राच्या माध्यमातून लाभधारकांशी संवाद साधण्यासह त्यांच्या मनातील ज्या काही शंका असतील तर त्याचेही निरसन केले जाणार आहे.

 

20 हजार उमेदवारांना रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षण

छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) अंतर्गत महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीस सन २०२३- २४ या वर्षात मराठा, कुणबी व कुणबी मराठा अशा एकूण 20 हजार उमेदवारांना रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट दिले आहे. त्यासाठी कौशल्य प्रशिक्षण व अभ्यासक्रमाची मागणी नोंदणीचा अर्ज विद्यार्थ्यांकडून भरून घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. एमपीएससी, यूपीएससी व इतर स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी अर्ज भरून सारथी संस्थेचे माहितीपत्रक वाटप करण्यासोबत एमकेसीएल मार्फत प्रशिक्षण घेत असलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांशी संवाद साधता येईल.

 

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास

महामंडळामार्फत घेण्यात येणारे कार्यक्रम

मराठवाडा विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये तालुकानिहाय प्रत्येक ग्रामपंचायतींपर्यंत योजनेची माहिती देण्यात येणार आहे. तालुक्याच्या ठिकाणी मेळाव्याचे आयोजन करून त्याच ठिकाणी महामंडळाचे नोंदणी करण्यासंदर्भात नियोजन करण्यात येणार आहे. महामंडळाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना त्वरित व्याज परतावा देण्यासंदर्भात कार्यवाही सुरु करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.


कृषि उद्योग व्यवसायासाठी विशेष मेळावे

मेळाव्याच्या ठिकाणी बँकेचे अधिकारी कर्मचारी तसेच काही छोट्या उद्योगाबाबत आणि कृषी अधिकाऱ्यांमार्फत कृषी संबंधी उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक माहिती देणारे अधिकारी-कर्मचारी उपस्थित राहून याबाबत माहिती देणार आहेत. संस्थांच्या विविध योजनांच्या लाभार्थ्याची निवड, व्यवसायातील प्रगती याबाबतची सारथी व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ याबाबत नियमित आढावा घेणार आहे.

 

बँकांच्या प्रतिनिधीसह संबंधित योजनांच्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी

सारथी व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची अंमलबजावणी करताना पात्र लाभार्थ्यांना तात्काळ योजनांचे लाभ मिळवून देण्याबाबतच्या शिबिराचे आयोजन संबंधित विभाग प्रमुख, बँक अधिकारी, यांच्या समन्वयातून केले जाईल.

 

सारथी तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या विविध योजनांची माहिती सविस्तरपणे सांगून पात्र लाभार्थ्यांपर्यंत या संस्थांच्या योजना पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यासोबत शिबिराचे आयोजन होईल. हे शिबीर यशस्वीरित्या करण्यासाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, महानगरपालिका, सारथी, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ नियोजन करीत आहेत.

00000

Wednesday, October 25, 2023

निवृत्तीवेन धारकांना आवाहन   

 

नांदेड (जिमाका) दि. 25 :- जिल्हा कोषागाराअंतर्गत निवृत्तीवेतन घेणारे सर्व निवृत्तीवेतनधारक  कुटुंब निवृत्तीवेतन धारकांना कळविण्यात येते कीनिवृत्तीवेतन / कुटुंब निवृत्तीवेतन धारकांच्या बँकेत अद्याक्षर निहाय यादी कोषागार कार्यालयाकडून पाठविण्यात आली आहेनिवृत्तीवेतन चालू ठेवण्याकरीता 1 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर 2023 या कालावधीत निवृत्तीवेतन / कुटुंब निवृत्तीवेतन धारकांनी प्रत्यक्ष बँकेत उपस्थित राहून यादीतील त्यांच्या नावासमोर स्वाक्षरीच्या रकान्यात शाखा व्यवस्थापकासमोर स्वाक्षरी करावी किंवा अंगठ्याचा ठसा उमटवावापुर्नविवाह तसेच पुर्ननियुक्तीबाबत माहिती लागू असल्यास ती नोंदवावी.

 

या पद्धतीशिवाय बायोमॅट्रीक्स पद्धतीने जीवन प्रमाण दाखला देण्याकरीता http://jeevanpraman.gov.in या संकेतस्थळावर नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2023 या कालावधीत सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे. सदरील यादीत ज्यांनी स्वाक्षरी अथवा अंगठा उमटविलेला नसेल अथवा ऑनलाईन जीवन प्रमाण दाखला सादर केलेला नसेल त्यांचे माहे डिसेंबर 2023 चे निवृत्तीवेतन अदा केले जाणार नाही याची नोंद घ्यावीअसे आवाहन कोषागार अधिकारी जिल्हा कोषागार कार्यालय नांदेड यांनी केले आहे.

000000

Monday, October 23, 2023

राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचे पी.एन.दिक्षीत यांचा नांदेड जिल्हा दौरा

 राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचे पी.एन.दिक्षीत यांचा नांदेड जिल्हा दौरा

नांदेड, (जिमाका) दि. 23 :-  राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचे विशेष संवाददाता पी.एन. दिक्षीत हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

रविवार 29 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी पुणे येथून वाहनाने सायं. 5 वा. नांदेड येथे आगमन. रात्री मुक्काम.  सोमवार 30 ऑक्टोबर 2023 वैद्यकीय महाविद्यालय आणि महाविद्यालयातील विविध वार्डाना भेटी व त्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्यासमवेत चर्चा. मंगळवार 31 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 2 वा. छत्रपती संभाजीनगर कडे प्रयाण करतील.

0000

भंगी ऐवजी रुखी किंवा बाल्मिकी शब्दाचा वापर करण्याबाबत शासनाचे निर्देश

 भंगी ऐवजी रुखी किंवा बाल्मिकी शब्दाचा वापर करण्याबाबत शासनाचे निर्देश


नांदेड, (जिमाका) दि. 23 :-  अनुसूचित जातीच्या यादीमध्ये अनुक्रमांक 12 वर भंगी या जातीचा समावेश आहे. त्या जातीची तत्सम जात म्हणून रुखी किंवा बाल्मिकी या जातीचा समावेश आहे. भंगी हा सफाई कामाकरीता असलेल्या रुखी जातीच्या लोकासाठी घृणास्पद व अपमानजनक बहिष्कृत अशा अर्थाने व्यवहारात प्रचलित झालेला जातीदर्शक शब्द आहे. या शब्दाचा शासन व्यवहारातील उपयोग हा या समाजाची अवहेलना करणारा ठरतो. म्हणून शासन व्यवहारातून भंगी या शब्दाचा वापर स्थगित करुन त्याऐवजी रुखी किंवा बाल्मिकी या शब्दाचा वापर करण्याबाबत दिनांक 9 नोव्हेंबर 2000 रोजी शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे.

0000

भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

 भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेत

ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 23 : - शैक्षणिक वर्ष सन 2023-24 मध्ये इयत्ता 11 वी, 12 वी, व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यास क्रमास प्रवेश घेतलेल्या महाविद्यालयातील प्रवेशीत, अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्गातील विद्यार्थ्यांनी भारत सरकार शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज www.mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भरावेत. भरलेल्या अर्जाची छायाकिंत प्रत आवश्यक त्या कागदपत्रासह आपल्या महाविद्यालयात सादर करावी असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.  

 

 

भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना, व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न असणाऱ्या विद्यार्थ्यांना निर्वाहभत्ता तसेच राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व शासनमान्य अनुदानित/विना अनुदानित/कायम विनाअनुदानित महाविद्यालयीन सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्गातील प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे नवीन व नुतनीकरणासाठी अर्ज करण्यास ऑनलाईन महाडिबीटी पोर्टलवर 11 ऑक्टोबरपासून सुरु झालेले आहे. असे समाज कल्याण विभागाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

 

नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा-2023 परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

 नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा-2023

परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

 

नांदेड, (जिमाका) दि. 23 :-  महाराष्ट्र नगरपरिषद गट-क परीक्षा-2023 च्या परीक्षा केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे  कलम 144  अन्वये जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रतिबंधात्मक आदेश निर्गमीत केले आहेत.

 

या आदेशात नमूद केलेल्या आयऑन डिजीटल झोन, इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी विष्णुपुरी नांदेड, होरिझोन इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल नांदेड,  राजीव गांधी कॉलेज कॅम्पस विद्युत नगर नांदेड, श्री संभाजी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड टेक्नालॉजी नांदेड शामल एज्युकेशन कॅम्पस देगाव रोड समोर  नांदलादिग्रस, खडकूत या 4 परीक्षा केंद्रापासून 100 मीटरच्या परिसरात 25 ऑक्‍टोंबर ते 3 नोव्हेंबर 2023 या कालावधीत  तीन सत्रात घेण्यात येणार आहे. सकाळी 7 ते रात्री  9 वाजेपर्यंतच्‍या वेळेत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी-कर्मचारी  या व्यतिरीक्त इतर कोणत्याही व्यक्तीस  प्रवेश करता येणार नाही. तसेच या दर्शविलेल्या वेळात परीक्षा केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स / एस.टी.डी./ आय.एस.डी/ भ्रमणध्वनी/पेजर/ फॅक्स/झेरॉक्स आणि ध्वनिक्षेपक चालू ठेवण्यास या आदेशाद्वारे प्रतिबंध करण्यात आले आहे.

0000

Sunday, October 22, 2023

 इकडे..इकडे...इकडे...

फलंदाज डावखुरा आहे !
▪️अंधांच्या क्रिकेट स्पर्धेत सर्वांनाच जिंकायचे आहे
नांदेड (जिमाका), दि. 22 :- नांदेड येथील श्री गुरूगोविंदसिंघजी स्टेडियम मधील ग्राउंड कमालीचे नम्र झाले आहे. तीन दिवस आता दृष्टिहीन क्रिकेटपटूंना मनसोक्त खेळता यावे यासाठी की काय इथले सारे वातावरण भारावलेले आहे. एकमेकांना आधार देऊन धावपट्टीवरील दोन्ही बाजूच्या यष्ट्या आणि धावपट्टी बॉलमधील छऱ्यांच्या आवाजाने भान हरपून गेली आहेत. एष्टीवर डावखुरा फलंदाज आहे. एष्टी रक्षक “इकडे..इकडे…इकडे…” म्हणून गोलंदाजाला दिशा यावी म्हणून आवाज देत आहे. फलंदाज डावखुरा आहे असा सावध इशारा तो देत आहे. त्याचेही कान सतर्क होऊन तो बॉलच्या दिशेने पाहत आहे !
या वातावरणाला निमित्त ठरले आहे क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड ऑफ महाराष्ट्र यांच्यावतीने आयोजित अंधाच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा. या तीन दिवसीय स्पर्धेसाठी नागपूर, वर्धा, मुंबई, नाशिक, धुळे, जळगाव, सोलापूर, रत्नागिरी, नांदेड, लातूर, छत्रपती संभाजीनगर, यवतमाळ आदी ठिकाणाहून अंध क्रिकेटपटू सहभागी झाले आहे. क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड ऑफ महाराष्ट्र व मराठवाडा स्पोर्ट कॉन्सील फॉर द नांदेड या संस्थेच्यावतीने अंधाच्या या क्रिकेट स्पर्धेद्वारे खेळाडूंची निवड केली जाणार असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष पंकज चौधरी यांनी दिली. या स्पर्धेत शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडू जयदिप सिंग व इतर एशियन स्पर्धा खेळलेले खेळाडू सहभागी झाले आहेत.
भावांनो कठोर परिश्रमाशिवाय मार्ग नाही
- छत्रपती क्रीडा पुरस्कार विजेता जयदिप सिंग
लहानपनापासूनच मला खेळाची आवड होती. मी खेळाकडे जास्त वळलो व मला शाळेनेही विश्वास देऊन खेळाकडे वळविले. माझ्या शिक्षकांनी मला दृष्टी कमी आहे म्हणून कधी मनात उणीव निर्माण होऊ दिली नाही. आपण विश्वासावर उभा राहतो. विश्वासाने चालण्यासाठी, खेळण्यासाठी कठोर परिश्रमाची, कष्ट घेण्याची तयारी असली पाहिजे. भावांनो कठोर परिश्रमाची तयारी ठेवा व शिक्षणासमवेत काही कौशल्य अंगी रुजवून घ्या, असा भावनिक सल्ला छत्रपती क्रीडा पुरस्कार विजेता जयदिप सिंग यांनी दिला. मुंबई येथेच जन्मलेल्या आणि वाढलेल्या जयदिपने अंतरराष्ट्रीय पातळीवर ज्युदो स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले आहे. अनेक राष्ट्रीय, अंतरराष्ट्रीय स्पर्धेतील त्याच्या या चमकदार यशाबद्दल महाराष्ट्र शासनाने त्याचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. क्रिकेड स्पर्धेतील निवड चाचणीसाठी जयदिप ही स्पर्धा खेळत आहे. त्याच्यासमवेत नागेश करंडक राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत 5 वेळा खेळलेल्या नागपूर येथील प्रविण करलोके या क्रीडापटूचाही नांदेड येथील स्पर्धेत सहभाग आहे.
स्पर्धकांची बी-1 ते बी-3 असते वर्गवारी
आपल्या क्रिकेट स्पर्धा सारखेच अंधांच्या क्रिकेट स्पर्धाचे नियम असतात. फक्त फरक एवढाच असतो तो म्हणजे चेंडू जमिनीलाच टाकून फेकायचा. फलंदाजांना दृष्टि नसल्यामुळे त्यांना चेंडू नेमका कुठे आहे याचा अंदाज येण्यासाठी त्यात छर्रे टाकले जातात. प्रत्येक संघात 11 खेळाडू असतात. सर्व अंध. परंतू यात वर्गवारी केली गेली आहे. पूर्णत: दृष्टि नसणारे चार खेळाडू यांना बी-1 म्हटले जाते. तीन मीटर पर्यंत ज्यांना अंधूक दृष्टि आहे त्यांना बी-2 म्हटले जाते. बी-2 वर्गवारीतील तीन खेळाडू असतात तर ज्यांना 6 मीटर पर्यंतच दृष्टि आहे असा खेळाडूंना बी-3 वर्गवारीत गणल्या जाते, असे 4 खेळाडू संघात असतात. बी-1 (पूर्णत: अंध) फलंदाजासाठी धावपटू दिले जातात. एकुण 14 खेळाडूंपैकी प्रत्यक्ष 11 खेळाडूंना खेळविले जाते. या क्रिकेट स्पर्धा यशस्वी होण्यासाठी डॉ माधव गोरे, गणेश काळे, सोमेश मोतेवार, प्रशांत गवंडगावे, गणेश दातावार, दिगंबर लाभसेटवार, राजू मोतेवार, दादाभाऊ खुटे आदी परिश्रम घेत आहेत.
00000













कर्जमुक्तीचा लाभ हवा? आजच प्रक्रिया पूर्ण करा ! पात्र शेतकऱ्यांनी लाभार्थी यादीत नाव तपासून AgriStack नोंदणी आणि आधार प्रमाणीकरण पूर्ण करा. ...