वृत्त क्रमांक
“कूल रूफिंग”चा कमाल परिणाम; नांदेडमध्ये तापमानात ७ ते ८ अंशांची घट
१०० कुटुंबे व लघु व्यावसायिकांना दिलासा
नांदेड, दि. २२ एप्रिल – संस्कृती संवर्धन मंडळ, सगरोळी, प्रॅक्टीकल ॲक्शन (PAC) आणि अखिल भारतीय आपत्ती निवारण संस्था (AIDMI) यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड शहरातील विविध गरजू वस्त्यांमध्ये राबविण्यात येत असलेल्या ‘निसर्ग आधारित उपाय’ (Nature-Based Solutions) या अभिनव उपक्रमामुळे उन्हाळ्याच्या तीव्रतेवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.
या उपक्रमांतर्गत लहान व कमी उंचीच्या घरांच्या छतांवर ‘कूल रूफिंग’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यामुळे घरांच्या आतल्या तापमानात तब्बल ७ ते ८ अंश सेल्सिअसने घट झाल्याचे निदर्शनास आले आहे.
या योजनेचा थेट लाभ शहरातील विविध भागांतील सुमारे १०० कुटुंबांना होत असून, यात हातावर पोट असलेली कुटुंबे तसेच लघु व्यावसायिकांचा समावेश आहे. कडक उन्हाळ्यात घरांसह छोट्या व्यवसायिक जागांमधील उकाडा कमी झाल्याने कामकाज अधिक सुसह्य झाले असून, उत्पन्नातही सकारात्मक बदल दिसून येत आहे.
या उपक्रमाची पाहणी करण्यासाठी आज जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी विष्णुनगर परिसरातील काही लाभार्थ्यांच्या घरी भेट देत प्रत्यक्ष आढावा घेतला. लाभार्थ्यांनी घरातील आणि कार्यस्थळावरील तापमानात लक्षणीय घट झाल्याचे सांगत या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले आणि संस्थांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.
हा उपक्रम पर्यावरणपूरक उपाययोजनांच्या माध्यमातून शहरी गरीब व लघु व्यावसायिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवणारा एक प्रेरणादायी आदर्श ठरत आहे.
या भेटीदरम्यान संस्कृती संवर्धन मंडळ, सगरोळीचे संचालक रोहित देशमुख, कार्यक्रम व्यवस्थापक सर्जेराव ढवळे, प्रसिद्धी व्यवस्थापक सचिन येरमाळकर, तसेच AIDMIच्या तांत्रिक समन्वयक अरुंधती स्वामी, क्षेत्र समन्वयक शुभांगी जल्लेवार, सुभाष वाघमारे आणि चक्रधर पुयड उपस्थित होते.
00000
No comments:
Post a Comment