Friday, February 16, 2024

 वृत्त क्र. 140

 

महासंस्कृती महोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमाची थाटात सुरुवात

नवा मोंढा मैदानावर नृत्य, नाट्य, गीत, गायनाचा बहारदार कार्यक्रम

 

·    शनिवारी 'आदि माया आदि शक्ती'' कार्यक्रमाचा आविष्कार

·   प्रवेश नि:शुल्क कुटुंबासह सहभागी होण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 16 :- नांदेड महासंस्कृती महोत्सवातील कालच्या साहसी शिवकालीन क्रीडा प्रकारानंतर आज ढोलकी, सनई, हलगी, वाद्यवृंदांसह महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीतील नाट्य, वाद्य व लोकसंगीताची मैफल नवीन मोंढा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर रंगली. जिल्ह्यातील सर्व स्तरातील जनतेने मोठ्या संख्येने या सांस्कृतिक मेजवानीचा आस्वाद घेतला.

 

राज्याचा सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालय व नांदेड जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महासंस्कृती महोत्सव 15 फेबुवारीपासून सुरू झाला आहे. सुरुवातीला नांदेड जिल्ह्यातील प्रथितयश कलावंतांचे सादरीकरण झाले. यामध्ये पारंपारिक पाटा गायनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. (मोहन मेश्राम आणि संच) आदिवासी भागामध्ये हे गायन अतिशय लोकप्रिय आहे. शिवराज शिंदे व चमूचे लोकवाद्यवृंद (फोक आर्केस्ट्रा), अंजली देशमुख यांच्या सुहासिनी क्रीएटीव्ह चमूमार्फत पारंपरिक मंगळागौर सादर करण्यात आली. बापुराव शेडमाथे ढेमसा मंडळामार्फत (शिवरामखेडा) किनवट यांचे दंडार नृत्य, शिवराज शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरील पोवाडा सादर केला. सनई, हलगी वादन (दिलीप खंडेराय) लोकसंगीत (अंध विद्यालय बोधडी) कोलाम समूह नृत्य (मनीषा मडावी व चमू) लेहंगी नृत्य (सेवालाल बंजारा मंडळ मांडवी) दिवली लोकनृत्य (एमजीएम महाविद्यालय, नांदेड), छत्रपती दर्शन (दिलीप खंडेराय) सादर करण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्राचा लोकोत्सव हा कार्यक्रम सादर करण्यात आला. सुशांत शेलार या सिने कलाकारांच्या संकल्पना आणि दिग्दर्शनात संदीप पाठक यांच्या निवेदनात नृत्य गायनाचा हा कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्यासह प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परिवारासह या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती.

   

बचत गटाचे भव्य दालन

या मैदानावर सांस्कृतिक कार्यक्रमाच्या विरुद्ध बाजूने मोठ्या संख्येने बचत गटांचे स्टॉल लावण्यात आले आहे. रानमेवा, मसाले, पादत्राणे, कपडे, घर सजावटींच्या वस्तू, कौशल्य विकास विभागापासून तर आरोग्य विभागापर्यंत विविध विभागाचे स्टॉल, विविध कृषी उत्पादने, आयोजनाची भव्यता विषद करणारे हे स्टॉल. मैदानावर कुटुंबासोबत येणाऱ्या रसिक प्रेक्षकांची वाट बघत असून मोठ्या संख्येने नांदेडकरांनी खरेदीसाठी तसेच विविध खाद्य पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी या ठिकाणी यावे असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. सायंकाळी साडेपाच वाजता जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी या दालनाचे उद्घाटन केले. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर तसेच निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर उपस्थित होते.

 

प्रवेश निःशुल्क, पासेसची गरज नाही

जिल्हा प्रशासनाने हा कार्यक्रम सामान्यातील सामान्य माणसाने बघावा यासाठी आयोजित केलेला आहे. त्यामुळे कोणत्याही प्रवेशिका या ठिकाणी आवश्यक नाही. जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने आपल्या कुटुंबासह या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

 

आजचे कार्यक्रम

17 फेब्रुवारी रोजी सायं. 6 ते रात्री 10 या कालावधीत 'आदि माया आदि शक्ती ' या कार्यक्रमात सुप्रसिध्द सिने व नाट्य कलावंताच्या बहारदार कार्यक्रमाचे तसेच प्रथीतयश स्थानिक कलावंताचे लोकसंगीताचे कार्यक्रम होणार आहे. 

000000




























No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...