Thursday, October 12, 2023

 दिव्यांग  विद्यार्थ्यांसाठी प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती” साठी

 30 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन  अर्ज भरण्याचे आवाहन

          लातूर, दि.12 (विमाका) :  केंद्र शासनाच्या दिव्यांग व्यक्तींचे सक्षमीकरण विभागा(DEPWD) मार्फत राष्ट्रीय शिष्यवृत्ती  पोर्टल (NSP) द्वारे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती ( इयत्ता 9 वी  आणि 10 वी ) शिष्यवृत्ती योजना राबविली  जाते. राष्ट्रीय शिष्यवृत्ती  पोर्टल (NSP) -2.0 पोर्टलवर (www.scholarships.gov.in) विद्यार्थ्यांची नोंदणी 01 ऑक्टोबर, 2023 पासून सुरवात झाली आहे. नोंदणी  आणि अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख  30 नोव्हेंबर 2023 असून पात्र लाभार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरावेत, असे आवाहन पुणे येथील शिक्षण संचालनालय(योजना)चे शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी केले आहे.

दिव्यांग विद्यार्थांसाठी असलेली प्री-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी  पात्रतेचे निकष :

. अनुदानित शाळांतील इयत्ता 9 वी व 10 वी च्या दिव्यांग विद्यार्थ्यांना ( CwDs ) प्री -  

     मॅट्रिक शिष्यवृत्ती दिली जाते.

. सदर विद्यार्थ्याचे दिव्यांगत्वाचे प्रमाण 40 टक्के किंवा जास्त असावे. सक्षम  

   अधिकाऱ्याचे  दिव्यांगत्वाचे वैध प्रमाणपत्र हे अपंग व्यक्तींचे हक्क अधिनियम-2016    

     मधील निकषांनुसार असावे.

. एकाच पाल्यांच्या २ पेक्षा अधिक अक्षम ( दिव्यांग ) पाल्यांना ही शिष्यवृत्ती लागू  नाही .   

   मात्र दुसरे अपत्य जुळे असल्यास त्यांना सदर शिष्यवृत्तीचा लाभ देता येईल.

4.  सदर शिष्यवृत्ती एका इयत्तेला एका शैक्षणिक वर्षासाठीच लागु राहील . विद्यार्थ्याने तीच

    इयत्ता रिपीट केल्यास या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार नाही. विद्यार्थी नियमित असावा.

5. जर विद्यार्थ्याला एकापेक्षा जास्त शिष्यवृत्ती लागू होत असतील तर विद्यार्थ्याने त्याच्या  

   सोयीनुसार लाभाची ( लाभदायी ) शिष्यवृत्ती  स्विकारुन दुसरी शिष्यवृत्ती वरिष्ठ   

   कार्यालयास कळवून रद्द करवून घ्यावी . मात्र विद्यार्थी निवास निवासासाठी देय अनुदान ,  

   किंवा अशा प्रकारची राज्यशासनाची किंवा इतर स्त्रोतांकडून पुस्तके किंवा इतर शैक्षणिक   

   साहित्य खरेदीसाठी  प्राप्त मदत स्विकारु शकतात.

6.  शिष्यवृत्तीधारक जर केंद्रशासनाच्या किंवा राज्यशासनाच्या अर्थसहाय्यित परीक्षा केंद्रावर  

   प्रशिक्षण घेत असतील तर ही शिष्यवृत्ती सदर कालावधीसाठी बंद राहील.

7. पालकांचे उत्पन्नाच्या सर्व स्त्रोतातून प्राप्त वार्षिक उत्पन्न रु.2,50,000 पेक्षा जास्त  

     नसावे.

शिष्यवृत्ती रक्कम :  दिव्यांग विद्यार्थांसाठी  वार्षिक  9,000 ते 14,600 रुपये प्री-मॅट्रिक  शिष्यवृत्ती  देण्यात येते.

ऑनलाईन अर्ज सादर केल्यावर शाळास्तर अर्ज पडताळणीची अंतिम तारीख 15 डिसेंबर,2023 तर  जिल्हास्तर अर्ज पडताळणीची अंतिम तारीख 30 डिसेंबर, 2023 असणार आहे. या योजनचे तपशील  विभागाच्या संकेतस्थळावर (www.depwd.gov.in) आणि राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (www.scholarships.gov.inवर उपलब्ध आहेत, असे शिक्षण संचालक श्री. पालकर यांनी  प्रसिद्धी पत्रकाव्दारे कळविले आहे.

या संदर्भात अधिक माहितीसाठी शिक्षण संचालनालय (योजना), महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या 020-26123515 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

 

*******

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...