Thursday, October 12, 2023

एनएमएमएस व दिव्यांग शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

 एनएमएमएस व दिव्यांग शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड, (जिमाका) दि. 12 :- 'राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकासाठी असलेली शिष्यवृत्ती (एनएमएमएस) व 'दिव्यांग  विद्यार्थ्यांसाठी  असलेली प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती' या योजनेसाठी अर्ज करण्यास 1 ऑक्टोबर 2023 पासून सुरवात झाली आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी 30 नोव्हेंबर 2023 पर्यत अर्ज करावेत, असे आवाहन शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी केले आहे.

लाभार्थ्यांचे बायोमेट्रिक प्रमाणीकरण अनिवार्य -

सन  २०२३-२४ वर्षासाठी केंद्रीय  शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या 'राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकासाठी असलेली शिष्यवृत्ती' योजनेसाठी ( एनएमएमएस) राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल ( एनएसपी ) (www.scholarships.gov.in ) वर नवीन आणि नूतनीकरण अर्जांच्या ऑनलाइन नोंदणी व अर्ज भरण्यास 1 ऑक्टोबर पासून सुरवात झाली आहे. नवीन आणि नूतनीकरण नोंदणीची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर 2023 आहे.

 जिल्ह्यामध्ये  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद  पुणे यांच्यामार्फत एनएमएमएस परीक्षेत शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये निवड  झालेल्या जिल्ह्यातील  सर्व  विद्यार्थ्यांनी 2023-24 शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता 9 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी नवीन अर्जदार म्हणून इ. 9 वी10 वी 11 वी उत्तीर्ण झालेल्या शिष्यवृत्तीधारकांना स्वतःची नोंदणी आधारनुसार करावी. यापूर्वी शिष्यवृत्ती घेत असलेल्या विद्यार्थ्यांना  शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी 10 वी, 11 वी आणि 12 वी साठी नुतनीकरण अर्जदार म्हणून स्वतःचे नुतनीकरण करावे.

केंद्र शासनाच्या अपंग व्यक्तींचे सक्षमीकरण विभाग (DEPWD) मार्फत राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (एनएसपी) द्वारे अपंग विद्यार्थ्यांसाठी प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती ( इ. ९ वी  आणि १० वी ) शिष्यवृत्ती लागू केली आहे. एनएसपी २.० पोर्टलवर विद्यार्थ्यांची नोंदणी 1 ऑक्टोबर 2023 पासून सुरू झाली आहे. या योजनचे तपशील ( www.depwd.gov.in ) आणि राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल ( www.scholarships.gov.in ) वर उपलब्ध आहेत.

एनएमएमएस साठी पात्रतेचे निकष

पालकाचे उत्पन्न ३ लाख ५० हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे . उत्पन्नाचा दाखला हा सक्षम प्राधिकारी यांच्या सहीचा आवश्यक. शासकीय , स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित (टप्पा अनुदानासह ) शाळेतील विद्यार्थांना  ही योजना लागू आहे .

केंद्रीय विद्यालय, जवाहर नवोदय विद्यालय तसेच केंद्र /राज्य शासनाकडून वसतिगृहाची सवलत घेत असलेल्या शासकीय तसेच खाजगी विनाअनुदानित शाळेतील, खाजगी अनुदानित सैनिकी शाळेतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अपात्र आहेत. इयत्ता 10 वी नंतर शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्याने व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेत असल्यास शिष्यवृत्तीसाठी अपात्र करण्यात येईल .

इयत्ता 10 वी मध्ये सर्वसाधारण ( जनरल ) विद्यार्थ्यास 60 टक्केपेक्षा अधिक गुण असणे आवश्यक (अनुसूचित जाती / जमातीच्या विद्यार्थ्यास 5 टक्के सुट) इयत्ता 9 वी मधून 10 वी मध्ये गेलेले विद्यार्थी व 11 वी मधून 12 वी मध्ये गेलेले विद्यार्थी प्रथम प्रयत्नात पास होणे आवश्यक आहे .

शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्याचे राष्ट्रीयकृत बँकेत विद्यार्थ्यांच्या नावाचेच खाते असावे, संयुक्त खाते नसावे . शिष्यवृत्तीपात्र विद्यार्थ्याचे आधार कार्ड असावे व त्यांच्या बँक खात्याशी आधार कार्ड संलग्न असावे. विद्यार्थीची ज्या प्रवर्गातून निवड झाली आहे त्या प्रवर्गातूनच शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरावा व जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील .

दिव्यांग विद्यार्थांसाठी असलेल्या प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती साठी  पात्रतेचे निकष 

अनुदानित शाळांतील इयत्ता 9 वी व 10 वीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रि - मॅट्रिक शिष्यवृत्ती दिली जाते. विद्यार्थ्याचे दिव्यांगत्वाचे प्रमाण 40 टक्के किंवा जास्त असावे. सक्षम अधिकाऱ्याचे दिव्यांगत्व चे वैध प्रमाणपत्र हे Rights of Persons with Disabilities Act 2016 मध्ये निकषांनुसार असावे. एकाच पालकांच्या २ पेक्षा अधिक अक्षम ( दिव्यांग ) पाल्यांना ही शिष्यवृत्ती लागु नाही. मात्र दुसरे अपत्य जुळे असल्यास त्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ देता येईल. ही शिष्यवृत्ती एका इयत्तेला एका शैक्षणिक वर्षासाठीच लागु राहील. विद्यार्थ्याने तीच इयत्ता रिपीट केल्यास या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार नाही. विद्यार्थी नियमित असावा.

जर विद्यार्थ्याला एकापेक्षा जास्त शिष्यवृत्ती लागू होत असतील तर विद्यार्थ्याने त्याच्या सोयीनुसार लाभाची ( लाभदायी ) शिष्यवृत्ती स्विकारुन दुसरी शिष्यवृत्ती वरिष्ठ कार्यालयास कळवून रद्द करवून घ्यावी. मात्र विद्यार्थी निवास, निवासासाठी देय अनुदान किंवा अशा प्रकारची राज्यशासनाची किंवा इतर स्त्रोतांकडुन पुस्तके किंवा इतर शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी प्राप्त मदत स्विकारु शकतात.

शिष्यवृत्तीधारक जर केंद्रशासनाच्या किंवा राज्यशासनाच्या अर्थसहाय्यित परीक्षा केंद्रावर प्रशिक्षण घेत असतील तर ही शिष्यवृत्ती सदर कालावधीसाठी बंद राहील. पालकांचे उत्पन्नाच्या सर्व स्त्रोतातून प्राप्त वार्षिक उत्पन्न 2 लाख 50 हजार रुपयापेक्षा जास्त नसावे .

शिष्यवृत्ती रक्कम-

एनएमएमएसएस साठी वार्षिक 12 हजार रुपये, दिव्यांग विद्यार्थांसाठी असलेली विद्यार्थ्यांसाठी प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती वार्षिक 9 हजार ते 14 हजार 600 रुपये आहे.

वेळापत्रक-

एनएमएमएसएस व प्री-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज 1 ऑक्टोबर 2023 पासून सुरवात झाली आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर 2023 पर्यत आहे. शाळास्तर अर्ज पडताळणी अंतिम मुदत 15 डिसेंबर 2023 असून जिल्हा स्तर अर्ज पडताळणीसाठी अंतिम मुदत 30 डिसेंबर 2023 आहे.

एनएसपी पोर्टलवरील सर्व योजनांसाठी लाभार्थ्यांचे बायोमेट्रिक प्रमाणीकरण करणे अनिवार्य आहे. याबाबतच्या सविस्तर सूचना शासनाकडून प्राप्त झाल्यानंतर देण्यात येणार आहेत. दोन्ही योजनांसाठी पात्र लाभार्थानी विहित कालावधीत ऑनलाईन अर्ज भरावेत, असे आवाहन शिक्षणाधिकारी (योजना) जिल्हा परिषद  नांदेड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

00000

 

No comments:

Post a Comment

मोटार सायकल संवर्गातील वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरु

  मोटार सायकल संवर्गातील वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरु   नांदेड दि.  9   :-   प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने परिवहन्नेतर संवर्...