Wednesday, September 13, 2023

 वृत्त

 

आयुष्यमान भव: मोहिमेचा जिल्हा पातळीवर शुभारंभ

 

· अंगणवाडी ते 18 वयोवर्ष गटातील बालक व विद्यार्थ्यांची होणार मोफत तपासणी

· संदर्भीत रुग्णांवर होणार मोफत उपचार

· माता सुरक्षित घर सुरक्षित अभियांतर्गत महिलांच्या पाठोपाठ आता पुरूषांची होणार तपासणी

 

नांदेड, (जिमाका) दि. 13 :-स्वत:च्या स्वच्छतेसह परिसराच्या स्वच्छतेत निरोगी आयुष्याचा मंत्र दडलेला आहे. बरेचसे आजार हे संसर्गजन्य व अस्वच्छतेतून जन्माला येतात. याचबरोबर असंसर्गजन्य रोग हे व्यक्तीपरत्वे आढळून येतात. प्रत्येकाच्या निरोगी आयुष्यासाठी केंद्र शासनाची आयुष्यमान भव: ही मोहिम अत्यंत गरजेची असून संपूर्ण जिल्हाभर गाव पातळीपर्यंत अत्यंत प्रभावीपणे राबविण्यासाठी आरोग्य विभागासह संबंधित यंत्रणेने जबाबदारीने काम करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले.

 

संपूर्ण देशभर आयुष्यमान भव: मोहिमेचा शुभारंभ केंद्र शासनस्तरावर महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर राज्यपातळीवरील या मोहिमेचे उद्घाटन ऑनलाईन कार्यक्रमाद्वारे महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम रमेश बैस यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा पातळीवरील या मोहिमेचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या हस्ते श्री गुरूगोबिंदसिंघजी जिल्हा रुग्णालय नांदेड येथे करण्यात आला. जिल्हा पातळीवरील कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुरेशसिंह बिसेन आदी उपस्थित होते.

 

यावेळी टीबी कार्यक्रमात उत्कृष्ट कामकाज केल्याबद्दल मुख्य कार्यकारी मीनल करनवाल यांच्या हस्ते निक्षय मित्र विवेक माधव खरात, गिरीष रमेशराव देशपांडे, शरद संभाजीराव पवार तसेच टी. बी. चाम्पीयन, हरिदास बळीराम वाघमारे, शेख मोहम्मद गऊस शेख रहीम यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर उपस्थित सर्वांनी अवयवदानाची शपथ घेतली. स्वतः मीनल करनवाल यांनी अवयवदानाचा फॉर्म भरून अवयवदान करण्याचा संकल्प केला.

 

17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत आयुष्यमान भव: मोहिम राबवली जाणार आहे. सदर मोहिमेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांचे आयुष्यमान कार्डची नोंदणी व वितरण केले जाणार आहे. तसेच सर्व आरोग्य संस्थामध्ये, शाळा, महाविद्यालय येथे स्वछता मोहीम राबविली जाईल. आरोग्य वर्धिनी केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालय स्तरावर आयुष्यमान मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शनिवारी असंसर्गजन्य रोग आणि दुसऱ्या आठवड्यात क्षयरोग, कुष्टरोग व इतर संसर्गजन्य आजारा बाबत तपासणी, निदान व उपचार केले जाणार आहेत. तिसऱ्या आठवड्यात माता, बाल आरोग्य व पोषण आरोग्य सुविधा दिल्या जाणार आहेत. चौथ्या आठवड्यात सिकलसेल तपासणी व नेत्ररोग चिकित्सा, कान-नाक व घसा तपासणी सुविधा दिल्या जातील. याचबरोबर सर्वांनी अवयवदान करण्यासाठी मोठ्याप्रमाणावर आवाहन केले जाईल. रक्तदान शिबीरही प्रत्येक तालुक्यात शासकीय दवाखाण्यात घेतले जाणार आहे. शुन्य ते 18 वय वर्ष वयोगटातील मुलांची तपासणी अंगणवाडी व प्राथमिक शाळांमध्ये ४Ds’- (Defects at birth, Development Delays, Deficiencies and Diseases) करिता केली जाणार आहे. 18 वर्ष वयोगटाच्या पुढील व्यक्तींनाच्या विविध तपासण्या केल्या जाणार आहेत.

 

2 ऑक्टोबर रोजी समुदाय आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत गाव पातळीवर आयुष्यमान सभेचे आयोजन केले आहे. या मोहिमेत आयुष्यमान कार्ड, आयुष्यमान गोल्ड कार्ड याचे वितरण केले जाईल, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी सांगितले.

 

हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके, एनसीडी नोडल अधिकारी डॉ. हणमंत पाटील, डॉ. एच. के. साखरे, आर.एम.ओ. डॉ. झिने, डॉ. अर्चना तिवारी, मेट्रन सुरेखा जाधव, कार्यक्रमसमन्वयक डॉ. उमेश मुंडे, जिल्हा सल्लागार डॉ. साईप्रसाद शिंदे, डॉ. गुडे, डॉ. ज्ञानेश्वर पवार, अनिल कांबळे, प्रकाश आहेर, विठ्ठल तावडे, नागोराव अटकोरे, विठ्ठल कदम, अब्दुल गनी, श्री कंधारे तसेच कार्यालयीन अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

0000




No comments:

Post a Comment

मोटार सायकल संवर्गातील वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरु

  मोटार सायकल संवर्गातील वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरु   नांदेड दि.  9   :-   प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने परिवहन्नेतर संवर्...