Wednesday, September 13, 2023

 लोकसहभागातच शहराची सार्वजनिक स्वच्छता शक्य

-         जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

§  17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर या कालावधीत स्वच्छता पंधरवडा मोहिमेचे आयोजन

§  शाळा, महाविद्यालयाच्या माध्यमातून स्वच्छतेचा जागर  


नांदेड (जिमाका) दि. 13 :- माझे शहर सुंदर शहर या संकल्पनेला कृतीत उतरविण्यासाठी प्रत्येक नागरिकांचा कृतीशील सहभाग आवश्यक आहे. प्रत्येकाने आपल्या घर व परिसरापासून स्वच्छतेला सुरवात करणे आवश्यक आहे. ही मोहिम फक्त पंधरवाडयापुरती मर्यादित न ठेवता स्वच्छतेची कायमस्वरुपी सवय लावून स्वच्छतेची चळवळ लोकचळवळीत रुपांतरीत झाली तरच खऱ्या अर्थाने आपण कचरामुक्त शहर करण्यात यशस्वी होवू, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आज स्वच्छता पंधरवडा मोहिमेच्या आयोजित बैठकीत ते बोलत होते.

 

यावेळी माजी खासदार तथा नागरी कृती समितीचे सल्लागार डॉ. व्यंकटेश काब्दे, स्वारातीम विद्यापीठाचे संचालक डॉ. मल्लिकार्जून करजगी, नागरी कृती समितीचे डॉ. लक्ष्मण शिंदे, डॉ. बालाजी कोम्पलवार, डॉ. अशोक सिध्देवाड, मनपाचे उपायुक्त निलेश सुंकेवार, जिल्हा युवा अधिकारी चंदा रावळकर आणि व्यापारी महासंघाचे अध्यक्ष, कापड मार्केट असोसिएशनचे अध्यक्ष, सर्व एनजीओचे अध्यक्ष, किराणा, हॉटेल, लायन्स क्लब, आडत व्यापारी, बार परमिट असोसिएशनचे अध्यक्ष यांची व इतर सदस्यांची उपस्थिती होती. 

 

मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवानिमित्त शहरात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर 2023 या कालावधीत स्वच्छता पंधरवडा मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्वच्छता मोहिम शहरात यशस्वीपणे राबविण्याचे नियोजन सर्वाच्या सहभागातून होण्यासाठी संबंधित यंत्रणांना सांगितले आहे. या अभियानात स्थानिक नागरिक, मनपा, शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थेचे पदाधिकारी यांच्या सहभागातून स्वच्छतेसाठी विविध प्रभागनिहाय दैनंदिन कार्यक्रमाचे नियोजन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले. शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थीच्या माध्यमातून जागरणासह जनजागृती करण्यावर भर दिला जाईल. तसेच प्रत्येक शाळा, महाविद्यालयात प्लास्टिक संकलन टँक तयार करण्याबाबत निर्देश त्यांनी दिले. त्यामुळे अनावश्यक प्लॉस्टिक संकलन होवून रस्त्यावरील कचरा कमी होण्यास मदत होईल. मनपाच्या कचरा संकलन करण्याच्या वेळा, मनपा कर्मचाऱ्यांचा कचरा संकलनातील सहभाग, सार्वजनिक ठिकाणाची स्वच्छता याबाबतच्या उपाययोजना करण्याबाबत मनपाच्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी राऊत यांनी सूचना दिल्या. 

 

जिल्हा कृती समितीचे सल्लागार डॉ. व्यंकटेश काब्दे यांनी शहरातील स्वच्छतेबाबत प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली टिम तयार करुन प्रभागनिहाय स्वच्छता मोहिम राबवावी. घंटागाडी व स्वच्छतेच्या वेळेत मनपाने बदल करुन घ्यावेत. शहरातील मुख्य रस्ता, सार्वजनिक ठिकाणे, नदीचा काठ, बाजाराची मुख्य ठिकाणे स्वच्छ होतील याबाबत उपाययोजना व नियोजन गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

 

व्यापारी असोसिएशनतर्फे मार्केटमधील कचरा निर्मुलनासाठी आवश्यक त्या उपाययोजना स्वत: च्या पुढाकारातून करण्याबाबत व्यापारी असोसिएशनने सकारात्मता दर्शविली. स्वच्छतेबाबत ज्या काही उपाययोजना करता येईल त्यात पुढाकार घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. 

00000

No comments:

Post a Comment

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर जिल्ह्यात बालविवाह होणार नाहीत यांची खबरदारी घ्यावी - जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

  अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर जिल्ह्यात बालविवाह होणार नाहीत यांची खबरदारी घ्यावी - जिल्हाधिकारी अभिजीत राऊत   ·           बाल विवाह होणार न...