Monday, July 10, 2023

फक्त १ रुपयात पिक विमा कवच ; शेतकऱ्यांनी 31 जुलै पुर्वी पिक विमा नोंदणी करावी - जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 फक्त १ रुपयात पिक विमा कवच ;

शेतकऱ्यांनी 31 जुलै पुर्वी पिक विमा नोंदणी करावी

-         जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

नांदेड (जिमाका) दि. 10 :- आता केवळ एक रुपयात पिकांचा विमा उतरविता येणार आहे. यासाठी शासनाने पंतप्रधान पिक विमा योजनेत सर्वसमावेशक पीक विमा योजना सुरु केली आहे. पेरणी झालेली असेल किंवा अद्यापपर्यंत पावसाअभावी पेरणी झालेली नसेल अशा दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांनी पिक पेरणीचे स्वयंघोषणापत्र 31 जुलै 2023 पुर्वी सादर करून योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

प्रधानमंत्री पिक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. योजने अंतर्गत पुढील जोखिम बाबींचा खरीप हंगाम 2023 साठी समावेश करण्यात आला आहे.

हवामान घटकांच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान -खरीप हंगामातील अपूरा पाऊसहवामानातील इतर घटकांच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे केवळ अधिसुचित मुख्य पिकांची अधिसुचित क्षेत्रात सर्वसाधारण क्षेत्राच्या 75 टक्के पेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी / लावणी न झाल्यास विमा संरक्षण देय राहील.  

पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकुल परिस्थिती मुळे पिकांचे होणारे नुकसान- सर्वसाधारण काढणीच्या 15 दिवस आधीपर्यंत पूरपावसातील खंडदुष्काळ इ. बाबीमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पादनामध्ये सरासरी उत्पादनाच्या 50 टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर अधिसूचित क्षेत्र स्तरावर विमा संरक्षण देय राहिल.

पिक पेरणीपासुन काढणी पर्यतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट- टाळता न येणाऱ्या जोखमीमुळे पिकांच्या उत्पन्नात येणाऱ्या घटीपासुन व्यापक विमा संरक्षण दिले जाते. अधिसुचित विमा क्षेत्र घटकातील पिक कापणी प्रयोगावरुन उपलब्ध झालेल्या सरासरी उत्पन्नाची तुलना उंबरठा उत्पन्नाशी करुन नुकसान भरपाई निश्चित केली जाते. जर सरासरी उत्पन्न हे उंबरठा उत्पन्नापेक्षा कमी झाले तर नुकसान भरपाई देय राहील.

स्थानिक नैसर्गिक आपत्ती- याबाबी अंतर्गत गारपीटभूस्खलनविमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यासढगफूटीवीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झाल्यामुळे होणारे अधिसुचित पिकाचे ठराविक क्षेत्रातील नुकसान हे वैयक्तिक स्तरावर पंचनामे करुन निश्चित करण्यात येते.

काढणी पश्चात नुकसान- ज्या पिकांची काढणीनंतर शेतात पसरवून अथवा पेंढया बांधुन सुकवणी करणे आवश्यक असते. अशा कापणी / काढणी नंतर सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या अधिसुचित पिकांचे काढणीनंतर दोन आठवड्यांच्या आत (14 दिवस) गारपीटचक्रीवादळचक्रीवादळामुळे आलेला पाऊस आणि बिगरमोसमी पावसामुळे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करुन निकषांचे अधिन राहून नुकसान भरपाई निश्चित केली जाईल.

काढणीपश्चात नुकसान व स्थानिक आपत्ती या जोखिमे अंतर्गत विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांनी सर्वे नंबर नुसार बाधित पीक व बांधीत क्षेत्राबाबत घटना घडल्यापासून 72 तासाच्या आत क्रॉप इश्युरन्स अॅप संबंधित विमा कंपनीचे टोल फ्री क्रमांक / बँक / कृषि व महसुल विभाग यांना कळवावे. नुकसान कळवताना सर्व्हे नंबर व नुकसानग्रस्त क्षेत्र तपशील कळविणे बंधनकारक असेल.

नांदेड जिल्ह्यात खरीप हंगाम 2023 मध्ये युनायटेड इंडिया इंन्शुरन्स कं. लि. क्षेत्रिय कार्यालय, 2 मजलाकाकडे बीझ आयकॉनई-स्केअर जवळ, गणेशखिंड रोडशिवाजीनगरपुणे - 411016       ई-मेल uiicpmfby2023@uiic.co.in व टोल फ्री क्रमांक 18002337414 या विमा कंपनीद्वारे योजना राबविण्यात येत आहे.

पीक व विमा संरक्षित रक्कम रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे आहे. ज्वारी 30 हजार रुपये, सोयाबीन 54 हजार 500 रुपये, मूग व उडीद 22 हजार 500 रुपये, तूर 36 हजार 802 रुपये, कापूस 57 हजार 500 रुपये याप्रमाणे आहे.  बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा संरक्षण मिळणेस्तव विहित मुदतीपुर्वी नजीकचे बँक व आपले सरकार सेवा केंद्रावर विमा हप्त्यासह तसेच आवश्यक कागदपत्रांसह विमा प्रस्ताव सादर करावा.

कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होण्याचा / न होण्याचा पर्याय उपलब्ध आहे. शेतकरी योजनेत सहभाग नोंदविण्यास इच्छुक नसेल तर तसे घोषणापत्र योजनेतील सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या सात दिवस अगोदरपर्यंत देणे आवश्यक आहे. जे शेतकरी योजनेत सहभागी न होणे बाबत घोषणापत्र देणार नाहीत या सर्व शेतकऱ्यांचा विमा हप्ता कपात करुन योजनेत सहभागी करुन घेणेबाबत बँकेमार्फत कार्यवाही केली जाईल.

योजनेच्या मार्गदर्शक सुचनेनुसार विमा कंपनी शेतकरी विमा हप्ता आणि केंद्र व राज्य शासनाकडून विमा अनुदानाचा पहिला हप्ता प्राप्त झाल्यानंतर पिक पेरणी / लावणीपूर्व नुकसान भरपाई / हंगामामध्ये प्रतिकुल परिस्थिती मुळे झालेले नुकसान / स्थानिक आपत्ती या जोखमीच्या बाबींकरिता नुकसान भरपाईची पूर्तता करतील. त्याचप्रमाणे उत्पन्नाच्या आकडेवारीवर आधारीत व काढणी पश्चात नुकसान भरपाई या जोखमीच्या बाबींकरिता नुकसान भरपाईची पुर्तता केंद्र व राज्य शासनाकडून विमा अनुदान अंतिम हप्ता प्राप्त झाल्यानंतर करतील.

विमा योजनेअंतर्गत विविध जोखिमी अंतर्गत निश्चित होणारे नुकसान भरपाई ही केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेच्या अटी व शर्तीच्या अधिन राहून निश्चित केले जाते. हंगामात घेण्यात आलेल्या पिक कापणी प्रयोगातून प्राप्त होणाऱ्या सरासरी उत्पन्नाची तुलना ही उंबरठा उत्पन्नाशी करुन हंगामाच्या शेवटी नुकसान भरपाई निश्चित करण्यात येते.

या योजनेअंतर्गत नुकसान भरपाई निश्चित करतांना पैसेवारीदुष्काळटंचाई परिस्थिती आणि पुरामुळे झालेल्या नुकसानी संदर्भात कोणत्याही शासकीय विभाग / संस्थेमार्फत घोषित करण्यात आलेली आकडेवारी ग्राह्य धरता येत नाही.

पिक विमा नोंदणी सीएससी केंद्रामध्ये विनाशुल्क केल्या जाईल. पिक विमा भरणेसाठी मोबदला म्हणून सीएससी केंद्र चालकास प्रति अर्जानुसार 40 रुपये शुल्क शासनाकडून अदा केल्या जाते. त्यादृष्टीने शेतकऱ्यांनी शेतकरी विमा हप्ता व्यतिरिक्त (झेरॉक्स इ. खर्च वगळून) ज्यादा रक्कम फी म्हणून सीएससी केंद्र चालकास देऊ नये.

पिक विमा योजनेत सहभागी होणेसाठी खालील कागदपत्रांची आवश्यकता आहे.

आधार कार्ड, पिक पेरा स्वंय घोषणापत्र, बॅक पासबुक, सातबाराहोल्डिंग योजनेतील सहभागासाठी तात्काळ नजीकच्या उपविभागीय कृषि अधिकारीतालुका कृषि अधिकारी यांचे कार्यालयाशी तसेच नजिकच्या बँकआपले सरकार सेवा केंद्र सीएससी यांचेशी संपर्क साधावा. पिक विमा भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2023 असुन यामध्ये कोणत्याही प्रकारची मुदतवाढ मिळणार नसल्याने शेवटच्या दिवसांची वाट न बघता या पिक विमा योजनेत सहभागी व्हावे, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

 

No comments:

Post a Comment

मोटार सायकल संवर्गातील वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरु

  मोटार सायकल संवर्गातील वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरु   नांदेड दि.  9   :-   प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने परिवहन्नेतर संवर्...