Tuesday, December 13, 2022

श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेत भव्य कृषि प्रदर्शनाचे आयोजन


कृषि विभागामार्फत कृषिनिष्ठ पुरस्काराचे होणार वितरण

नांदेड (जिमाका) दि. 13 :- श्रीक्षेत्र माळेगांव यात्रेनिमीत्त जिल्हा परिषदेच्या कृषि विभागामार्फत माळेगांव येथे कृषि प्रदर्शन, फळे, भाजीपाला व मसाला पिके प्रदर्शन व विविध स्पर्धाचे आयोजन केले आहे. तसेच सन 2021-22 व 2022-23 या वर्षामध्ये कृषि क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या प्रत्येक तालुक्यातून एक याप्रमाणे सन 2021-22 चे 16 व 2022-23 चे 16 असे एकूण 32 शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक सत्कार कृषिनिष्ठ शेतकरी म्हणून साडीचोळी, शॉल, फेटा, मोमेन्टो देऊन करण्यात येणार आहे, असे जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी डॉ.टी.जी. चिमणशेट्टे यांनी कळविले आहे.

जिल्हा परिषदेच्या कृषि विभागामार्फत यात्रेच्या ठिकाणी कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. बियाणे, रासायनिक खते, किटकनाशक औषधी, विविध कृषि औजारे, ट्रॅक्टर, यंत्रे, सुक्ष्म सिंचन, कृषी विज्ञान केंद्रामार्फत माती परिक्षण प्रयोगशाळा, कृषि विद्यापीठ, कृषि विभाग, सेंद्रीय शेती, देशी वाण, किटकनाशके वापराबाबत मार्गदर्शन इत्यादी बाबतचे स्टॉल उभारण्यात येणार आहेत. यामध्ये बियाणे कंपन्याकडून विविध पिकांचे लाईव्ह सॅम्पल ठेवण्यात येणार आहे. यात्रेचा कालावघी 22 डिसेंबर ते 26 डिसेंबर 2022 आहे. 22 डिसेंबर 2022 रोजी मान्यवरांच्या हस्ते कृषि प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून कृषिनिष्ठ पुरस्काराचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. स्टॉल सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत सुरू राहतील. या दरम्यान बहुतांश यात्रेकरू व शेतकरी स्टॉलला मोठया प्रमाणात भेटी देतात. उत्पादनाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याची व सुधारीत तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसिध्दी करण्याची संधी या प्रदर्शनाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.

कृषि विभागामार्फत जिल्हास्तरीय फळे, मसाला पिके व भाजीपाला प्रदर्शन व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच फळे,मसाला पिके व भाजीपाला प्रदर्शनाचा स्टॉल उभारण्यात येतो. या प्रदर्शनात जिल्ह्यातील फळे व भाजीपाला पिकविणारे शेतकरी भाजीपाला व फळे पिकांचे उत्कृष्ट नमुने प्रर्दशनात ठेवतील. प्रदर्शनात ठेवलेल्या फळे, मसाला पिके व भाजीपाल्यांच्या नमुन्यातून प्रत्येक वाणातुन उत्कृष्ट नमुन्यास प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढण्यात येईल. विजेत्या शेतकऱ्यांना रोख बक्षिस व प्रमाणपत्रही देण्यात येईल.

जिल्हास्तरीय फळे,भाजीपाला व मसाला पिके स्पर्धा आयोजित करण्यात येणार असून त्यात प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांना अनुक्रमे 4 हजार रुपये, 3 हजार रुपये व 2 हजार रुपये याप्रमाणे बक्षीस देण्याचे नियोजन आहे. स्पर्धेसाठी जिल्हास्तरावर मोहीम अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यात कृषि विद्यापीठ प्रतिनिधी, तालुका कृषि अधिकारी लोहा, तंत्र अधिकारी, कृषि अधिकारी पंचायत समिती लोहा यांचा समावेश आहे. सोमवार 26 डिसेंबर रोजी मान्यवरांच्या हस्ते कृषि प्रदर्शनात भाग घेतलेल्या विविध कंपन्यापैकी प्रथम, द्वितीय व तृतीय असे क्रमांक प्राप्त करणाऱ्या कंपन्यांचा प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात येणार आहे असेही कृषि विभागाच्यावतीने कळविले आहे.

0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...