Monday, October 3, 2022

 सर्वसामान्यांना कालमर्यादेत सेवा देण्याची कार्यसंस्कृती प्रत्येक विभागात आवश्यक - जिल्हाधिकारी अभिजित राऊत

▪️ सर्व कार्यालये जबाबदार व अधिक लोकाभिमूखतेसाठी जिल्हाधिकारी राऊत यांच्या स्पष्ट सूचना

नांदेड (जिमाका) दि. 3 :- सर्वसामान्यांचे शासनाशी निगडीत कामांचे स्वरुप लक्षात घेतले तर त्यात फार काही किचकट अपेक्षा असतात असे नाही. आपले काम व्हावे एवढीच त्यांची माफक अपेक्षा असते. तथापि मुदती पेक्षा अधिक विलंब झाल्यास त्यांना विनाकारण कार्यालयाकडे धाव घ्यावी लागते. वेळेत सर्व कामांचा निपटारा हा चांगल्या प्रशासनाचे लक्षण असून सर्व विभाग प्रमुखांनी यादृष्टीने अधिक काळजी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले.
डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक आज त्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत ते बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक अतुल कानडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता गजेंद्र राजपूत, जिल्हा पुरवठा अधिकारी लतीफ पठाण, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी जगताप व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
प्रशासनाशी निगडीत असलेली कामे सेवा पंधरवडा पुरती मर्यादीत न राहता ती सर्वांची कार्यसंस्कृती झाली पाहिजे. वेळेत कामे व्हावीत यासाठी सेवा हक्क कायदानुसार सर्वांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. आपण केवळ शासकीय अधिकारी या नात्याने काम न करता समाजाचा सुद्धा आपण एक घटक आहोत, हे समजून आपले उत्तरदायित्व प्रभावीपणे पार पाडले पाहिजे, असे जिल्हाधिकारी राऊत यांनी स्पष्ट केले.

कायद्याच्या चौकटीत जर कोणाची कामे बसत नसतील तर त्यांना व्यवस्थीतपणे सर्व वस्तुस्थिती समजून सांगण्याची जबाबदारी ही विभाग प्रमुखांची आहे. जिल्हा प्रशासनाची कार्यतत्परता ती गतीमान होण्यासमवेत अकारण कोणाला जर शासनदरबारी चकरा माराव्या लागत असतील तर ते खपवून घेतले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा वार्षिक योजनेच्या अनुषंगाने उपलब्ध असलेला कालावधी, विविध योजनांचे नियोजन व येत्या मर्यादीत कालावधीमध्ये कराव्या लागणाऱ्या कामाच्या पूर्ततेबाबत त्यांनी अधिक दक्षता घेण्यास सांगितले.
0000





No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...