Monday, September 12, 2022

 निवडणूक ओळखपत्रास आधार जोडणी ही लोकचळवळ व्हावी

-    उपजिल्हा निवडणूक अधिकारी दीपाली मोतीयेळे  

·        पीपल्स महाविद्यालयात कार्यशाळा संपन्न 

 

नांदेड (जिमाका) दि. 12 :- जिल्हाभरात मतदारांची आधार जोडणी कार्यक्रम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून पीपल्स कॉलेज नांदेड राष्ट्रीय सेवा योजना विभाग व जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित मतदान ओळखपत्रास आधार  लिंक कार्यशाळेचे उद्घाटन उपजिल्हा निवडणूक अधिकारी दीपाली मोतीयेळे यांच्या हस्ते संपन्न झाले. 

या कार्यशाळेत उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती मोतीयेळे यांनी भारतीय शासनात केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगाची भूमिका विशद केली. भारतीय निवडणूक आयोगाने नागरिकांच्या सेवेसाठी सुरू केलेल्या वोटर हेल्पलाइन ॲप विषयी माहिती दिली. ॲपच्या माध्यमातून नवीन मतदान नोंदणी आणि आपला निवासी मतदार संघ बदलल्यानंतर करावयाच्या दुरुस्ती तसेच विवाहनंतर मुलींच्या नावामध्ये करावयाच्या दुरुस्ती विषयीच्या कार्यपद्धतीबद्दल विद्यार्थ्यांच्या समोर ॲपच्या माध्यमातून प्रात्यक्षिक करून दाखवले. उपस्थित विद्यार्थ्यांना या लोकचळवळीत सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले. 

पीपल्स महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक  राजेश कनकुटे व अश्विनी राठोड यांनी मतदार ओळखपत्र व आधार लिंक राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये नोडल स्वयंसेवक म्हणून नियुक्तीपत्र दिले. या कार्यशाळेस तहसीलदार श्रीमती स्नेहलता स्वामी उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना भारत सरकारने सुरू केलेल्या मतदार ओळखपत्रास आधार लिंक राष्ट्रीय कार्यक्रम कार्यपद्धतीबद्दल माहिती दिली. वोटर हेल्पलाईन ॲपच्या माध्यमातून प्रात्यक्षिक करून दाखविले.   

कार्यक्रमासाठी नायब तहसीलदार श्रीमती उर्मिला कुलकर्णी व उपप्राचार्य डॉक्टर सचिन पवार उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर एम जाधव यांनी विद्यार्थ्यांना भारताचा सजग नागरिक म्हणून आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिली. पीपल्स महाविद्यालयाच्या परिसरात मतदान ओळखपत्रास आधार लिंक डेस्क स्थापन करण्यात आला.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. अमोल काळे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. कल्पना जाधव यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील डॉ. बालाजी चिरडे, श्रीमती काटे, श्री.वानखेडे, श्रीमती यादव, महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.   

याचबरोबर नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालय व सायन्स महाविद्यालयात आधार जोडणी कार्यशाळा संपन्न झाली. विधी महाविद्यालयाचे प्राचार्य विकास खाकरे, महेश पाटील, श्री. अली यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. सायन्स महाविद्यालयात प्राचार्य गवई, उपप्राचार्य श्रीमती शुक्ला, श्री. मुनेश्वर व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वतः चे आधार लिंक करून आपल्या घरातील सर्वांचे आधार लिंक करावे असे आवाहन प्रशासन व महाविद्यालयामार्फत करण्यात आले.

0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...