Thursday, January 6, 2022

 टीकात्मक विश्लेषणासह माध्यमामध्ये

चांगल्या घटनांचेही प्रतिबिंब हवे

-         जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

 

·         अमृतासम पवित्र होण्याचे ध्येय बाळगा - लता अहेमद सानी 

नांदेड (जिमाका) दि. 6:- उच्च तंत्रज्ञानाच्या नवनवीन आविष्काराने माध्यमाची परिभाषा व माध्यमात काम करणाऱ्या सर्वांचीच जबाबदारी अधिक पटीने वाढली आहे. ज्या विश्वासार्हतेवर माध्यमे उभी आहेत, ते मुल्य व विश्वासार्हता वृद्धींगत होण्यासाठी टिकात्मक विश्लेषणासह प्रत्येक विषयाची दुसरी बाजू व समाजात घडणाऱ्या चांगल्या घटनाचे प्रतिबिंबही तेवढ्या सक्षमपणे स्विकारण्याकडे वाचकांचा अधिक कल असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यासाठी दर्पण दिनानिमित्त जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग, जिल्हा परिषद, जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन सभागृहात आज कार्यक्रम संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. 

यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, अप्पर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, पोलीस विभागाचे जनसंपर्क अधिकारी लष्करे, संपादक लता अहेमद सानी, संपादक शंतनु डोईफोडे, सामनाचे प्रतिनिधी विजय जोशी, ज्येष्ठ पत्रकार अनिकेत कुलकर्णी, डीजीटल मिडीयाचे योगेश लाठकर, अंकुश सोनसळे तसेच माध्यमातील मान्यवर पत्रकार उपस्थित होते. 

सर्वच क्षेत्रात स्पर्धात्मकता वाढली असून या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी विश्वासार्हता पाहिजे. जे-जे नवीन तंत्रज्ञान येत आहे ते शिकून आत्मसात केल्याशिवाय पर्याय नाही. हा काळ माध्यम आणि पत्रकारांच्यादृष्टीने आव्हानात्मक जरी असला तरी यात सत्य आणि विश्वासार्हता जपणारी माध्यमे अधिक उजळून निघतील असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी व्यक्त केला. 

पत्रकारिता हे क्षेत्र विश्वासार्हतेचे आहे. यात अमृतासारखे पवित्र राहण्याची मनिषा विविध माध्यमात काम करणाऱ्या पत्रकारांनी जपली पाहिजे. आपली भूमिका ही लोकशाहीच्या मजबुतीसाठी आवश्यक असल्याचे प्रतिपादन संपादक अलताफ सानी यांनी केले. ज्या मुल्यांवर आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी पत्रकारितेचा भक्कम पाया उभा केला, त्याला वृध्दींगत करण्याचे काम अनंत भालेराव, सुधाकरराव डोईफोडे यांच्या सारख्या अनेक संपादकांनी केले. समाजातील जे वाईट आहे ते नष्ट होऊन जे चांगले त्यावर समाज घडावा याचा आग्रह बाळशास्त्री जांभेकरांनी आपल्या लेखनीद्वारे धरला. हे आपण लक्षात घ्यायला हवे. प्रशासन आणि पत्रकारिता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. चांगल्या प्रशासनासाठी शासकीय योजना लोकापर्यत पोहचल्या पाहिजेत. ते पोहचविण्याचे काम माध्यम करतात. ही महत्वाची जबाबदारी पार पाडतांना कोरोनाच्या सावटाखाली पत्रकारांनी सोसलेले आव्हान हे कोरोना योद्धा सारखेच असल्याचे संपादक शंतनु डोईफोडे यांनी स्पष्ट केले. 

कोरोना काळात जिल्हा प्रशासनाने अनेक गुणवत्तापूर्वक कामे केली आहेत.  कोरोना कालावधीत मृत्यू झालेल्या बाधितांच्या कुटूंबियांना मदत मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दाखवलेली तत्परता दखल घेण्यासारखी आहे, असे सामनाचे प्रतिनिधी विजय जोशी यांनी सांगितले. जिल्ह्यातील दुर्गम भागातही कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचे काम मोठ्या प्रमाणात उत्कृष्ट झाले आहे, असेही त्यांनी सांगितले. 

सध्या शहरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आदेशासोबत कडक अंमलबजावणी करावी जेणेकरुन कोरोना संसर्ग वाढीला आळा बसेल असे अंकुश सोनसळे यांनी सांगितले. सध्याच्या कालावधीत वृत्तपत्र चालविणे कठीण जरी असले तरी प्रत्येकाला मर्यादीत राहून काम करावे लागते, असे योगेश लाठकर यांनी सांगितले. शेवटी जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

0000









No comments:

Post a Comment

मोटार सायकल संवर्गातील वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरु

  मोटार सायकल संवर्गातील वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरु   नांदेड दि.  9   :-   प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने परिवहन्नेतर संवर्...