Sunday, September 26, 2021

 माहूर गडावरील 'रोप वे' ला गती ! राज्य शासन व 'वॅपकॉस'मध्ये करार 

नांदेड (जिमाका) दि. 26 :- रेणुकामातेचे देवस्थान असलेल्या माहूर गडावर 'रोप वे' उभारण्यासंदर्भात राज्य शासनाचा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या 'वॅपकॉस लिमिटेड' मध्ये करार झाला आहे. यामुळे  माहूर गडाच्या विकासकामाला गती मिळाली आहे. 

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत बांधकाम विभागाच्या औरंगाबाद विभागाचे मुख्य अभियंता दिलीप उकिर्डे आणि 'वॅपकॉस'चे प्रतिनिधी दीपांक अग्रवाल यांनी औरंगाबाद येथे या करारावर स्वाक्षरी केली. माहूर गड येथील रेणुकादेवी मंदीर, श्री दत्त शिखर मंदीर, अनुसया माता मंदिरासाठी 'रोप वे' उभारणे तसेच रेणुकादेवी मंदिरासाठी 'फुट ओव्हर ब्रीज' 'लिफ्ट' उभारण्याच्या कामाला केंद्रीय मार्गनिधी अंतर्गत सुमारे 51 कोटी रूपयांची मंजुरी मिळाली आहे. 

या विकास कामाबाबतच्या करारावर स्वाक्षरी झाल्याने साडेतीन शक्तीपिठांमध्ये समावेश असलेल्या रेणुकामातेच्या मंदिरात 'रोप वे'ने जाऊन दर्शन घेण्याचे भाविकांचे स्वप्न लवकर पूर्णत्वास येत आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर विशेषतः वयोवृद्ध भाविकांचा त्रास कमी होणार असून, माहूर गडाला भेट देणाऱ्या नागरिकांमध्ये मोठी वाढ होणे अपेक्षित आहे. त्यातून या तीर्थक्षेत्राच्या विकासासमवेत जिल्ह्यातील पर्यटन स्थळाच्या विकासालाही आता गती मिळेली आहे.

0000



No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...