Sunday, September 26, 2021

 नांदेड जिल्हयात राष्ट्रीय लोक अदालत संपन्न 

13 कोटी 46 लाख 90 हजार रक्कमेची विविध प्रकरणात तडजोड 

नांदेड (जिमाका) दि. 26 :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालय नांदेडचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्यातील सर्व न्यायालयात 25 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक तालुक्यासह कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय येथे पण त्या-त्या न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. नांदेड जिल्हयात एकुण 4 हजार 206   प्रकरणे सामोपचाराने निकाली निघाली आहेत. यात 13 कोटी 46 लाख 90 हजार 622  इतक्या रक्कमेबाबत विविध प्रकरणत तडजोड झाली. 

प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी लोकअदालत यशस्वी झाल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.  लोक अदालत यशस्वी होण्यासाठी जिल्हयातील सर्व न्यायाधीश, पॅनलवरील न्यायाधीश, वकील सदस्य, पॅनल सदस्य, विधिज्ञ यांनी जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले. त्यामध्ये दिवाणी, फौजदारी, एन.आय.अॅक्ट., बॅंक प्रकरणे, मोटार वाहन अपघात, भूसंपादन, ग्रामपंचायतीचे घरपट्टी व पाणीपट्टीचे  प्रकरणे व इतर, तसेच कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय यांच्या प्रकरणाचा व विविध बॅंकाचा तसेच विद्युत प्रकरणे, टेलिफोन, मोबाईल यांचे दाखलपुर्व प्रकरणांचा समावेश होता. तसेच तीन दिवस घेण्यात आलेल्या विशेष मोहिमेंतर्गत 1 हजार 251 प्रकरणे निकाली काढण्यात आले आहे. 

नांदेड अभिवक्ता संघाचे अध्यक्ष, जिल्हा सरकारी वकिल तसेच जिल्हयातील सर्व विधिज्ञ आणि विविध विमा कंपनी, भूसंपादन अधिकारी, मनपा, महसुल विभाग अधिकारी, तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड, न्यायालयीन व्यवस्थापक, प्रबंधक व कर्मचा-यांचे सहकार्य मिळाले. लोकअदालत यशस्वी व जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीकांत आणेकर, जिल्हा न्यायाधीश के. एन. गौतम, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव आर. एस. रोटे यांनी विशेष प्रयत्न केले.

00000

No comments:

Post a Comment

8 मे रोजी जप्त रेती साठ्याचा लिलाव

  8 मे रोजी जप्त रेती साठ्याचा लिलाव नांदेड दि.   7   :-   सन 2019-2020 मधील मौ. सांगवी व मेळगांव परिसरातील अवैध उत्खननातून 4647.83 ब्रास जप...