Thursday, November 5, 2020

 

निसर्गाच्या अन्न साखळीत मानवा इतकेच

पक्षांचेही योगदान महत्वाचे

-         उपवनसंरक्षक राजेश्वर सातेलीकर 

नांदेड (जिमाका) दि. 5 :- कोणत्याही नदीचा काठ अथवा किनारा प्रत्येकाला आत्ममग्न होऊन चिंतन करायला लावल्या शिवाय सोडत नाही. येथील गोदावरीचा काठही त्याच भावविश्वाला वाहता करणारा. तुम्ही कोणत्याही वेळेत काठावर पोहचा, तीच ऊर्जा आपल्याला मिळेल. आज गोदावरीच्या काठावर नदीच्या ऊर्जेसह निसर्ग, प्राणी, पशू-पक्षी आणि विशेषत: पर्यावरणावर निस्सीम प्रेम करणाऱ्या नांदेडकरांचा गोतावळा जमल्याने एक वेगळी ऊर्जा निर्माण झाली. निमित्त होते पक्षी सप्ताहाचे. या सप्ताहानिमित्त आयोजित पक्षी निरीक्षण उपक्रमानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, उपवनसंरक्षक राजेश्वर सातेलीकर, भा.व.से. च्या प्रोबेशनरी अधिकारी मधुमिता, आनंदीदास देशमुख, डॉ. देशपांडे, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, छायाचित्रकार विजय होकर्णे व निसर्गप्रेमी उपस्थितीत होते. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी पक्षी सप्ताहानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.

 

महाराष्ट्रातील वन्यजीव विषयक साहित्य निर्मितीत आग्रणी असलेले साहित्यीक व सेवानिवृत्त वनअधिकारी मारोती चित्तमपल्ली यांचा जन्मदिवस तर याच सप्ताहात 12 नोव्हेंबरला भारतीय पक्षी विश्वाचा अभ्यास जागतिक पातळीवर नेऊन पोहचविणारे पद्मभुषण स्व. डॉ. सलीम अल्ली यांची 12 नोव्हेंबर रोजी असलेली जयंती. या दोन्ही दिग्गजांच्या जीवन कार्याला व त्यांनी पक्षी अभ्यासात दिलेल्या अमुल्य योगदानाचा गौरव म्हणून महाराष्ट्रात दि. 5 ते 12 नोव्हेंबर या सात दिवसांच्या कालावधी पक्षी सप्ताह म्हणून सर्वत्र उत्साहाने साजरा केला जातो.

 

इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नांदेड जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात नैसर्गिक संपन्नता व वनसंपदा लाभली आहे. या वनसंपदेत सर्व प्रकारचे पक्षी आपणास येथे आढळून येतात. पक्षांची ओळख करुन घेणे हे त्यांच्या अस्तीत्वाला समजून घेण्यासारखे आहे. अन्न साखळीत मानवाचे जेवढे महत्व आहे तेवढेच महत्व पक्षांचे आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे, असे प्रतिपादन उपवनसंरक्षक राजेश्वर सातेलीकर यांनी केले. या पक्षी सप्ताहात आपण नांदेड जिल्ह्यातील 12 वनपरिक्षेत्रात विविध उपक्रम राबवित असल्याचेही त्यांनी सांगितले. किनवट तालुक्यातील इस्लापूर परिक्षेत्रात भा.व.से. च्या प्रोबेशनरी अधिकारी मधुमिता यांनी आदर्श असे काम केले आहे. त्या परिक्षेत्रावर पक्षीप्रेमींनी आवर्जून भेट देऊन पाहणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले. निसर्गाची साखळी पूर्ण करण्यात पक्षांचा खूप मोठा सहभाग आहे हे आपण विसरता कामा नये, असे मधुमिता यांनी सांगून त्यांच्या संवर्धनासाठी पुढे सरसावले पाहिजे, असे आवाहन केले. 

निसर्गाचे निरीक्षण हा ध्यानधारणेशी जवळीकता साधणारा मार्ग असून आपणही या निसर्गाचा, चराचराचा एक भाग आहोत याची प्रचिती होते. निसर्गाकडे जेंव्हा आपण नम्र होऊन जाऊन तेंव्हा प्रत्येकवेळी आपल्याला तो नवीन ऊर्जा देईल, असे जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी सांगून नांदेड जिल्ह्यातील सर्व पक्षीमित्र, छायाचित्रकार व संयोजकांचे अभिनंदन केले. पक्षीमित्र व छायाचित्र संघटनेच्यावतीने छायाचित्रकार विजय होकर्णे यांनी कार्यक्रमाचे समर्पक संचलन करुन सर्वांचे आभार मानले.   

00000






No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...