Thursday, November 5, 2020

 

कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचे

नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात

नांदेड (जिमाका) दि. 5 :- जिल्हात जुलै ते ऑक्टोबर महिन्यामध्ये  बोंडअळी प्रादुर्भाव कमी प्रमाणात आढळून आला आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये वातावरण गुलाबी बोंडअळीच्या वाढीसाठी अत्यंत पोषक आहे. त्यामुळे गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुढील दिवसात गुलाबी बोंडअळीचे नियंत्रण करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांनी केले आहे.

 

गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भावासाठी कपाशी पिकाचे नियमित सर्वेक्षण करून खालील उपाययोजना कराव्यात. फेरोमन सापळ्याचा वापर करावा. यासाठी एकरी दोन किंवा हेक्टरी पाच फेरोमोन सापळे लावावे.  सतत तीन दिवस या सापळ्यामध्ये आठ ते दहा पतंग आढळल्यास  गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनाचे उपाय योजावे. फुलावस्थेत दर आठवड्याने पिकामध्ये मजुरांच्या सहायाने डोमकळ्या (गुलाबी बोंडअळी ग्रस्त फुले) शोधून नष्ट कराव्या. ३. ५ टक्के निंबोळी  अर्क किंवा ॲझाँडिरेक्टीन ०.०३ (३०० पीपीएम ) ५० मिली किंवा ०.१५ टक्के (१५००पीपीएम ) २५ मिली  प्रति १० ली पाण्यात मिसळून फवारणी करावी.

 

प्रत्येक आठवड्याला एकरी शेतीचे प्रतिनिधीत्व करतील अशी २० झाडे निवडून निवडलेल्या प्रत्येक झाडावरील मध्य आकाराचे झालेले बाहेरुन किडके नसलेले एक बोंड असे २० बोंडे तोडून ते भुईमुगाच्या शेंगाप्रमाणे दगडाने टिचवून त्यामधील किडक बोंड व आळ्याची संख्या मोजून ती दोन किडक बोंड किंवा दोन पांढुरक्या, गुलाबी रंग धारण करीत असलेल्या अळ्या आढळल्यास आर्थिक नुकसान पातळी (५ ते १० टक्के) समजून पुढील सांगितल्याप्रमाणे  रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करावी. थायोडीकार्ब ७५ टक्के WP २५ ग्रॅम किंवा क्विनॉलफॉस २५ टक्के एएफ २५ मिली किंवा क्लोरपायरीफॉस २५ टक्के प्रवाही २५ मिली किंवा प्रोफेनोफॉस ५० टक्के ३० मिली किंवा इंडोक्साकार्ब १५.८ टक्के १० मिली किंवा डेल्टामेथ्रीन २.८ टक्के १० मिली या पैकी कोणतेही एक किटकनाशक प्रती १० लिटर पाण्यातमिसळून फवारणी करावी. जेथे प्रादुर्भाव १० टक्केच्यावर आहे. अशा ठिकाणी आवश्यकतेनुसार प्रादुर्भाव पुढे वाढू नये, म्हणून पुढील कोणत्याही एका मिश्र कीटकनाशकाची १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ट्रायझोफॉस ३५ टक्के अधिक डेल्टामेथ्रीन १ टक्के १७ मिली किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल ९.३ टक्के अधिक लॅब्डासायहॅलोथ्रीन ४.६ टक्के ५ लिली किंवा क्लोरपायरीफॉस ५० टक्के अधिक सायपरमेथ्रीन ५ टक्के २० मिली किंवा इंडोक्झाकार्ब १४.५ टक्के अधिक ॲसीटामाप्रिड ७.७ टक्के १० मिली याप्रमाणे पुढील दिवसात गुलाबी बोंडअळीचे नियंत्रण अशा प्रकारे करावे, असे अवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...