Wednesday, October 14, 2020

 

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी

शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे 

नांदेड दि. 14 (जिमाका):- जिल्ह्यात महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती 2019 योजनेंतर्गत लाभासाठी 7 हजार 321 शेतकऱ्यांनी अद्याप आधार प्रमाणिकरण प्रक्रिया पुर्ण केलेली नाही. त्यांना आधार प्रमाणिकरण केल्याशिवाय शेतकऱ्यांच्या खात्यात शासनामार्फत कर्जमुक्तीची रक्कम जमा करता येणार नाही. त्यासाठी आधार प्रमाणिकरण शिल्लक राहिलेल्या शेतकऱ्यांनी जवळच्या सेतू केंद्रावर जाऊन तात्काळ आधार प्रमाणिकरण करावे, असे आवाहन सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक डॉ. अमोल यादव यांनी केले आहे. 

राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने "महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019" ही 27 डिसेंबर 2019 च्या आदेशान्वये कार्यान्वित केली आहे. 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च, 2019 पर्यंतच्या कालावधीसाठी अल्पमुदतीचे पीककर्ज घेतलेल्या तसेच या कालावधीत घेतलेल्या अल्पमुदतीच्या पीक कर्जाचे पुर्नगठन, फेरपुनर्गठन केलेल्या कर्जामधील 30 सप्टेंबर 2019 रोजी रु. 2 लाखापर्यंत थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. 

नांदेड जिल्ह्यात या योजनेंतर्गत एकुण 2 लाख 14 हजार 491 शेतकरी कर्जमुक्तीसाठी पात्र असुन त्यापैकी बँकांनी 2 लाख 7 हजार 617 शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड केली आहे. या बँकांनी अपलोड केलेल्या माहितीपैकी कर्जमाफी पात्र असणाऱ्या 1 लाख 83 हजार 344 शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर प्रसिद्ध केली आहे. त्यापैकी 1 लाख 76 हजार 23 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण प्रक्रिया पुर्ण केलेली आहे. आधार प्रमाणिकरण प्रक्रिया पुर्ण केलेल्या शेतकऱ्यापैकी 1 लाख 73 हजार 243 शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम 1,18,813 लाख रुपये जमा करण्यात आली आहे. उर्वरीत आधार प्रमाणिकरण केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात शासनामार्फत लवकरच कर्जमुक्तीची रक्कम जमा करण्यात येणार आहे, असेही सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक डॉ. अमोल यादव यांनी कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...