Saturday, April 11, 2020

विशेष लेख :-


लॉकडाऊनच्या काळात प्रशासनातील संवेदनशील अधिकाऱ्यांनी तिला मिळवून दिला निवारा...*उदयपूर ऐवजी नांदेडला पोहचली होती महिला..


नांदेड जिल्हा प्रशासनातील संवेदनशील अधिकारी व कर्मचारी यांच्या समयसूचकते मुळे एका परप्रांतीय मतिमंद असलेल्या महिलेला मिळाला हक्काचा निवारा. नुसता निवाराच नव्हे तर लॉकडाउन नंतर तिला तिचे हक्काचे घर मिळणार आहे. असे प्रयत्न जिल्हा प्रशासन करीत आहे,
कोरोना साथ रोगाच्या नियंत्रणासाठी जागोजागी पोलिसांनी चेक पोस्ट लावले आहेत. नांदेड जिल्ह्यातील सर्वच महत्त्वाचे रस्ते पोलिसांच्या व जिल्हा प्रशासनाच्या नजरेखाली आहेत. तणाव, सततची धाव पळ चालू असलेल्या या लॉकडाऊनच्या धामधुमीत नांदेड हैदराबाद रस्त्यावरील कुंटूर ते नायगाव या मार्गावर एक महिला अनवाणी फिरत असल्याचे कुंटूर पोलीस स्थानकाचे पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक शेख यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ त्या महिलेला ताब्यात घेतले व ही बाब वरिष्ठ स्तरावर कळवण्यासाठी नांदेड येथे पोलीस नियंत्रण कक्ष तसेच जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक श्री प्रशांत देशपांडे यांना कळवले. देशपांडे यांनी त्यांच्या व्यस्ततेत देखील कसलाही विलंब न करता ही बाब जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आणून दिली. जिल्ह्यातील तसेच परप्रांतीय कोणीही व्यक्ती लॉकडाऊनच्या काळात उपाशी व निवाऱ्या व्यतिरिक्त रहाता कामा नये असे तळमळीने काम करणारे जिल्हाधिकारी डॉ. विपीन व त्यांच्या टीम करीत आहे.त्याचा प्रत्यय येथेही या महिलेच्या निवारा आणि खाण्याची सोय केल्याने आला.
अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, उप जिल्हाधिकारी प्रशांत शेळके, प्रशासन अधिकारी राजेंद्र चव्हाण, मीडिया सेलचे डॉ.दीपक शिंदे यांनी तातडीने लक्ष घातले.या नंतर हसीलदार नांदे यांच्याशी संपर्क केला आणि नायगाव न. पा चे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांना या महिलेची काळजी घेण्याच्यासंदर्भात सुचना दिल्या.
राजस्थान मधील उदयपूर येथील सबरुन निसाबेगम असे या 55 वर्षीय महिलेचे नाव असून नायगाव येथील कॅम्प मध्ये व नंतर आता समाज कल्याणच्या वसतिगृहात तिला निवारा व भोजन याची सोय करण्यात आली आहे. नायगाव चे पत्रकार चाऊस व वसतिगृहाचे चव्हाण हे तिच्या भोजन व इतर सुविधाची काळजी घेत आहेत. ही महिला चुकून नांदेड येथे आलेली आहे. उदयपूर येथील ही महिला अजमेर येथे दर्शन घेण्यासाठी गेली होती तेथे चुकून ती नांदेडला येणाऱ्या रेल्वेत बसली आणि सरळ नांदेड येथे आली. नांदेड येथून नायगाव पर्यंत कशी पोहचली हे तिला सांगता येत नाही परंतु तिच्याकडे असलेल्या कागदपत्रांच्या व ओळख पत्राच्या आधारावर तिची ओळख पटवण्यात प्रशासनाला यश आले. अधिकाऱ्यां कडून या महिलेच्या नातेवाईकाकडे संपर्क केला जात असून लॉकडाऊन कालावधी संपल्यानंतर तिला तिच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे.
जिल्ह्यामध्ये असलेल्या इतर जिल्ह्यातील मजूर, कामगार तसेच नागरिक यांना निवारा, निवास व अन्न यांची सोय करण्याचा जिल्हा प्रशासन कसोसीने प्रयत्न करत आहे. माहिती मिळताच त्या ठिकाणी पोहचण्याचा प्रयत्न केला जात आहे. या साठी दानशूर व्यक्ती व सामाजिक संस्था यांची मदत घेतली जात आहे.
लॉकडाऊन च्या काळात या महिलेला निवारा तर मिळाला आहे परंतु नंतर तिला तिचं घर पाहायला मिळणार आहे. हे घडले ते केवळ सतर्क प्रशासन व माणुसकी मुळेच.
.......
**डॉ दीपक शिंदे
संचालक
माध्यम संकुल तथा सदस्य
मीडिया कक्ष,
जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...