Tuesday, April 14, 2020


विशेष लेख :
कृषी विभागाच्या समनव्यातून
भाजीपाला, फळांची शेतकरी ते ग्राहक थेट विक्री
           
नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील फळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध होत नसल्याने उत्पादित मालाची विक्री करण्यासाठी अडचणी येत आहेत तसेच व्यापारीही मालाची खरेदी करण्यासाठी पुढे येत नाहीत या परिस्थितीवर मात करून शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठी शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीचा पर्याय शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे व हे काम  अव्याहतपणे कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.
          जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी व प्रकल्प संचालक आत्मा श्री रविशंकर चलवदे यांच्या अध्यक्षतेखाली उपसंचालक आत्मा श्री एम.के. सोनटक्के, तंत्र अधिकारी एस. एस. स्वामी, आत्म्याचे श्रीहरी बिरादार यांच्या जिल्हास्तरीय कार्यक्रमगट स्थापन केला आहे.
            जिल्ह्यातील भाजीपाला फळे उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून रीतसर वाहतूक परवाना मिळवून देणे, फळे-भाजीपाला मागणीची नोंद घेणे,क्षेत्रीय स्तरावरील अडचणी सोडविणे, वाहतूक आढावा घेऊन त्यानुसार शेतकऱ्यांना विक्रीची संधी उपलब्ध करून देणे, तालुका, जिल्हा,नगरपालिका, महानगरपालिका  या जिल्ह्यांतर्गत मागणीसह राज्यातील इतर जिल्ह्यात व इतर राज्यात मागणीप्रमाणे फळे भाजीपाला विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.
जिल्ह्यात या माध्यमातून दररोज 90 ते 100 क्विंटल भाजीपाला तर 150 क्विंटल टरबूज व इतर फळांची विक्री शेतकरी ते ग्राहक थेट करण्यात येत असून संपूर्ण लॉकडाऊनच्या काळात अशी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येत आहे .
            नांदेड जिल्ह्यातील  हदगाव बिलोली भोकर कंधार नायगाव देगलूर नांदेड माहूर किनवट लोहा मुखेड मुदखेड यासह सर्वच तालुक्यात भाजीपाला व फळांची विक्री होत आहे. 
            कंधार तालुक्यातील भाजीपाला, टरबूज इत्यादी फळांची जिल्ह्यात तसेच स्थानिक बाजारपेठेत विक्री करण्यात येत असून लवकरच रितसर परवानगी घेऊन परराज्यात विक्री करण्यात येणार आहे.
            बिलोली तालुक्यातील टरबूज विक्री स्थानिक बाजारपेठेसह अकोला जिल्ह्यातही करण्यात आली आहे. 
             हदगाव येथेही  स्थानिक बाजारपेठेसह अन्य ठिकाणी मागणीप्रमाणे  भाजीपाला व फळांची विक्री होत असून नांदेड तालुक्यात  गुरुद्वारात लंगरसह  सोसायटीमध्ये भाजीपाला व इतर फळे विक्री करण्यात येत आहेत देगलूर भोकर तालुक्यातही गरजेप्रमाणे भाजीपाला फळे विक्री करण्यात येत असून याकामी कृषी विभागाकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहेत.
      तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी, मंडळ स्तरावर मंडळ कृषी अधिकारी तर गावस्तरावर कृषी पर्यवेक्षक कृषी सहाय्यक ,आत्म्याचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक  व कृषी मित्र या सगळ्यांच्या सहकार्याने ही साखळी तयार केली असून सोशल डिस्टंसिंग ,मास्क, सॅनिटायझरच्या वापरासह संपूर्ण काळजी घेत  येत्या काळात कुठल्याही प्रकारचा भाजीपाला व फळे कमी पडणार नाहीत आणि त्याचप्रमाणे भाजीपाला आणि फळांची विक्री शेतकरी ग्राहक थेट  होईल अशी व्यवस्था करण्यात येत आहे.     

-         रविशंकर चलवदे,
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नांदेड
*******

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...