Tuesday, April 14, 2020


कोरोना मुक्त नांदेड जिल्ह्यासाठी
अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी रहावे    
-         पालकमंत्री अशोक चव्हाण  
नांदेड दि. 14 :- कोरोना मुक्त नांदेड जिल्हा व कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहून सोपविण्यात आलेली कामे जबाबदारीने पूर्ण करावीत, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी  दिले.  
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते.  
यावेळी आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री अशोक चव्हाण म्हणाले, जिल्हा सिमेवर बिलोली तालुक्यात प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे सुविधा युक्त चेक पोस्ट उभारण्यात आलेला आहे. याचा उपयोग कोव्हीड 19 च्या अनुषंगाने आरोग्य तपासणीसह इतर अत्यावश्यक सुविधांसाठी उपयोगात आणता येईल. कोरोना संसर्गाविषयी आवश्यक ती काळजी घेऊन पावसाळ्यापूर्वी करावयाची अत्यावश्यक सेवेतील दुरुस्तीची कामे शासनाच्या निर्देशानुसार वेळेत पूर्ण करावी.
कोव्हीड 19 पार्श्वभुमीवर वैद्यकीय उपचारासाठी सेवावर्ग वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा मुळ ठिकाणी घ्यावी. जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मुख्यालय राहणे बंधनकारक राहील. वैद्यकीय सुविधा देण्यासाठी साधनसामुग्री, मनुष्यबळासह रुग्णालय अद्यावत ठेवावीत, आदी सुचना पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिल्या.  लॉकडाऊन काळात बाहेर जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांना परत त्यांच्या घरी जाण्यासाठी तसेच नांदेड जिल्ह्यातील बाहेर जिल्ह्यात अडकेलेल्या नागरिकांना परत नांदेड येथे त्यांच्या घरी आणण्यासाठी करावयाच्या व्यवस्थेची माहिती घेतली.
यावेळी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड 19 साठी ॲड सुरेंद्र घोडजकर यांनी 20 हजार रुपये तर महेश मगर यांनी 11 हजार रुपयांचा धनादेश पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केला.
000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...