Tuesday, April 21, 2020


बांधकाम कामगारांना 2 हजार रुपयांचे
अर्थसहाय्य बँक खात्यामध्ये थेट जमा होणार ;
दलालाच्या भुलथापांना बळी पडून कोठेही गर्दी करु नका
सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाचे आवाहन
नांदेड दि. 21 :- सध्या लॉकडाऊची परिस्थिती लक्षात घेता मंडळाकडील नोंदणीकृत सक्रिय (जिवीत) बांधकाम कामगारांना प्रत्येकी 2 हजार रुपये इतके अर्थसहाय्य त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट डीबीटीद्वारे जमा करण्यास शासनाने 18 एप्रिल रोजी मंजुरी दिली आहे. याबाबत बांधकाम कामगारांनी कोणत्याही दलालाच्या भुलथापांना बळी पडू नये, सामाजिक अंतर ठेवावे, कोठेही गर्दी करु नये व जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन नांदेडचे सहाय्यक कामगार आयुक्त मोहसीन अन्वर सय्यद यांनी केले आहे.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या लॉकडाऊन कालावधीत इमारत व इतर बांधकाम बंद झाले आहेत. राज्यातील इमारत व इतर बांधकामांवर काम करणाऱ्या नोंदणीकृत सक्रिय (जिवीत) बांधकाम कामगारांनी सध्या कोणतेही कामकाज करता येत नाही. त्यामुळे या सर्व नोंदणीकृत सक्रिय (जिवीत) बांधकाम कामगारांना बांधकामाच्या ठिकाणी अथवा त्यांच्या घरी थांबावे लागत आहे. त्यांना दररोजची रोजंदारी मिळत नाही. यामुळे त्यांना दैनंदिन गरजांची तजवीज करताना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सध्याची लॉकडाऊची परिस्थिती लक्षात घेता मंडळाकडील नोंदणीकृत सक्रिय (जिवीत) बांधकाम कामगारांना प्रत्येकी 2 हजार रुपये इतके अर्थसहाय्य त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट डीबीटीद्वारे जमा करण्यास शासनाने 18 एप्रिल 2020 रोजी मंजुरी दिली आहे.
नांदेड जिल्ह्यातील काही दलाल सक्रिय झाले असून घरोघरी जाऊन कामगारांना सांगत आहेत की, तुमचे पैसे येणार असून तुम्ही यासाठी पाचशे रुपये आम्हाला द्या व तुमचे कागदपत्रे द्या असे बोलून ठगत आहे. असे कोणी कामगारांस ठगत असेल तर त्याची तक्रार आपल्या जवळील पोलीस ठाणे येथे बांधकाम कामगारांनी करावी. सध्या देशात 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला असून संबंधीत नोंदणीकृत सक्रिय (जिवीत) कामागरांच्या खात्यावर डीबीटीद्वारे, रास्त कामगारांच्या खात्यावर महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ, मुख्यालयातून टाकण्यात येणार आहेत.
यामुळे बांधकाम कामगारांनी दलालाच्या भुलथापांना बळी पडू नये व सामाजिक अंतराचे तंतोतंत पालन करुन कोठेही गर्दी करु नये व प्रशासनास सहकार्य करावे, असेही आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त मोहसीन अन्वर सय्यद यांनी केले आहे.
0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...