Monday, January 6, 2020


समाजाच्या हितासाठी सकारात्मक पत्रकारिता करावी
- पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर
नांदेड, दि. 6 :- समाजाच्या हितासाठी सकारात्मक पत्रकारिता व्हावी ज्यातून समाज घडविला जाईल, असे प्रतिपादन पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी केले. जिल्हा माहिती कार्यालय नांदेड व एमजीएम पत्रकारिता महाविद्यालयाच्यावतीने दर्पण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. गोविंद हंबर्डे तर प्रमुख पाहूणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार देवदत्त तुंगार, माधव अटकोरे, दै. सामनाचे जिल्हा प्रतिनिधी विजय जोशी, प्रजावणीचे रवींद्र कुलकर्णी, जिल्हा माहिती अधिकारी मिरा ढास, प्राचार्य डॉ. गणेश जोशी, पत्रकार पंढरीनाथ बोकारे, बजरंग शुक्कला, गोपाळ देशापांडे, भारत दाढेल, महेंद्र देशमुख, सुरेश काशिदे, सुर्यकुमार यन्नावार, प्रविण खंदारे, संतोष जोशी, प्रशांत गवळे, सेवानिवृत्त जिल्हा माहिती अधिकारी रामचंद्र देठे यांच्यासह विविध मुद्रीत, ईलेक्ट्रॉनिक, छायाचित्रकार माध्यम प्रतिनिधी व पत्रकारिता विद्यार्थी आदींची उपस्थिती होती.
दर्पण दिनानिमित्त पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर म्हणाले की, पत्रकारितेने समाज आणि देश घडविला आहे. संघर्ष हा जीवनाचा पाया आहे. पोलीस आणि पत्रकार यांचे नाते अतूट आहे. पत्रकारांनी आपली लेखणी सकारात्मक विकासात्मक व सामाजिक न्यायासाठी वापरावी. समाजातील शोषित, पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी लिखान करावे. नकारात्मक बाबी ह्या विकासाला अडसर ठरत असतात. त्यामुळे नकारात्मकता बाजूला ठेवून लिखाण करणे आवश्यक आहे. त्यांनाही अनेक घडामोडींची माहिती ठेवावी लागते, असे सांगून श्री मगर म्हणाले पाक्षिक, साप्ताहिक, वृत्तपत्र, इलेट्रॉनिक्स पत्रकारिता आणि आता सोशल मीडिया असा प्रवास सुरु आहे. हे सर्व जण समाज घडविण्यासाठी प्रयत्न करतात. परंतु खरी बातमी प्रकाशित करणे ही जबाबदारी लक्षात ठेऊन पत्रकारिता व्हावी अशी अपेक्षाही पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी व्यक्त केली.
दै. सामनाचे जिल्हा प्रतिनिधी विजय जोशी यांनी दर्पण दिन व भित्तीपत्रकाचे महत्व सांगून पत्रकारांनी सत्यता, विश्वासर्हता, वस्तुस्थिती, मानवहित समजून लिखान केले पाहिजे.
जिल्हा माहिती अधिकारी श्रीमती मीरा ढास म्हणाल्या की , आरोग्य चांगले राहिले तर लिखाणातले कौशल्य आपण टिकून ठेऊ शकतो. माध्यमाला अनेक ठिकाणाहून माहितीचा स्त्रोत मिळत असतो. बातमीची सत्यता पडताळणी करुन लिखाण केले पाहिजे.
अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाचा समारोप करताना डॉ. गोविंद हंबर्डे यांनी माध्यम हे समाजाचे आधारस्तंभ आहे. माध्यम प्रतिनिधींनी आरोग्याकडे लक्ष देऊन या क्षेत्रात चांगले करिअर करावे, असे आवाहन त्यांनी केले.  
प्रास्ताविकात पत्रकारिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गणेश जोशी यांनी पत्रकारितेतील आव्हाने स्विकारुन सकारात्मकतेच्या दिशेने पुढे गेले पाहिजे. तसेच वृत्तपत्र, पत्रकारिता महाविद्यालयाच्या वाटचालीची त्यांनी माहिती दिली.
सुरवातीला दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीस उपस्थितांनी पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. सूत्रसंचालन ऋषीकेश कोंडेकर यांनी केले तर आभार प्राध्यापक सतीश वाघरे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राध्यापक डॉक्टर प्रवीणकुमार सेलूकर, प्राध्यापक राजपाल गायकवाड, दिशा कांबळे , हनुमंत, जिल्हा माहिती कार्यालयाचे छायाचित्रकार विजय होकर्णे, विवेक डावरे, काशिनाथ आरेवार व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
0000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   392   23 उमेदवारांचे भवितव्य 4 जून पर्यंत मतयंत्रात बंद ; निरीक्षकांच्या उपस्थितीत सर्व पेटया स्ट्राँग रूममध्ये   ·      लोकसभा...