Wednesday, December 12, 2018


दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये फळबागांचे व्यवस्थापन
- सचिंद्र प्रताप सिंह कृषि आयुक्त
राज्याचे ढोबळमानाने मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र असे चार विभाग पडतात. यामध्ये कोकण विभागात आंबा,काजु, नारळ, चिकु,सुपारी, पश्चिम महाराष्ट्रात केळी, पपई, पेरु, द्राक्ष,डाळींब, सिताफळ, लिंबु, मराठवाडा विभागात मोसंबी, लिंबु, डाळींब, आंबा, सिताफळ विदर्भात संत्रा, मोंसबी, लिंबु, आंबा, सिताफळ, केळी, बोर, डाळींब, पेरु, आवळा, पपई इ. फळपिकाची प्रामुख्याने उत्पादन घेतले जाते.
सुक्ष्म सिंचन पध्दतीचा वापर
उन्हाळ्यात किंवा दुष्काळ सदृष्य काळात फळबागा वाचविण्यासाठी सुक्ष्म सिंचन मुख्यत: ठिबक पध्दतीचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजेच पारंपारिक पध्दती पेक्षा 50 ते 60 टक्के पाणी बचत होते. शिवाय दर्जेदार व अधिक उत्पादन मिळते. तसेच मजुरां वरील व खता वरील खर्च कमी होतो. यामुळे शेतकरी बंधूंनी सुक्ष्म सिंचन पध्दतीचा वापर करावा व कमीत कमी पाण्यामध्ये आपल्या फळबागा टिकवाव्यात. प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना प्रति-थेंब अधिक पिक या योजने अंतर्गत अल्प, अत्यल्प अनुसूचित जाती-जमाती या शेतक-यांना एकूण खर्चाच्या 55 टक्के अनुदान व इतरशेतक-यांना 45 टक्के अनुदान सुक्ष्म सिंचनासाठी देण्यात येते.
मटका सिंचन पध्दतीचा वापर
उन्हाळ्यामध्ये मटका सिंचनाव्दारे सुध्दा आपण फळबागा जगविणे शक्य आहे. फळबागांच्या वयोमानानुसार प्रतिझाड 5 लिटर क्षमतेचे 2 ते 4 मटक्याचा उपयोग करावा. मटक्याच्या तळाशी छिद्र पाडून त्यामध्ये कपडयाची गाठ बसवून मटक्याचे तोंड जमिनीच्या दोन इंच वर राहील अशा बेताने ज्या भागात झाडाची तुंतुमय मुळे जास्त प्रमाणात असतील. (दुपारी 12 वाजता झाडाच्या सावलीच्या आतील बाजूस) पुरावे. यामुळे आवश्यकते नुसार व सतत झाडाला पाण्याचा पुरवठा होत राहील.
आच्छादनाचा वापर
ठिबक सिंचना सोबत जर आपण आच्छादनाचा वापर केला तर प्रखर सूर्यप्रकाशामुळे व अधिक तापमानामुळे जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन क्रिया आटोक्यात येईल आणि जमिनीतील ओलावा जास्त काळ टिकून राहील व जमिनीची धूप देखील कमी होईल. आच्छादना करिता आपण विविध प्रकारचे साहित्य वापरू शकतो. उदा. वाळलेले गवत, पालापाचोळा,सोयाबिनचा भुसा,ऊसाचे पाचट,गव्हाचे काड,केळीची वाळलेली पाने, तुरकाडया,कपाशीच्या पऱ्याटी,लाकडाचा भुसा इ. अशा नैसर्गिक आच्छादनांची जाडी ही 12 ते 15सेमी असावी व हे आच्छादन झाडाच्या पूर्ण परिघात करावे.
सेद्रींय आच्छादनासाठी साहित्य उपलब्ध न झाल्यास प्लॅस्टिक पासून बनविलेल्या वस्तूंचा उपयोग करून आच्छादन करू शकतो (पॉलिथीनमल्चिंग). यामध्ये यु.व्ही.स्टबिलाईज्ड फिल्मचा वापर केला जातो. जास्त कालावधीच्या बहुवर्षायु फळपिका करिता या फिल्मची जाडी ही 100 ते 200 मायक्रॉनअसावी. पॉलिथीन आच्छादनासाठी एकूण खर्चाच्या 50 टक्के, जास्तीत जास्त 16 हजार रुपये मर्यादेपर्यंत प्रतिहेक्टरी अनुदान एकात्मिक फलोद्यान विकास अभियान मधून दिले जाते.

झाडांचे छत्र व्यवस्थापन
झाडाने शोषण केलेल्या पानाच्या जवळपास 98 टक्के पाणी हे झाडांची तापमान नियंत्रित करणे करिता पानाव्दारे पाण्याचे उत्सर्जन करीत असते. हे उत्सर्जन नियंत्रित करणे करिता उपाययोजना कराव्यात.
बाष्परोधकांचा वापर :- प्रकाश संशलेषणावर विपरित परिणाम न करता पानाव्दारे पाण्याचे उत्सर्जन नियंत्रित करणे करिता विविध बाष्परोधकांचा उदा.केओलिन, फिनील मर्क्युरिक ॲसिटेट वापर करून झाडाच्या पाण्याची आवश्यकता कमी करावी. झाडावर 2 ते 8 टक्के तिव्रतेच्या केओलिन या बाष्परोधकाची फवारणी दर 2 आठडयाच्या अंतराने फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवडया पासुन ते पाऊस सुरु होई पर्यंत फवारण्या कराव्यात. फळझाडावर पोटॅशिअम क्लोराईडच्या 1 टक्के द्रावणाची फवारणी केल्यास दुष्काळी परिस्थितीत झाडे तग धरु शकतात.
झाडांची छाटणी :- झाडाची हलकी छाटणी करावी. त्यामुळे पानांची संख्या कमी होईल व पाण्याचे उत्सर्जन कमी होण्यास मदत होईल. या शिवाय पाण्याच्या उपलब्ध ते नुसार बहार घ्यावयाचा किंवा नाही हे ठरवावे.
झाडांवरील पानोळा कमी करावा. (डिव्होलिएशन) :- छाटणी शिवाय पानांची संख्या कमी करावी. त्या करिता विविध रसायने उपलब्ध् आहेत त्याचा वापर करावा. उदा.सायकोसिल.
खोडांचे उन्हापासून संरक्षण
जमिनीत असलेल्या कमी ओलाव्यामुळे आणि उन्हाळ्यात प्रखर सूर्यप्रकाशामुळे झाडांच्या खोडास इजा होण्याची शक्यता असते. त्याकरिता उन्हाळयाच्या सुरुवातीस फळझाडांच्या मुख्य खोडास 1 टक्का बोर्डो पेस्टचा लेप द्यावा. तसेच ज्या भागात उन्हाची तीव्रता जास्त आहे. अशा परिस्थितीत मुख्य खोडास गवताने किंवा बारदानाने झाकून घ्यावे व सुतळीच्या सहाय्याने घट्ट बांधून घ्यावे.
जमिनीत पाणी धरून ठेवणा-या घटकांचा वापर करावा:- मातीमध्ये मिसळणारे आणि त्यांच्या वजनाच्या 200 ते 300 पट अधिक पाणी धरून ठेवणारे घटक जसे जलशक्ती, अमरशक्ती, पोटॅशिअम नायट्रेट सारखी रसायने जमिनीत टाकावीत. तसेच जमिनीतील सेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढविण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे जमिनीची पाणी साठवून धरण्याची क्षमता वाढविण्यास मदत होते.
नवीन झाडाकरिता सावली करावी :- नवीन फळझाडाची लागवड केळी असल्यास त्याकरिता पहिल्या वर्षी विशेष काळजी घ्यावी. ही झाडे अती उष्णतेमुळे करपून किंवा जळून जाण्याची शक्यता असते. त्याकरिता शेतातच उपलब्ध साहित्याच्या किंवा प्रत्येक झाडास शेडनेटचा मंडप करून नवीन झाडांना सावली करावी. ज्या शेतक-यांकडे ठिबक सिंचनाची व्यवस्था नाही अशा शेतक-यांनी सिंचनासाठी दोन सरी पध्दतीचा किंवा खळगे पध्दतीचा वापर करावा व त्यावर आच्छादनाचा वापर करावा.
या शिवाय, खते शक्यतो फवारणी अथवा ठिंबक सिंचनाव्दारे देण्यात यावीत. झाडावरील अतिरिक्त फळे, फण्यांची विरळणी करावी.पक्व झालेल्या फळांची काढणी करावी. बागेभोवती 50 टक्के शेडनेट वापरुन वारा संरक्षक कुंपन करावे. शेताची सर्वसाधारण स्वच्छता राखावी , झाडावरील रोगट किडक्या फादंया काढायाव्यात. शेत तणमुक्त ठेवावे. केळीची पिल्ले नियमित कापावीत. फळबागेत आंतरमशागतीची कामे करुन वाफ्यातली माती भुसभुशीत ठेवावी.
शेततळयामध्ये पाणी उपलब्ध असल्यास फळबागा जिवंत राहतील या पध्दतीने सिंचन करावे. तसेच ज्या शेतक-यांना शेततळे घ्यावयाचे त्यासाठी मागेल त्याला शेततळे या योजनेतून 100 टक्के अनुदान शेततळे करण्यासाठी जास्तीत 50 हजार रुपये मर्यादेपर्यंत देण्यात येते.
-----

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   401 लोकसभा निवडणुकीतील सहभागी कर्मचाऱ्यांचे यावर्षी विक्रमी मतदान   10 हजारावर  कर्मचाऱ्यांनी बजावला मताधिकार   नांदेड दि. 2 ...