Wednesday, December 12, 2018


कापसाची फरदड घेणे टाळावे
-         कुलगुरु डॉ. अशोक ढवण
नांदेड दि. 12 :- पुढील हंगामातील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी चालू हंगामातील कापसाची फरदड घेऊ नये, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणीचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी केले. नांदेड येथील कापूस संशोधन केंद्रमध्ये 9 डिसेंबरला आयोजित कापूस फरदड निर्मुलन कार्यशाळेतते बोलत होते.
या कार्यशाळेस वनामकृवि परभणीचे संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर, उपविभागीय कृषि अधिकारी बाळासाहेब कदम, कापूस संशोधन केंद्राचे कापूस विशेषज्ञ डॉ. खिजर बेग, जिल्ह्यातील तालुका कृषि अधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या उदघाटनाप्रसंगी डॉ. ढवण म्हणाले, बीटी कापसातील गुलाबी बोंडअळीची प्रतिकरक्षमता लोप पावल्यामुळे या अळीचे एकात्मिक पद्धतीनेच व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. त्याकरिता शेतकऱ्यांनी घरच्या घरी निंबोळी अर्क तयार करावा. विविध वाण व तंत्रज्ञानाचा तूलनात्मक अभ्यास शेतकऱ्यांनी करावा. प्राप्त ज्ञानाचा अन्य शेतकऱ्यांपर्यंत विस्तार माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करावा. कृषि विद्यापीठ व कृषि विभागाच्या समन्वयाने खरीप हंगामात शेंदरी बोंडअळी व्यवस्थापन मोहिमेमुळे शेतकऱ्यांच्या लागवड खर्चात बचत होवून उत्पादनात देखील सरासरी एक ते दोन क्विंटल पर्यंत वाढ झाल्याची दिसून आले आहे, असे त्यांनी सांगितले. यापुढे देखील शेतकऱ्यांना अडचणी सोडविण्यासाठी कृषि विद्यापीठ सदैव तत्पर राहील अशी ग्वाही कुलगुरु डॉ. ढवण यांनी दिली.
सद्यस्थितीमध्ये कपाशीच्या बोंडामध्ये काही प्रमाणात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. कापसाची फरदड ठेवल्यास पुन:श्च प्रादुर्भाव वाढेल, असे कापूस विशेषज्ञ डॉ. खिजर बेग यांनी कार्यशाळेच्या प्रस्ताविकामध्ये सांगितले. सध्या राज्यामध्ये कापसाची फरदड घेण्यात येऊ नये म्हणून त्याचे दुष्परिणामांची माहिती देणाऱ्या घडीपत्रिकेची विमोचन यावेळी मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.
चालू वर्षात जुलै-ऑगस्ट महिण्यात शेतकऱ्यांनी विद्यापीठ, कृषि विज्ञान केंद्र व कृषि विभाग यांच्या सल्ल्याने एकत्मिक पद्धतीने गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन केल्यामुळेच आपण हंगामामध्ये प्रादुर्भाव नियंत्रणात ठेऊ शकलो. याकरिता विद्यापीठ शास्त्रज्ञांचे कृषि विभागास तत्परतेने सहकार्य लाभत असल्याचे श्री कदम यांनी सांगितले.
कापूस पिकावरील संशोधनात नांदेड येथील कापूस संशोधन नेहमीच अग्रेसर असुन गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावाचे संकेत, त्यावरील उपाययोजना याबाबतची तांत्रिक माहिती या संशोधन केंद्राने बोंडअळीचा प्रादुर्भाव राज्यामध्ये होण्यापूर्वीच दिली होती. सध्या कापसाची पऱ्हाटी शेताबाहेर काढून नष्ट करण्यासाठी जनजागृती करणे अनिवार्य आहे असे संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी सांगितले.
यावेळी प्रथम दर्शनी पीक प्रात्यक्षिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना निविष्ठांचे वाटप करण्यात आले. अर्धापूर तालुक्यातील मौ. जांभरुन येथील प्रात्यक्षिक घेणाऱ्या मन्मथ गवळी या शेतकाऱ्याने या कार्यक्रमात अन्य शेतकऱ्यांना नविन तंत्रज्ञानामुळे त्यांना मिळालेल्या फायदयाची माहिती दिली.
या कार्यशाळेच्या तांत्रिक सत्रामध्ये प्रा. अरविंद पांडागळे यांनी कापूस फरदड निर्मूलन बाबत व गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन बाबत डॉ. शिवाजी तेलंग यांनी माहिती दिली. भविष्यामध्ये गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व भागामध्ये एकत्रितपणे जनजागृती करण्याचे नियोजन यावेळी करण्यात आले. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन अ. द. पांडागळे यांनी केले व प्रा. डी. व्हि. पाटील यांनी सर्वांचे आभार मानले. ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी डॉ. पवन ढोके, श्री शेळके, श्री पांचाळ, श्री शिंदे, श्री जोगपेटे व श्री कळसकर इत्यादींनी परिश्रम घेतले.
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   401 लोकसभा निवडणुकीतील सहभागी कर्मचाऱ्यांचे यावर्षी विक्रमी मतदान   10 हजारावर  कर्मचाऱ्यांनी बजावला मताधिकार   नांदेड दि. 2 ...