Sunday, October 14, 2018


महाआरोग्य शिबिरातून ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी
जवरलाच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही
  - जिल्हाधिकारी अरुण डोंगरे 
नांदेड, दि. 14 :- शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्याबरोबरच महाआरोग्य शिबिरातून ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेण्यात येत असून जवरल गावाच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.    
राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी दत्तक घेतलेले किनवट तालुक्यातील गाव जवरला येथे जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड, आरोग्य विभाग व मानव विकास कार्यक्रमांतर्गत सर्व रोगनिदान महाआरोग्य शिबिराचे आयोजन जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांचे हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.  

यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल, तहसीलदार नरेंद्र देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक बाबाराव कदम, मांडवी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक शिवाजी कंधारे, जिल्हा परिषदेचे व्ही. आर. मेकाने, मांडवी पंचायत समितीचे सदस्य जितेंद्र कांबळे, कोठारी पंचायत समितीचे सदस्य ईंदलसिंग राठोड, किनवट आरबीएसके टिमचे डॉ. अभिजित ओहळ, आरोग्य समिती मराठवाडा विकास महामंडळाचे अशोक बेलखोडे, तालुका आरोग्य अधिकारी संजय मुरमुरे, जिल्हा परिषदेचे सदस्य मधुकरराव राठोड, गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. चक्रवर्ती चंद्रे, जवरला ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्रीमती छाया शेंडे आदिंची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
श्री. डोंगरे म्हणाले, शिक्षणातून आरोग्य चांगले ठेवले जाते. ग्रामस्थांनी आरोग्यासाठी शिक्षणाकडे लक्ष दयावे. परिसर स्वच्छ ठेवून  महिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लिहून दिलेल्या औषधांचा लाभ घ्यावा. जिल्ह्यात तालुका, ग्रामस्तरावर अशी शिबीरे घेण्यात येत आहेत. या शिबिरात गरोदर व स्तनदा मातांची तपासणी, बालकांची तपासणी (मानव विकास कार्यक्रम). नेत्ररोग विषयक तपासण्या व सल्ला, सिकलसेल तपासणी, असंसर्गिक आजारांबाबत (रक्तदाब, मधूमेह, कर्करोग) (एन.सी.डी. कार्यक्रम). या शिबिरातून तपासणी प्राधान्याने करण्यात येणार आहेत. आदिवासी विभागामार्फत घरकुल योजना व ग्रामस्थांसाठी शौचालय मंजूर करण्यात येणार आहेत. तसेच फलोत्पादन वाढविण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे. तहसीलदाराकडे शेतकऱ्यांनी विहिरीसाठी अर्ज करावीत.  जवरला गावाच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही. गावातील नागरिकांनी बचतगटातून उद्योगात पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी केले.  
आयुष्यमान भारत कार्यक्रमांतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राबविण्यात येत आहे. आयुष्यमान आरोग्य योजनेमधून जवरला या गावातील नागरिकांचा समावेश करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांच्या हस्ते आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे गोल्डन कार्डचे दहा लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. तसेच उभारी योजनेंतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील सदस्य नितीन सचिन राठोड यांना रब्बी हंगामासाठी हरभरा बियाणे वाटप करण्यात आले. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कार्यक्रमांतर्गत रब्बी हंगामासाठी 10 हेक्टरवर हरभरा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. धर्मपाल गोविंद कणापाक व रघुनाथ माधव मरकोल्हे यांना प्रातिनिधीक स्वरुपात बियाणे वाटप करण्यात आले.   
सर्व रोगनिदान महाआरोग्य शिबिरात गरोदर माता- 96, स्तनदा माता- 62, शुन्य ते सहा महिने वयोगटातील बालक- 62 इतर रुग्ण पुरुष- 196, महिला-180, सीकलसेल तपासणी- 42, विविध आजारांची रक्त तपासणी 220 रुग्णांची तज्ज्ञ डॉक्टांराकडून आरोग्य तपासणी मोफत करण्यात आली. जवरला येथील ग्रामस्थ तसेच लगतच्या गावातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात या शिबिराला उपस्थित होते.
प्रास्ताविक डॉ. संजय मुरमुरे यांनी केले तर वैद्यकीय अधिकारी डॉ. वामन बहात्रे यांनी आभार मानले. सुरुवातीला धन्वंतरी व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन दिपप्रज्वलन करण्यात आले.
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   405   नांदेड जिल्ह्यात ड्रोन उडविण्यास प्रतिबंध नांदेड दि. 3     - नांदेड जिल्ह्यात   4   ते   7   मे 2024   या कालावधीत ड्रो...