Thursday, August 16, 2018


20 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर सामाजिक ऐक्य पंधरवडा
सद्‌भावना दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
नांदेड, दि. 16 :- केंद्र शासनाच्या युवा व क्रीडा मंत्रालय यांच्या निर्देशानुसार दिवंगत प्रधानमंत्री राजीव गांधी यांचा जयंती दिवस 20 ऑगस्ट हा दरवर्षी "सद्‌भावना दिवस" म्हणून साजरा करण्यात येणार आहे. तसेच केंद्र शासनाच्या मानव संसाधन विकास मंत्रालयामार्फत या सद्‌भावना दिवसाच्या अनुषंगाने दि.20 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर 2018 हा पंधरवडा सामाजिक ऐक्य पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येणार आहे. राज्यातील विविध प्रदेशातील अनेक धर्मांच्या व अनेक भाषा बोलणाऱ्या लोकांमध्ये एकमेकांविषयी ऐक्याची भावना सौहार्द भाव वृद्धिंगत करणे व हिंसाचार टाळणे ही प्रमुख उद्दिष्टे हा पंधरवडा साजरा करण्यामागे आहेत. त्यानुसार संबंधीत विभागांनी करावयाच्या कार्यवाही व कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी नांदेड यांनी दिले आहेत.
20 ऑगस्ट सद्‌भावना दिवस म्हणून साजरा करण्यासाठी या दिवशी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. मंत्रालयाच्या प्रांगणात दि.20 ऑगस्ट 2018 रोजी सद्‌भावना दिवस साजरा करण्यात येणार असून यावेळी सर्व उपस्थितांना सद्‌भावना दिवसाची प्रतिज्ञा घेण्यास सांगण्यात येणार आहे. तसेच याच दिवशी सद्‌भावना शर्यतही आयोजित करण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत सद्‌भावना या विषयावर समूहगान आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात येणार आहेत.
महसूल विभागाच्या आयुक्तांमार्फत सद्‌भावना शर्यत आयोजित करण्यासह त्यांच्या कार्यालयातून सद्‌भावना दिवसाची प्रतिज्ञा घेण्याचा कार्यक्रमही आयोजित करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व कार्यालये, जिल्ह्यांच्या मुख्यालयात व संबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वधर्म प्रार्थना सभा घेणे, सर्व उपस्थितांना सद्‌भावना शपथ घेण्यास सांगणे, सद्‌भावना शर्यत आयोजित करणे, युवकांच्या सहभागाने सद्‌भावना या विषयावर समूहगान आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याचे सूचित करण्यात आले आहे. विद्यापीठे, महाविद्यालये आणि शाळांमध्ये सुद्धा अशाच प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
20 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर 2018 हा पंधरवडा सामाजिक ऐक्य पंधरवडा म्हणून साजरा करण्यासाठीही वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करावेत.  सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यासाठी मानवी साखळी सारखे कार्यक्रम राज्यातील जिल्हा मुख्यालयात, संबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करावेत. जिल्हाधिकाऱ्यांनी युवक परिषदा आयोजित करुन त्यामध्ये जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांना भाषण देण्यासाठी निमंत्रित करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. सदर पंधरवड्यात जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणे सूचित करण्यात आले आहे.
00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   392   23 उमेदवारांचे भवितव्य 4 जून पर्यंत मतयंत्रात बंद ; निरीक्षकांच्या उपस्थितीत सर्व पेटया स्ट्राँग रूममध्ये   ·      लोकसभा...