Friday, May 4, 2018


"नीट" परीक्षा काटेकोरपणे सुरळीत पार पाडावी
- निवासी उपजिल्हाधिकारी कारभारी
नांदेड दि. 4 :- "नीट" ही परीक्षा विद्यार्थ्यांच्या आयुष्याला वळण देणारी ही एक महत्वपूर्ण परीक्षा आहे. त्यामुळे नियमावलीनुसार कोटेकोर नियोजन करुन परीक्षा सुरळीतपणे पार पाडावी, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांनी दिले. वैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रवेश पूर्व परिक्षा "नीट"  रविवार 6 मे 2018 रोजी होणार आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय येथे नुकतीच आयोजित "नीट" परीक्षा बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी श्री कारभारी बोलत होते. 
नांदेड येथील "नीट" परीक्षेसाठी 17 हजार 400 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. जिल्ह्यातील 44 केंद्रावर परीक्षा होणार आहे. ही परीक्षा व्यवस्थीत पार पाडण्याची जबाबदारी पर्यवेक्षकांनी समर्थपणे पार पाडावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी श्री. कारभारी यांनी केले.
यावेळी परीक्षेसाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, परीक्षेचे गोपनय साहित्‍य, आवश्‍यक पोलीस बंदोबस्‍त, परीक्षा केंद्रावर पाण्‍याची व्‍यवस्‍था, आरोग्‍य पथकाची नेमणूक, विद्युत व्यवस्था, विद्यार्थ्‍यांसाठी हेल्पलाइन सेवा, परीक्षा उपकेंद्रातील अंतर लक्षात घेता शहरात जादा सिटी बसची व्‍यवस्‍था तसेच बाहेरुयेणाऱ्या-जाणाऱ्या विद्यार्थ्‍यांसाठी जलद बसला थांबा देण्याच्या सूचना दिल्‍या.
बैठकीस पोलीस अधीक्षक कार्यालयाचे एपीआय वैजनाथ मुंडे, मनपाचे उपशिक्षणाधिकारी डी. आर. बनसोडे, विस्तार अधिकारी एस. आर. आळंदे, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाचे डॉ. व्ही. एम. इंगळे, राज्य परिवहन महामंडळाचे एन. एस. निम्मनवाड, नीट परीक्षेचे जिल्हा संपर्क अधिकारी फनिंद्रा बोरा, नीट अधिकारी आशिष शिरसाठ, आदी उपस्थित होते.  
000000

No comments:

Post a Comment