Monday, January 29, 2018

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत
ऑनलाईन अर्ज केलेल्या शेतकऱ्यांनी
बँकेशी संपर्क करुन माहिती द्यावी   
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
नांदेड दि. 29 :- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज केलेल्या शेतकऱ्यांनी कर्जखाते असलेल्या बॅंक शाखेशी संपर्क साधून कर्जमाफीचा अर्ज राज्यपातळीवर निर्णय घेणे शक्य नसलेल्या शेतकऱ्यांच्या यादीत आहे किंवा नाही याची खात्री करावी. पात्रता, अपात्रतेच्या संदर्भात आपल्याकडे उपलब्ध असलेली माहिती तीन दिवसांचे आत संबंधीत बॅंक शाखेस पुढील कार्यवाही करण्यासाठी देण्यात यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.  
तसेच रु. 1.50 लाखापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या हिश्यांची संपूर्ण रक्कम 31 मार्च 2018 पर्यंत बँकेत जमा केल्यानंतर शासनातर्फे रु. 1.50 लाख लाभाची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येणार असल्याने संबंधीत शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत आपल्या हिश्याची रक्कम मुदतीत भरुन (OTS) योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 अतंर्गत नांदेड जिल्ह्यात 2 लाख 66 हजार 135 शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत. योजनेच्या निकषानुसार नांदेड जिल्ह्यातील व्यापारी बँका, ग्रामीण बँक व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी त्यांच्याकडे असणाऱ्या कर्ज खात्याची माहिती शासनाचे पोर्टलवर सादर केली आहे. शेतकऱ्यांनी दाखल केलेली माहिती व बँकेकडून आलेल्या कर्जखात्यांच्या माहितीची सांगड घालण्यात येऊन त्याची संगणकीय पध्दतीने प्रक्रिया करण्यात आली आहे. या प्रक्रियेत अर्जदार बँकेकडील माहितीच्या आधारे ताळमेळ घालून जे अर्जदार या योजनेअंतर्गत पात्र ठरले आहेत, त्या अर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी व प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी 1 लाख 24 हजार 639 लाभार्थी शेतकऱ्यांच्या यादीसह 669.89 कोटी रुपये शासनामार्फत सर्व बँकाना ऑनलाईन पध्दतीने वितरीत करण्यात आले त्यानूसार सर्व सबंधित बँकांनी प्राप्त झालेल्या याद्यांची व रक्कमांची शहानिशा करुन 1 लाख 24 हजार 639 पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर रु. 518.59 कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहे.
या प्रक्रिये दरम्यान नांदेड जिल्ह्यातील बँकानी पुरविलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांच्या माहितीतील त्रुटी, तसेच शेतकऱ्यांच्या अर्जामध्ये अपुऱ्या माहितीमुळे ताळमेळ होऊ शकला नाही अशा प्रकरणातील शेतकऱ्यांच्या बाबतीत प्रक्रिया होऊन अंतिम निर्णय घेणे शक्य होत नाही. या प्रकरणी निकषात बसणारे अर्जदार शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये म्हणून अशा शेतकऱ्यांच्या अर्जातील माहितीची बँकेकडील असलेल्या माहितीच्या आधारे शहानिशा करुन त्यांची पात्रता, अपात्रता निश्चित करण्याची जबाबदारी शासनाने पुढील तालुकास्तरीय समितीकडे सोपविली आहे. तालुका उप/सहायक निबंधक, सहकारी संस्था :- अध्यक्ष. लेखापरीक्षक, सहकारी संस्था :- सदस्य सचिव. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा तालुका / विभाग विकास अधिकारी- सदस्य. तालुक्यातील विविध बँकांचे शाखाधिकारी (प्रकरण परत्वे) - सदस्य.

नांदेड जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या अर्जावर राज्य पातळीवर निर्णय घेणे शक्य नसलेल्या शेतकऱ्यांच्या अर्जाचा तपशील (बँकेकडील आकडेवारीसह) जिल्हा, तालुका व बॅंक शाखानिहाय शासनाकडून पोर्टलवर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तसेच सबंधीत बॅंक शाखांना त्यांना उपलब्ध करुन दिलेल्या युझर आईडी व पासवर्डच्या आधारे अशा याद्या उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. सदरील याद्या डाऊनलोड करुन त्यांचे प्रिंट काढून संबंधीत शाखेच्या सुचना फलकावर जाहीररित्या प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. संबंधीत बँकेचे शाखधिकाऱ्यांनी स्थानिक प्रसार माध्यमातून त्याबाबत त्यांचे स्तरावरुन जाहीररीत्या प्रसिध्दी दिली आहे, अशी माहिती निवेदनात दिली आहे.                                                       000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   392   23 उमेदवारांचे भवितव्य 4 जून पर्यंत मतयंत्रात बंद ; निरीक्षकांच्या उपस्थितीत सर्व पेटया स्ट्राँग रूममध्ये   ·      लोकसभा...