Saturday, July 22, 2017

हरितगृह, शेडनेटगृहासाठी शेतकऱ्यांनी
20 ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी
   नांदेड, दि. 22 :- हरीतगृह, शेडनेटगृह प्लास्टीक आच्छादन या योजनेचा लाभ घेण्यासाठी रविवार 20 ऑगस्ट 2017 पर्यंत शेतकरी लाभार्थ्यांनी www.hortnet.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करुन स्कीम फाईल करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. तुकाराम मोटे यांनी केले आहे.   
नांदेड जिल्ह्यासाठी राष्ट्रीय कृषि विकास योजना सन 2017-18 मध्ये संरक्षित प्रकल्पासाठी 240 लाख रुपयाचा आराखडा मंजुर झाला आहे. यामध्ये अनुसुचीत जातीसाठी 35 लाख 77 हजार रुपये, अनुसुचीत जमातीसाठी 18 लाख 32 हजार सर्वसाधारणसाठी 185 लाख 91 हजार रुपये अनुदान असा आर्थिक कार्यक्रम प्राप्त झाला आहे. या योजनेअंतर्गत हरीतगृह, शेडनेटगृह प्लास्टीक आच्छादन याबाबींचा समावेश आहे.
जिल्हा अभियान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समिती बैठकीत प्राप्त उद्दीष्टाच्या अधीन राहुन अर्ज केलेल्या लाभार्थ्यांची निवड लॉटरी पध्दतीने करण्यात येणार आहे. या घटकांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी www.hortnet.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. इच्छुकांनी प्रत्येक बाबीसाठी स्वतंत्रपणे ऑनलाईन अर्ज करावा. ऑनलाईन अर्ज करण्यास अडचण येत असेल तर आपल्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधुन अर्ज भरुन घ्यावा. योजनेच्या अधीक माहितीसाठी लाभार्थ्यांनी संबंधीत तालुका कृषि अधिकारी यांचेशी संपर्क करावा, असेही आवाहन डॉ. मोटे यांनी केले आहे.

00000000

No comments:

Post a Comment