Monday, July 28, 2025

दि. २६ जुलै 2025

 वृत्त क्र. 769

कीटकजन्य आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी 

नागरिकांनी सहकार्य करावे- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख 

नांदेड, दि. २६ जुलै : सध्याच्या पावसामुळे आणि त्यानंतरच्या दमट वातावरणामुळे कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेता, नांदेड आरोग्य विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया आणि इतर कीटकजन्य आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य विभाग कटीबद्ध असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांनी सांगितले आहे.

आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना:

जनजागृती अभियान: आरोग्य सेवक घरोघरी जाऊन नागरिकांना या आजारांची माहिती देतील आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना समजावून सांगतील.

डास उत्पत्ती स्थानांचा शोध व निर्मूलन: साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे घरातील आणि घराबाहेरील कुंड्या, टायर, नारळाच्या करवंट्या, पाण्याच्या टाक्या इत्यादी ठिकाणी पाणी साचू न देण्याचे आवाहन करण्यात येत आहे. आरोग्य कर्मचारी डास उत्पत्ती स्थाने शोधून ती नष्ट करतील.

फवारणी मोहीम: आवश्यकतेनुसार डासांचा प्रादुर्भाव असलेल्या परिसरात फवारणी केली जाईल.

ताप सर्वेक्षण: आशासेविका व आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन तापाच्या रुग्णांचा शोध घेतील आणि त्यांना योग्य वैद्यकीय सल्ला व उपचार मिळवून देण्यास मदत करतील.

तात्काळ उपचार: ताप आल्यास तात्काळ नजीकच्या आरोग्य केंद्रात किंवा डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करावी आणि उपचार घ्यावा. स्व-औषधोपचार टाळावा.

नागरिकांना आवाहन

नागरिकांनी आरोग्य विभागाला सहकार्य करावे आणि आपल्या परिसरात स्वच्छता राखावी. आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळून पाण्याची भांडी रिकामी करावीत. खिडक्यांना जाळ्या लावाव्यात आणि झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा.

आपल्या आरोग्याची काळजी घेणे हे आपल्या हातात आहे. कोणताही ताप किंवा आजाराची लक्षणे दिसून आल्यास त्वरित उपकेंद्र व प्रा  आ केंद्र अशा शासकीय संस्थांशी संपर्क  साधावा असे आव्हान जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख. हिवताप अधिकारी डॉ. अमृत चव्हाण यांनी केले.

०००००

No comments:

Post a Comment

    वृत्त हिंद की चादर समागम कार्यक्रमातून आज लाखो भाविक घेणार प्रेरणा  ▪️उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री देवेंद्र फडण...