Wednesday, April 17, 2024

वृत्‍त क्र. 352 

मतदान जनजागृतीच्‍या एलएईडी रथास

जिल्‍हाधिकारी व मान्‍यवरांच्‍या हस्‍ते हिरवा झेंडा 

नांदेड, 17 एप्रिल- लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा निवडणूक कार्यालयामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून मतदान जनजागृतीसाठी एलईडी चित्ररथ तयार करण्यात आल्या आहेत. एलएईडी रथाचे आज जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या परिसरातून जिल्हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत, स्वीपचे नोडल अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून एलईडी रथ रवाना करण्यात आले. 

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, उपविभागीय अधिकारी विकास माने, महापालिकेचे उपायुक्त अजिपालसिंह संधू, तहसीलदार निलेशकुमार बोलेलू, शिक्षणाधिकारी (नियोजन) दिलीप बनसोडे आदीची उपस्थिती होती. 

या एलईडी रथाव्दारे मतदान जनजागृतीच्या चित्रफिती, नागरिकांनी मतदान करावे यासंदर्भातील जिल्हाधिकारी, सीईओ, जिल्हा पोलीस अधीक्षक, मनपा आयुक्त यांनी दिलेले निवेदन व आवाहन दाखविले जाणार आहे. निवडणुकीच्या माध्यमातून लोकशाहीच्या या उत्सवात नांदेड लोकसभा मतदार संघातील जास्तीत जास्त मतदारांनी सहभाग घ्यावा, यासाठी मतदार जनजागृती करण्यात येत आहे. मतदार जनजागृतीमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 

बसस्‍टॅडवरुन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते उद्घोषणा, पथनाट्य, निवडणूक प्रतिज्ञा आणि महिला बचत गटांच्या माध्यमातून मतदार जनजागृतीच्या या उपक्रमाच्या माध्यमातून मतदानाचे महत्व संबंधितांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. आज रवाना करण्यात आलेल्या एलईडी रथाव्दारे नांदेड लोकसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाणार आहे. यावेळी स्वीपचे प्रलोभ कुलकर्णी, बालासाहेब कच्छवे, सुनील मुत्तेपवार, रवी ढगे आदींची उपस्थिती होती. जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीपचे नोडल अधिकारी तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल व महापालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे हे नांदेड लोकसभा मतदारसंघात मतदार जनजागृती विषयक विविध उपक्रम राबवित आहेत.

00000






No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   401 लोकसभा निवडणुकीतील सहभागी कर्मचाऱ्यांचे यावर्षी विक्रमी मतदान   10 हजारावर  कर्मचाऱ्यांनी बजावला मताधिकार   नांदेड दि. 2 ...