Tuesday, March 19, 2024

वृत्त क्र. 255

 जातीचे मेळावे, सार्वजनिक ठिकाणी पक्ष कार्यालये

विनापरवानगी दुसऱ्याच्या घरावर झेंडे चालणार नाही

जिल्ह्यात कलम 144 लागू ; विविध बाबींवर निर्बंध

नांदेड, दि. 19 :- भारत निवडणूक आयोगाने निर्देशित केल्याप्रमाणे आचारसंहिता लागल्यानंतर जातीचे  मेळावे आयोजित करता येणार नाही तसेच दुसऱ्याच्या घरावर झेंडे लावणे, सार्वजनिक ठिकाणी कार्यालय उघडणे, डमी मतपत्रिका छापणे, प्रचार साहित्य भर रस्त्यात लावणे यावर निर्बंध आखण्यात आले असून नियमाचा भंग केल्यास कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

भारत निवडणूक आयोगाकडून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची दिनांक 16 मार्च 2024 रोजी घोषणा केली असून घोषणेच्‍या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे. नांदेड जिल्‍ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्‍याय वातावरणात पार पाडण्‍याच्‍या दृष्‍टीकोणातून नांदेडचे जिल्‍हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी  फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्‍वये अधिकाराचा वापर करुन विविध बाबींवर निर्बंध आदेश 16 मार्च रोजी निर्गमीत केले आहेत. हे सर्व आदेश 6 जून 2024 पर्यत लागू राहतील.

पक्ष कार्यालय सार्वजनिक ठिकाणी नको
सार्वजनिक ठिकाणाच्या जवळपास पक्ष कार्यालये स्थापन करण्यास निर्बंध करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, रुग्णालये किंवा शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणाच्या जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यास निर्बंध करण्यात आले आहेत, असे आदेश जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमित केले आहे.

झेंडे, भित्तीपत्रके लावण्यास निर्बंध
निवडणुकीचे प्रचारासाठी कोणत्याही व्यक्तीगत जागा, इमारत, आवार, भिंत इत्यादीचा संबंधित जागा मालकाचे परवानगी शिवाय व संबंधित परवाना देणाऱ्या प्राधिकरणाच्या परवानगी शिवाय वापर करण्यास निवडणूक प्रक्रीया पुर्ण होईपर्यत निर्बंध घालण्यात आले आहे, असे आदेश जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमित केले आहे.

रस्त्यावर जाहिराती नको
निवडणुकीचे साहित्य कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर रहदारीस अडथळा होईल किंवा अपघात होईल अशा पध्दतीने लावण्यास निवडणूक प्रक्रीया पुर्ण होईपर्यत निर्बंध घालण्यात आले आहेत, असे आदेश जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमित केले आहे.

जातीचे मेळावे नको
निवडणूक कालावधीत जात, धर्म, भाषावार शिबिरांचे आयोजन न करणे
जिल्ह्यात कुठेही कसल्याही प्रकारचे जात, भाषा, धार्मिक शिबिरांचे, मेळाव्यांचे आयोजनावर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहे, असे आदेश जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमित केले आहे.

नमुना मतपत्रिका छपाई वर निर्बंध
जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी किंवा त्यांच्या हितचिंतकाने, मुद्रणालयाचे मालकाने व इतर सर्व माध्यमाद्वारे छपाई करणाऱ्या मालकाने तसेच प्रकाशकाने नमुना मतपत्रिका छापतांना इतर उमेदवाराचे नाव त्यांनी नेमून देण्यात आलेले चिन्ह वापरणे, नमुना मतपत्रिकेसाठी आयोगाने निश्चित केल्याप्रमाणे कागद वापरणे, आयोगाने निश्चित केलेल्या कागदाच्या आकारामध्ये नमुना मतपत्रिका छपाईस निवडणूक प्रक्रीया पूर्ण होईपर्यत निर्बंध घालण्यात आले आहेत, असे असे आदेश जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमित केले आहे.
0000


No comments:

Post a Comment

मोटार सायकल संवर्गातील वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरु

  मोटार सायकल संवर्गातील वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरु   नांदेड दि.  9   :-   प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने परिवहन्नेतर संवर्...