Friday, December 8, 2023

 वृत्त   

 

नवमतदार नोंदणीसाठी

सोशल मिडिया स्टार्स करणार जनजागृती

  

·  नवमतदारांनी नाव नोंदणीसाठी पुढे येण्याचे

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे आवाहन  

 

नांदेड (जिमाका) दि. 8 :-  नांदेड जिल्ह्याची लोकसंख्या 33 लाखांपेक्षा अधिक आहे. या लोकसंख्येपैकी एकुण मतदारांची संख्या लक्षात घेता नवमतदार युवकांची संख्या ही 60 हजारांपेक्षा अधिक असायला पाहिजे. हे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी निवडणूक विभाग ग्रामपातळीपासून प्रयत्नशील आहे. नवमतदारांच्या जागृतीसाठी ब्लॉगर्स, व्लॉगर्स, युट्यूबर्स, विविध समाज माध्यमात कार्यरत सोशल मिडिया स्टार्स यांनी जनजागृतीसाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.

 

नांदेड जिल्ह्यातील विविध सोशल मिडिया अर्थात समाज माध्यमांवर अपूर्व ठसा उमटविणाऱ्या युवा-युवती समवेत ब्लॉगर्स, व्लॉगर्स, युट्यूबर्स समवेत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, कॉमेडी क्रियेटर गजानन गिरी, कल्पना खानसोळे, व्हिडिओ क्रियेटर माधवी लोकरे, डिजीटल कन्टेंड क्रियेटर  जयपाल गायकवाड, इशान खान, सय्यद अमीर, सय्यद सोहेल, सिद्धेश्वर पडघन, नासेर सानी, महमंद मुश्रफ, अँकर श्रृती आकोलकर, आदी उपस्थित होते.

 

आयुष्यात पहिल्यांदा मतदान करण्याची अनुभूती ही वेगळीच असते. मी रूरकी येथे पदव्युत्तर शिक्षणासाठी होतो. आपल्याला मिळालेला मतदानाचा अधिकार बजावतांना होणाऱ्या आनंदाला आपण पारखे होऊ नये यासाठी घरची परवानगी न घेता 2 हजार 400 कि.मी.चा प्रवास करून मी गावी पोहचल्याची आठवण जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी बोलतांना सांगितली. काही युवक मतदानाच्या यादीत आजघडीला जरी नसले तरी सोशल मिडियावर ते नक्कीच आहेत. हे लक्षात घेता साक्षरतेच्यादृष्टिने समाज माध्यमांचे महत्त्व अधिक असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून मतदानाला पात्र असूनही ज्यांनी अजून मतदान कार्ड तयार केलेले नाहीत त्यांनाही या प्रक्रियेशी जुळून घेऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

यावेळी जयपाल गायकवाड, कॉमेडी क्रियेटर गजानन गिरी, अँकर श्रृती आकोलकर, इशान खान, नासेर सानी यांनी आपले अनुभव ठेवून मतदार साक्षरतेसाठी आम्ही उत्सूक असल्याचे सांगितले. जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी सर्वांचे आभार मानले.

0000








No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...