Wednesday, July 26, 2023

437 अन्न प्रक्रिया प्रकल्पांना जिल्ह्यात मंजुरी योजनेतून 10 लाखांपर्यतचे अनुदान

                                                   437 अन्न प्रक्रिया प्रकल्पांना जिल्ह्यात मंजुरी

योजनेतून 10 लाखांपर्यतचे अनुदान


नांदेड (जिमाका) दि. 26 :-  आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उदयोग उन्नयन योजना राज्य व केंद्र शासनाच्या सहकार्याने राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यात नवीन 437 प्रकल्प उभारणीसाठी मंजूरी देण्यात आली आहे. ही योजना असंघटीत व अनोंदणीकृत अन्न प्रक्रिया उद्योगासाठी असून याद्वारे  शेतकरी, शेतकरी कंपन्या, उत्पादन संस्था, स्वयंसहायता गटांना  प्रगतीचे नवे मार्ग खुले झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 9 कोटी 27 लाखांच्या 112 प्रकल्पांना  मंजूरी दिली असून या योजनेत विविध शेतकरी व बेरोजगार युवकांना लाभ झाल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी दिली आहे.

 

वैयक्तिक लाभार्थी, बेरोजगार युवक-युवती, महिला, स्वयंसहायता गट, शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी संस्था, अशासकीय संस्थाना प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतून वैयक्तिक लाभार्थ्यांना प्रकल्प किमतीच्या 35 टक्के किंवा जास्तीत जास्त 10 लाख रुपयांपर्यंत अनुदान उपलब्ध करून देण्यात येते. ग्रामीण व शहरी भागातील सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगातील स्वयंसहायता गट, उत्पादक सहकारी संस्था यांना सामान्य पायाभूत सुविधा व भांडवली गुंतवणुकीसाठी बँक कर्जाशी निगडीत एकूण प्राप्त प्रकल्प खर्चाच्या 35 टक्के किंवा जास्तीत जास्त 3 कोटी अनुदान दिले जाते. या योजने अंतर्गत अन्न प्रक्रिया उद्योगासाठी सामाईक पायाभुत सुविधा केंद्रासाठी 35 टक्के अनुदान, ब्रँडींग व मार्केटींगसाठी एकूण खर्चाच्या 50 टक्के अनुदान स्वयंसहाय्यता गटांना बीज भांडवल लहान उपकरणे खरेदीसाठी 40 हजार प्रती सभासद (4 लाख) पर्यंत अनुदान देय राहील.

 

प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग योजना राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे. पारंपारिक, स्थानिक उत्पादनांना या योजनेतून प्रोत्साहन देण्यात येत आहे.  नाशवंत फळ पिके, कोरडवाहू पिके, भाजीपाला, अन्नधान्ये, तृणधान्ये, कडधान्ये, तेलबिया, मसाला पिके इत्यादीवर आधारित उत्पादने, दुग्ध व पशु उत्पादने, सागरी उत्पादने, मांस उत्पादने, वन उत्पादने इत्यादी उत्पादनांचा यामध्ये समावेश आहे. वैयक्तिक मालकीच्या सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी 112 प्रकरणांना मंजुरी देण्यात आली आहे. या सर्व प्रकल्पांची एकूण किंमत 9 कोटी 27 लाख 65हजार 707 रुपये आहे. यामध्ये बँकाकडून 6 कोटी 6 लाख 9 हजार 339 रुपये कर्ज स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आले आहे.  प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतून कोटी 92 लाख 41 हजार 220 रुपये अनुदान मंजूर करण्यात करण्यात आले आहे. या माध्यमातून लसूण, अद्रक पेस्ट, चिप्स, मसाले, दाळे, तेलघाणा, पापड, शेवया, दुग्धजन्य पदार्थ निर्मिती, गुळ उद्योग इत्यादी सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग जिल्ह्यात उभारण्यात आले आहे असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...