Wednesday, April 26, 2023

 अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या राज्यस्तरीय

क्षेत्रीय अधिकाऱ्यांसाठी आयोजित कार्यशाळा संपन्न

 

नांदेड (जिमाका) दि. 26 :- अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबईच्यावतीने यशदा पुणे येथे 19 ते 21 एप्रिल 2023 या कालावधीत राज्यातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांची तीन दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली.

 

कार्यशाळेच्या उद्घाटन यशदाचे महासंचालक एस. चोकलिंगम व प्रमुख पाहूणे म्हणून औद्योगिक सांख्यिकी विभागाच्या उपमहानिदेशक सौम्या चक्रवर्ती, पुणे येथील राष्ट्रीय नमुना पाहणी विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयाचे संचालक आलोक कुमारउद्योग विभागाचे महाव्यवस्थापक प्रतिनिधी पी.डी.रेंदाळकर उपस्थित होते. राज्यातील प्रादेशिक सांख्यिकी कार्यालयांचे सहसंचालक डॉ.किरण गिरगांवकर व जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे उपसंचालक निखिल बासटवार आणि क्षेत्रकाम करणारे कर्मचारी या कार्यशाळेत उपस्थित होते. एकूण 164 अधिकारी व कर्मचारी या कार्यशाळेत सहभागी झाले.

 

वार्षिक उद्योग पाहणी  हा उद्योगविषयक (संघटित क्षेत्र) महत्वपूर्ण आकडेवारीचा प्रमुख स्त्रोत आहे. या आकडेवारीचा वापर राष्ट्रीय उत्पन्न अंदाज (जीडीपीतयार करण्यासाठीऔद्योगिक संरचनेचा अभ्यास करण्यासाठी व उद्योगविषयक धोरणे निश्चितीसाठी होतो. राष्ट्रीय स्तरावर सांख्यिकी कार्यालयाकडून देशातील सर्व राज्यांमधील प्रमुख उद्योगांच्या वार्षिक उद्योग पाहणीचे काम करण्यात येते. राज्यातील उद्योग पाहणीचे काम अर्थ व सांख्यिकी संचालनालय या राज्य शासनाच्या सांख्यिकी विषयक नोडल यंत्रणेकडून करण्यात येते.

 

निवड करण्यात आलेल्या उद्योगांना सांख्यिकी संग्रहण अधिनियम 2008 खालील तरतुदींनुसार माहिती देणे बंधनकारक आहे. संकलित करण्यात येणाऱ्या माहितीची गुणवत्ता वाढविण्यासाठी व क्षेत्रकामाचा दर्जा उंचाविण्याच्या द‌ृष्टीकोनातून सन 2021-22 या वर्षाच्या क्षेत्रकामासाठी राज्यातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांची तीन दिवसीय कार्यशाळा 19 ते 21 एप्रिल 2023 या कालावधीत यशदा पुणे येथे आयोजित करण्यात आली होती.

 

जगात बहुतांश देशांमध्ये वार्षिक उद्योग पाहणी घेण्यात येते.  आपल्या देशातील वार्षिक उद्योग पाहणीमध्ये सर्वात अधिक उद्योगांची पाहणी केली जात असून ही अभिमानास्पद बाब असल्याचे उपमहानिदेशक सौम्या चक्रवर्ती यांनी नमूद केले. तसेच माहिती विहीत वेळेत संकलित करुन उपलब्ध करुन देण्याचे महत्व अधोरेखित केले.

 

या प्रशिक्षणाचा पुरेपूर लाभ घ्यावा. जरी मनुष्यबळाची कमतरता असली तरी कामाचे योग्य नियोजन करुन शासनासाठी व उद्योग क्षेत्रासाठी महत्वाची असलेली माहिती या पाहणीच्या माध्यमातून वेळेत व गुणवत्तापुर्ण उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना संचालक विजय आहेर यांनी दिल्या. तसेच उद्योगांनी देखिल या कामी आवश्यक ते सहकार्य करावे असेही आवाहन त्यांनी केले.

 

देशातील सर्व्हेचा इतिहासमाहितीचे महत्व आणि त्याचा वापर आणि त्यामुळे होणारे अपेक्षित/अनपेक्षित परिणाम याबाबत उदाहरणासह उपस्थितांच्या ज्ञानात यशदाचे महासंचालक चोकलिंगम यांनी भर घातली. माहिती तंत्रज्ञानात होत असलेल्या नवनवीन प्रगतीद्वारे उपलब्ध होत असलेले आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग यासारखे तंत्रज्ञान याचा विचार करुन माहिती संकलनाच्या पद्धतीमध्ये देखिल सुधारणा होण्याच्या दृष्टीने विचार करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. वार्षिक उद्योग पाहणीच्या कामासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.

 

प्रास्ताविकात अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या उपसंचालक श्रीमती दिपाली धावरे यांनी वार्षिक उद्योग पाहणीबाबत सर्व उपस्थितांना अवगत केले. सहसंचालक नवेन्दु फिरके यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. कार्यशाळेत कोलकाता राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाचे उपसंचालक रणबीर डे व बाप्पा करमरकरडॉ. प्रदीप आपटेप्रख्यात अर्थतज्ज्ञ व प्राध्यापक गोखले, राष्ट्रीय नमुना पाहणी कार्यालयाच्या पुणे येथील क्षेत्रीय कार्यालयाचे उपसंचालक श्रीनिवास शिर्के आणि महेश चोरघडे यांनी मार्गदर्शन केले.

 

कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी अपर संचालक डॉ.जितेंद्र चौधरी हे सत्र नियंत्रक व तज्ञ मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या संबंधित अनुभवी प्रशिक्षकांद्वारे वार्षिक उद्योग पाहणीच्या कामाचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण संगणकावर घेण्यात आले. यावेळी प्रशिक्षणार्थींच्या अडचणींचे निराकरण करण्यात आले. समारोपाच्या कार्यक्रमासाठी यशदा पुण्याचे उपमहानिदेशक डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी हे अध्यक्ष व अपर

संचालक पुष्कर भगूरकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

00000



No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...