Saturday, April 1, 2023

 चला जाणूया नदीला या उपक्रमात पर्यावरण संवर्धनासाठी

प्रत्येकाने आपले कर्तव्य ओळखून योगदान द्यावे
- सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते
मन्याड नदी संवाद व गाळ काढणाऱ्या लोकाभिमुख उपक्रमांचा शुभारंभ
नांदेड (जिमाका) दि. 1 :- अनादी काळापासून नदीचे आणि मानवाचे नाते अधिक दृढ आहे. चांगल्या संस्कृतीचा उदय नदीच्या काठावर झाला आहे. नद्यांचे पावित्र्य राखणे हे प्रत्येकांचे कर्तव्य असून त्यासाठी आपला सहभाग तीतकाच महत्वाचा आहे. नदी संवर्धनासाठी लोकसहभाग अत्यंत महत्वाचा असून लोकसहभागातून प्रत्येक व्यक्तीने पर्यावरण संवर्धनात आपले कर्तव्य ओळखून योगदान द्यावे, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
शासनाने “चला जाणुया नदीला” हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत नदी संवाद यात्रा व जलसाठ्यांना गाळातून मुक्त करण्यासाठी जिल्ह्यातील मन्याड नदीचा गाळ काढण्याच्या उपक्रमाचा प्रातिनिधीक शुभारंभ सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते नियोजन भवन येथे करण्यात आला. यावेळी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार राजेश पवार, आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, उपवनसंरक्षक वाबळे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक अविनाश कुमार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, शिवाचार्य बेटमोगरेकर, नाम फाऊंडेशनचे प्रतिनिधी मल्हार नाना पाटेकर, जिल्ह्यातील सर्व सेवाभावी संस्थांचे प्रमुख व प्रतिनिधी हे उपस्थित होते. मांजरा नदी समन्वयक अनिकेत लोहिया, प्रमोद देशमुख, दीपक मोरतळे, सीता नदी समन्वयक बाळासाहेब शेंबोलीकर, नंदन फाटक, लेंडी नदी समन्वयक कैलास येसगे, वसंत रावणगावकर, यादव बोरगावकर, मन्याड नदी समन्वयक प्रमोद देशमुख, शिवाजीराव देशपांडे, दुधाना नदी समन्वयक रमाकांत कुलकर्णी, कयाधू नदी समन्वयक दयानंद कदम, जयाजी पाईकराव, आसना नदी समन्वयक तानाजी भोसले, डॉ परमेश्वर पौळ, वरुणा नदी समन्वयक सुनील परदेशी, राहुल जोरे आदीची उपस्थिती होती.
पाणी ही महत्वाची नैसर्गिक साधन संपत्ती असून या संपत्तीचे संवर्धन करणे हे प्रत्येकांचे कर्तव्य आहे. जिल्ह्यातील मन्याड नदीपात्रातील परिसर पुरमुक्त व दुष्काळमुक्त करण्यासाठी गाळ काढणे आवश्यक असून याचा फायदा त्या भागातील शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना झाला पाहिजे. मराठवाडा मुक्तीचा हा लढा खऱ्या अर्थाने लोकाभिमूख करावयाचा असेल तर शेतकरी, कष्टकऱ्याच्या आयुष्यात आनंद निर्माण करणे ही आपली जबाबदारी असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. चला जाणूया अभियाना अंतर्गत देशातील 75 नद्या अमृतवाहीनी करण्याचा संकल्प शासनाने केला आहे. यात आता लोकसहभागातून वाढ होवून 117 नद्या अमृतवाहीन्या करण्यावर भर देण्यात येणार आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
चला जाणूया नदीला या उपक्रमातर्गत आज मन्याड नदीपात्रातून गाळ काढण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमाला जनआंदोलनाचे स्वरुप आले असून संस्था व लोकसहभागातून मन्याड नदीतील 20 लाख घनमीटर गाळ काढण्याचे नियोजन असल्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सांगितले. यावेळी मी मन्याड या पुस्तिकेचे प्रकाशन झाले. यावेळी जिल्ह्यातील सर्व नद्याच्या पाण्याचे कलश पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुमंत पाडे यांनी केले. यावेळी भुजल गाथा फिल्मचे सादरीकरण करण्यात आले.
0000






No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...