Sunday, March 19, 2023

वृत्त क्रमांक 130

 ज्येष्ठांना जे-जे देण्यासारखे आहे ते-ते देण्याचा प्रयत्न

-  पालकमंत्री गिरीश महाजन

 

नांदेड (जिमाका) दि. 19 :-ज्येष्ठांना मान-सन्मानाची वागणूक देणे ही आपली संस्कृती असून ती आपण जोपासली पाहिजे. यासाठी शासन संवेदनशिल असून येत्या काळात शासनातर्फे महिला व जेष्ठांना आवश्यक त्या सोयी-सुविधा पुरविण्यावर भर देण्यात येईल. शासनातर्फे जेष्ठांना जे-जे देण्यासारखे आहे ते-ते देण्याचा प्रयत्न राहील, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास, पंचायतीराज, वैद्यकिय शिक्षण,  क्रीडा व युवक कल्याण  मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले.

 

महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ फेस्कामच्या 5 व्या राज्यस्तरीय महिला अधिवेशन आणि मनोहारी मनोयुवा आनंद मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार राजेश पवार, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार तसेच महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ फेस्कामचे अध्यक्ष अरुण रोडे, अशोक तेरकर, राज्यातील फेस्कामचे उपाध्यक्ष, ज्येष्ठ महिला सदस्य आदींची उपस्थिती होती.

 

राज्यात अंदाजे 1 कोटी 36 लाख ज्येष्ठांची संख्या असून ज्येष्ठांना आवश्यक त्या मुलभूत गरजा पुरविण्यावर भर देण्यात येत आहे. यात प्रामुख्याने प्रवास आणि आरोग्याच्या सुविधा पुरविण्यावर भर देण्यात येत आहे. 75 वर्षावरील ज्येष्ठांना राज्य परिवहन महामंडळाच्या बस मध्ये मोफत प्रवासाची सोय असून,  महिलांनाही प्रवासात 50 टक्के सवलत दिली आहे. येत्या काळात महानगरपालिका क्षेत्रात विरंगुळा सेंटर उभारण्यात येणार आहेत. तसेच राज्यात सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ज्येष्ठ नागरिकांच्या तपासणीसाठी 65 वर्षाच्यावरील नागरिकांना वेगळी ओपीडीची व्यवस्था करण्याचा विचार असून ज्येष्ठांना नियमित तपासण्यासाठी रांगेत उभे राहण्याची आवश्यकता भासणार नाहीअसे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थित ज्येष्ठांना सांगितले.

 

शासनाच्यावतीने सध्या ब्रेस्ट कॅन्सर तपासणी मोहिम सुरु आहे. या आजारात महिलांनी पुढाकार घेवून आपली तपासणी करुन घ्यावी. जेणेकरुन वेळीच निदान होवून उपचार मिळाल्यास रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढण्यास मदत होईल. यासाठी ग्रामीण भागात आरोग्य विभागाच्या आशा कार्यकर्ती, आरोग्य सेविका यांच्यामार्फत तपासणी करण्यात येणार आहे. महिलांनी या मोहिमेचा अवश्य लाभ घ्यावा, असेही पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.  

 

फेस्कामच्यावतीने वैद्यकीय सेवेत उत्कृष्ट कार्य केल्याबाबत डॉ. मायाताई कुलकर्णी यांना फेस्काम महिला भूषण पुरस्कार व अण्णासाहेब टेकाळे यांना जीवन गौरव पुरस्कार पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. फेस्कामचे अध्यक्ष अरुण रोडे यांनी ज्येष्ठांना शासनातर्फे दिलेल्या सुविधांबाबत आभार मानले. यावेळी फेस्कामच्या मनोहारी मनोयुवा पुस्तिकेचे प्रकाशन व यावल समाचार वृत्तपत्राचे प्रकाशन पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.

00000

छायाचित्र : सदा वडजे, नांदेड



No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...