Monday, March 6, 2023

 हैद्राबाद मुक्ती लढ्याच्या अमृत महोत्सवानिमित्त

जिल्ह्यातील ऐतिहासिक गावांमध्ये विशेष उपक्रम

-    खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर

 

·   एप्रिल महिन्यापासून वंदेमातरम् चळवळीने होईल उपक्रमांचा शुभारंभ

·   जिल्हा नियोजन सभागृहात खासदार चिखलीकरांच्या अध्यक्षतेखाली

समितीतील सदस्यांची व्यापक बैठक

·  युवापिढी पर्यंत हैद्राबाद मुक्तीचा इतिहास पोहचविण्यावर असेल भर

 

नांदेड (जिमाका) दि. 6 :- मराठवाडा मुक्तीचा लढा हा निजामाच्या बेबंदशाहीतून मुक्तीचा लढा होता. हा लढा स्वातंत्र्यासाठीचा लढा होता. या लढ्याला धार्मिक, पक्षीय भेद नव्हते. आपल्या हजारो माय-माऊलीनीही मराठवाड्याच्या मुक्तीसाठी यात स्वत: झोकून दिले. जो लोकसहभाग त्यावेळी सर्व जात, धर्म, पंथ यातील भेदाभेद विसरुन लोकांनी दिला त्याला तोड नाही. त्यांच्या योगदानाला अधोरखित करण्यासाठी, स्वातंत्र्य सैनिक, ज्ञात-अज्ञात हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी जिल्ह्यातील ऐतिहासिक गावांमध्ये विशेष उपक्रम घेतले जातील, अशी घोषणा खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केली.

 

येथील जिल्हा नियोजन सभागृहात मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवच्या नियोजन समितीची बैठक खासदार चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली आज संपन्न झाली. या बैठकीस जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता राजपुत, उपवनसंरक्षक वाबळे, प्रभारी उपजिल्हाधिकारी कोलगणे, प्रविण साले, व्यंकटराव गोजेगावकर, समितीतील सदस्य संपादक शंतनू डोईफोडे, पत्रकार विजय जोशी, चारुदत्त चौधरी, प्रल्हाद उमाटे, ज्येष्ठ रंगकर्मी लक्ष्मण संगेवार, सान्वी जेठवाणी, संजय जोशी, रत्नाकर अपस्तंभ, प्रा. कौसल्ये, शाहीर रमेश गिरी, गोडबोले आदी मान्यवर उपस्थित होते.  

 

मराठवाडा मुक्तीचा हा अमृत महोत्सव अधिक लोकाभिमुख व्हावा, लोकसहभाग अधिकाधिक व्हावा या उद्देशाने आजच्या बैठकीत एक उपसमिती गठन करण्यात आली. या समितीच्या समन्वयकपदी जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार हे इतर सदस्यांसमवेत काम पाहतील. एप्रिल महिन्यात वंदेमातरम् चळवळीची मुर्हतमेढ रोवली गेली होती. ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी गोविंदभाई श्रॉफ यांनी निजामाच्या अत्याचाराला धुडकावून टाकण्यासाठी वंदेमातरम् सामुहिकरीत्या औरंगाबादच्या शासकीय महाविद्यालयात हॉस्टेलमध्ये गायले. याची गाथा नव्यापिढीपर्यंत पोहचावी यासाठी विविध उपक्रम मार्च-एप्रिल पासून प्रस्तावित करण्याचे ठरले.

समितीतील सदस्यांनी हा अमृत महोत्सव अधिक सर्वसमावेशक व्हावा यासाठी स्वत:हून पुढे यावे व वेळ द्यावा, असे आवाहन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले.

 

मानव विकास निर्देशांकानुसार कारखानदारी, सेवाक्षेत्र, पंतप्रधान आवास योजना आणि शाळांची उपलब्धता यात गुणांच्या आधारावर नांदेड लोकसत्ता जिल्हा निर्देशांक पुरस्कार जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना मिळाल्याबद्दल त्यांचा खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पत्रकार विजय जोशी यांनी बैठकीत याबाबत सुचना मांडली होती.

0000 







No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...