Tuesday, December 6, 2022

 समता पर्वा निमित्त विद्यार्थ्यांना डिजीटल जात वैधता प्रमाणपत्राचे वितरण

नांदेड (जिमाका) दि. 6 :- समता पर्व सप्ताहनिमित्त लोहा येथील श्री संत गाडगे महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात लोहा व कंधार तालुक्यातील इयत्ता 11 वी व 12 वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबीर नुकतेच आयोजित करण्यात आले होते. या शिबीरात विद्यार्थ्यांना जात पडताळणीबाबत मार्गदर्शन करुन विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था ( बार्टी ) पुणे यांच्या विद्यमाने समता पर्व निमित्त आयोजित मार्गदर्शन शिबिरात जात पडताळणी समितीचे सहाय्यक संशोधन अधिकारी वैजनाथ मुंडे यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी कोणकोणते कागदपत्र सादर करावेत, ऑनलाइन अर्ज कसा भरावा याबाबत सविस्तर माहिती त्यांनी दिली. इयत्ता 11 वी 12 वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी पुढील शिक्षणाची तयारी म्हणून जात प्रमाणपत्र प्राप्त करून त्यानंतर जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी प्रस्ताव महाविद्यालयात स्थापन करण्यात आलेल्या "समान संधी केंद्रात" दाखल करावेत असेही त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

मंडणगड पॅटर्ननुसार सर्व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र देण्यात येईल. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरताना गोंधळून न जाताव्यवस्थित व अचूक माहिती भरावी. जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याची प्रक्रीया सोपी आहे. सर्वांना जात वैधता कमीत कमी वेळेत देण्याचा नांदेड समितीचा प्रयत्न आहे. एकही मागास प्रवर्गातील विद्यार्थी प्रमाणपत्रापासून वंचित राहणार नाही. त्यासाठी 11 वी व 12 वी विज्ञान शाखेत प्रवेशित विद्यार्थ्यांनी 31 जानेवारीपर्यंत आपले परिपूर्ण प्रस्ताव "समान संधी केंद्रात" सादर करावेत असे आवाहन सहाय्यक संशोधन अधिकारी वैजनाथ मुंडे यांनी केले.  

समिती मार्फत अर्जदारांना ऑनलाइन पद्धतीने जात वैधता प्रमाणपत्र त्यांनी ऑनलाइन अर्जात नमूद केलेल्या ईमेल आयडी वर पाठवले जातील. ऑनलाइन प्राप्त झालेले वैधता प्रमाणपत्र संगणकावरून Adobe Reader DC या प्रणालीमध्ये ओपन करावे. त्यामुळे डिजिटल स्वाक्षरीची पडताळणी होईल. अर्जदारांना ऑनलाइन जात प्रमाणपत्र पडताळणी प्रणाली बाबत काही शंका असतील तर मुक्त शुल्क क्रमांक 18001208040 किंवा ईमेल cvcnanded@gmail.com  वर संपर्क साधावा, असेही कळविले आहे. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन प्रा. शिवाजी मोरे यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. सूर्यवंशी यांनी केले. यावेळी आनंदा कदम सूर्यकांत केंद्रे एस. एम. मुंडकर आर. जी. चौकलेके. आर. वरपडेएस. ए. मलशेट्टेएन. एम. हिपर्गेकरपी.पी. विभुते यांच्यासह महाविद्यालयीन विद्यार्थी व कर्मचाऱ्याची उपस्थित होती.

0000




No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...